ऑक्सफर्ड विद्यापीठातील ‘कोव्हिड-१९’वरील लसीच्या मानवावर चाचण्या सुरू

ब्रेनवृत्त, १५ मे

ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘कोरोना विषाणू‘च्या ज्या लसीवर काम सुरु आहेत, तिचे प्राथमिक निष्कर्ष दिलासादायक असल्याचे वृत्त समोर आले आहे. विद्यापीठातील संशोधकांनी सहा माकडांच्या गटावर लस वापरुन पाहिली आणि ती काम करत असून, आता या लसीची चाचणी मानवांवर सुरू आहे. तसेच, येत्या काही इतर संशोधकांकडून या लसीचा आढावा घेतला जाणार असल्याचे अमेरिका आणि ब्रिटनमधील काही संशोधकांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला सांगितले.

लसीवर काम करणाऱ्या संशोधकांनी दिलेल्या अहवालानुसार, ‘सहा माकडांवर या लसीची चाचणी करण्यात आली. माकडांना कोरोना विषाणूचे डोस देण्यापूर्वी त्यांना ही लस देण्यात आली. त्यानंतर काही माकडांच्या शरीरात १४ दिवसांत अँन्टीबॉडीज विकसित झाले, तर काही माकडांच्या शरीरात अँन्टीबॉडीज विकसित होण्यासाठी २८ दिवस लागले. तसेच, कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर, या लसीने माकडांच्या फुफ्फुसांची हानी होण्यापासून संरक्षण केले आणि शरीरात स्वत:च्या पेशी बनविण्यास आणि त्यापासून विषाणू तयार होण्यास प्रतिबंधित केले. मात्र, हा विषाणू अद्याप नाकात सक्रिय दिसत आहे.

● लस यशस्वी होण्याची शक्यता किती ?

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’चे प्रोफेसर डॉक्टर स्टीफन इव्हान्स म्हणाले की, “माकडांच्या संशोधनानंतर जे निकाल आले आहेत, ते नक्कीच दिलासादायक आहेत.” लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत, ती लस माकडांवर यशस्वी होणे फार महत्वाचे मानले जाते. मात्र, प्रयोगशाळेत माकडांना संरक्षण देण्यात सक्षम असलेल्या अनेक लस शेवटी मानवांचे रक्षण करण्यात अपयशी ठरतात. परंतु या अभ्यासात कोणतीही नकारात्मकता आढळून न येणे, हे अत्यंत आशादायक आहे. दरम्यान, 13 मे पर्यंत या संशोधनासाठी स्वतःहून पुढे आलेल्या जवळपास एक हजार जणांवर चाचणी म्हणून लस दिली असल्याचेही इव्हान्स यांनी यावेळी सांगितले.

‘रेमडेसिवीर’ ठरले ‘कोव्हिड-१९’वरील एकमेव मान्यताप्राप्त औषध!

● जगात अनेक ठिकाणी सुरू आहे लसींवर काम

जागतिक पातळीवर, ‘कोव्हिड-१९’ विरूद्ध लढा देण्यासाठी 100 पेक्षा जास्त लसींवर काम सुरु आहे. तसेच, काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या लसीची चाचण्याही सुरू आहेत, ज्या मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचली आहे.

संपूर्ण जगभरात  40 लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले असून, तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही लस बनविली, तर किती मोठ्या प्रमाणात ही लस तयार करावी लागेल, हे सर्वात मोठे आव्हान या विषाणूची लस तयार करणार्‍यांसमोर असणार आहे. सामान्यत: कोणतीही लस विकसित करण्यास १० वर्षांचाही कालावधी वर्ष लागू शकतो. परंतु, साथीच्या वेगाची गती आणि मृत्यूची संख्या पाहता संशोधक शक्य तितक्या लवकर कोरोना विषाणूची लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: