चॉपर घोटाळ्यातील कंपनीवरील बंदी उठवली, अटींसह व्यवहारांना परवानगी!

वृत्तसंस्था | एएनआय

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हवाई सेवेशी संबंधित चॉपर घोटाळ्याप्रकरणी बंदी आणण्यात आलेल्या इटलीच्या लिओनार्डो (पूर्वीची फिनमेकॅनिका/Finmeccanica) या संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या व्यवहारांवरील बंदी उठवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काही अटींसह या कंपनीला व्यवहार पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 

प्रातिनिधिक छायाचित्र

तब्बल ३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड चॉपर घोटाळा प्रकरणात दोषी आढळलेल्या व मूळची इटलीची असलेली त्यावेळची फिनमेकॅनिका (आजची लिओनार्डो) या संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या व्यवहारांवर २0१३-१४ साली बंदी घालण्यात आली होती. अलिकडे या कंपनीने भारताच्या कायदे मंत्रालय व काही संस्थांकडे पुन्हा व्यवहार सुरू करण्याच्या परवानगीसाठी विनंती केली होती. शासकीय सूत्रांनी वृत्तसंस्थेला रविवारी दिलेल्या माहितीनुसार, काही अटींसह कंपनीला व्यवहार पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

वाचामायक्रोसॉफ्टने घेतला चीनमधील लिंक्डइन बंद करण्याचा निर्णय!

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणा व अंमलबजावणी संचालनालयाद्वारे कंपनीच्या विरोधात सुरू असलेले तपास कायम राहणार आहेत. तसेच, “पूर्वी केलेल्या करारांच्या आधारावर कंपनीला भारत शासनाकडे कोणत्याही प्रकारचे वित्तीय दावे करता येणार नाहीत. व्यवहारांवरील बंदी उठवल्यानंतर तिला सर्व व्यवहार पुन्हा नव्याने सुरू करावे लागतील”, असेही या निर्णयानुसार ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) सत्ताकाळात सन २०१३-१४ मध्ये चॉपर घोटाळा प्रकरणी या कंपनीवर बंदी आणण्यात आली होती. देशातील विविध अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांसाठी १२ AW-101 हेलिकॉप्टर्स पुरवण्यासाठी २०१० मध्ये ३६०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता.

हेही वाचा | अदानी प्रकल्पाचे ऑस्ट्रेलियात गैरकृत्य; समभागधारक विरोधात एकवटले!

या घोटाळ्यात सहभागी अनेकांना युरोपीय तपास संस्थेद्वारे अटकही करण्यात आली होती. यात भ्रष्टाचाराचे प्रकरण हे ऑगस्टा वेस्टलँडशी संबंधित होते, तरीही फिनमेकॅनिकाच्या समूहाच्या सर्वच व्यवहारांवर बंदी घालण्यात आली होती. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: