भारत वाघांसाठी सर्वात सुरक्षित अधिवास : पंतप्रधान मोदी

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

२९ जुलै २०१९

जगात वाघांचे अस्तित्व इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक असल्यामुळे, भारत वाघांसाठी सर्वाधिक सुरक्षित अधिवास असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल ‘भारतीय वाघांची स्थिती २०१८’ सादर करताना ते बोलत होते. जगभरात केवळ भारतातच ३ हजार वाघांचे अस्तित्व असल्याचा अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आज दिल्लीत ‘अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल २०१८’ सादर करण्यात आला. यावेळी जागतिक आकडेवारीनुसार भारतात ३ हजार वाघांचे अस्तित्व असल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघांची संख्या दुप्पट करण्याचे देशाचे ध्येय निश्चित कालावधीच्या ४ वर्षे आधीच पूर्ण केले असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “वाघांचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची आज पुष्टी झाली आहे. नऊ वर्षांपूर्वी आपण अमेरिकेतील सेंट पिटर्सबर्ग येथे जगातील वाघांची संख्या २०२२पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय निश्चित केले होते. मात्र, आपण हे ध्येय केवळ ४ आधीच पूर्ण केले आहे. त्यामुळे आपण हे अभिमानाने सांगू शकतो की, जगात भारत हा वाघांसाठी सर्वाधिक मोठा आणि सुरक्षित अधिवास आहे.”

देशाचा व्याघ्र गणना अहवाल सादर करताना वाघांच्या वाढीला चित्रपटांच्या प्रवासाची उपमा दिली आहे. सोबतच, वाघांचे संवर्धन अजून वाढायला हवे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मोदी म्हणाले की, “२०१४ मध्ये भारतात वाघांसाठी संरक्षित प्रकल्पांची संख्या ६९२ इतकी होती. ती २०१९ मध्ये ८६० पेक्षा अधिक झाली आहे.  सामुदायिक संरक्षित (कम्युनिटी रिझर्व्ह) क्षेत्रांची संख्याही ४३ (२०१४ च्या आकडेवारीनुसार) वरुन शंभरच्या अधिक झाली आहे. या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या लोकांना मी हेच सांगेन की ‘एक था टायगर’ पासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. मात्र, हा प्रवास थांबता कामा नये. वाघांच्या संवर्धनाचा विस्तार व्हायला हवा व त्यांचा वेग अधिक वाढायला हवा.”

 

● अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल २०१८ आकडेवारी

आज सादर करण्यात आलेल्या व्याघ्रगणना अहवालाच्या माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे.  याआधीच्या २०१० च्या आकडेवारीनुसार भारतात १७०६ वाघ होते, २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली होती. २०१८ च्या अकडेवारीनुुसार वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ होऊन ती २९६७ इतकी झाली आहे. देशातील एकूण वाघांपैकी महाराष्ट्रात २३०-२४० वाघ आहेत.

पण  गंंभीर बाब म्हणजे वाघांची संख्या २०१४ पासूून सुमारे ३० टक्क्यानी वाढली असली तरी, त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे सध्या अहवालात दाखवली जाणारी वाढ ही मृत्य वाघांच्या संख्येच्या तुलनेत जास्त नाही.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: