कांद्याचे दर शंभरीपार, आयतीचे नियम शिथिल

ब्रेनवृत्त | मुंबई

बाजारात कांद्याचा तुटवडा सुरू असल्याने, कांद्याचे दर शंभरीपार गेले. काल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त ५४७ टन आवक झाल्याने कांद्याचा घाऊक (होलसेल) दर ५० ते ८० रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ विक्रीसाठी ८० ते ११० रुपये प्रतिकिलो इतका राहिला. या दरवाढीला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने कांदा आयतीविषयीचे नियम डिसेंबरपर्यंत शिथिल केले आहेत.

मागील वीस दिवसांत कांद्याचे दर सतत वाढतच गेले आहेत. परिणामी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव शंभरपार गेले. कांद्याचे दर १ ऑक्टोबरला १० ते २० रुपये प्रतिकिलो होते. २० दिवसांत हे दर चार ते पाच पटीने वाढले आहेत. दसरा- दिवाळी आधीच कांद्याने शंभरी गाठली आहे. राज्यात सर्वच बाजार समितींमध्ये कांद्याची आवक घसरली आहे.

वाचा | कांद्याच्या पैशांचे मोदींना मनिऑर्डर !

दरम्यान, कांद्याच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी, तसेच पुरवठा वाढविण्याकरिता केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीचे नियम १५ डिसेंबरपर्यंत शिथिल केले आहेत. सोबतच, केंद्र सरकारच्या साठ्यात असलेला कांदाही बाजारात उतरणार आहे. खरीप हंगामात पिकलेला ३७ लाख टन कांदाही बाजारपेठेत येणार असून, त्यामुळेही किमती कमी होण्यास मदत होईल, असा शासनाचा दावा आहे.

घाऊक बाजार समितींमध्ये मुंबई ५० ते ८०, कोल्हापूर २२ ते ७०, पुणे १० ते ७५, औरंगाबाद १० ते ७५, लासलगाव १६ ते ७१ रुपये असे काद्यांचे भाव आहेत. पुण्यात काल कांद्याच्या किरकोळ भाव ११० रुपये प्रतिकिलो झाला. मागील आठवड्यात हा दर ७० रुपये इतका होता.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: