ब्रेनविश्लेषण : भारतातील माता मृत्यू गुणोत्तरात घट !

भारतातील माता मृत्यूंविषयी प्रकाशित झालेल्या अधिकृत अहवालानुसार, देशातील माता मृत्यूंच्या आकडेवारीत सलग घट झाली असून, २०१५-१७ मधील १२२ माता मृत्यू गुणोत्तराच्या तुलनेत २०१६-१८ या कालावधीत ११३ माता मृत्यू गुणोत्तराची नोंद झाली आहे.

 

ब्रेनविश्लेषण | सागर बिसेन

२०१६ ते २०१८ या कालावधीत भारतातील माता मृत्यू गुणोत्तर (MMR : Maternal Mortality Ratio) २०१५-१७च्या तुलनेत सुमारे ७.३ टक्क्यांनी कमी होऊन ११३ इतका झाला असल्याची माहिती समोर आली. ‘नमुना नोंदणी प्रणालीच्या महानिबंधक कार्यालया’तर्फे (Office of Registrar General’s Sample Registration System) २०१६-१८ या काळात झालेल्या भारतातील माता मृत्यूंविषयी अधिकृत अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार, देशातील माता मृत्यूंच्या आकडेवारीत सलग सकारात्मक बदल दिसत असून, २०१५-१७ मधील १२२ माता मृृत्यूदराच्या तुलनेत २०१६-१८ या कालावधीत ११३ माता मृत्यू गुणोत्तराची नोंद झाली आहे.

माता मृत्यूंविषयीच्या या अहवालानुसार, २००७-०९ या कालावधीतील माता मृत्यूंच्या (२१२) तुलनेत २०१६-१८ दरम्यान तब्बल १०० माता मृत्यू कमी झाले आहेत. २०१४-१६ व २०१५-१७ या दोन वर्षांच्या कालावधीत देशातील माता मृत्यू गुणोत्तर अनुक्रमे १३० व १२२ इतका होता. म्हणजेच, २०१४-१६ ते २०१६-१८ या दरम्यान माता मृत्यूंमध्ये १३.०८ % घट झाली आहे.

● राज्यनिहाय स्थिती

या अहवालात राज्यनिहाय माता मृत्यू गुणोत्तरांची आकडेवारीही प्रकाशित करण्यात आली असून, माता मृत्यूंच्या बाबतीत आसाम (२१५), बिहार (१४९) या राज्यांची स्थिती अजूनही गंभीर आहे.

माता मृत्यू कमी करण्यात महाराष्ट्राची कामगिरी उत्तम असून, २०१६-१८ या कालावधीत महाराष्ट्राचे गुणोत्तर ४६ आहे. तसेच, दाक्षिणात्य राज्यांची कामगिरीही या बाबतीत चांगली असून, कर्नाटक वगळता या राज्यांत माता मृत्यूंचे प्रमाण ७० पेक्षाही कमी आहे – आंध्रप्रदेश (६४), तेलंगणा(६३), कर्नाटक (९२), केरळ (४३) आणि तामिळनाडू (६०).

वाचा : ब्रेनविश्लेषण : भारत क्षयरोग अहवाल २०२०

● सर्वांत जास्त माता मृत्यू २०-३० वयोगटातील

अहवालात प्रकाशित आकडेवारीनुसार, २०१६-१८ दरम्यान सर्वांत जास्त माता मृत्यू २०-२४ वर्षे व २५-२९ वर्षे वयोगतील आहेत. २०-२४ वर्षे वयोगटात ३३%, तर २५-२९ वर्षे वयोगटातील माता मृत्यूंचे प्रमाण ३२% आहे.

हेही वाचा : ‘कोव्हिड-१९’मुळे आफ्रिकेत पाच लाख एड्सग्रस्त दगावण्याची शक्यता

● माता मृत्यू आणि माता मृत्यू गुणोत्तर

एखाद्या प्रदेशातील महिलांच्या प्रजनन स्वास्थ्याच्या मापणासाठी ‘माता मृत्यू’ (Maternal Mortality) हे महत्त्वाचे साधन आहे आणि ‘माता मृत्यू गुणोत्तर’ (MMR) हे या माता मृत्यूंचे महत्त्वाचे निर्देशक (Key Indicator) आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत जन्म घेणाऱ्या प्रती १,००,००० जिवंत बालकांमागे त्याच कालावधीत मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजे ‘माता मृत्यू गुणोत्तर’. संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येयांपैकी लक्ष्य ३.१ (SDGs – 3.1) अंतर्गत वैश्विक स्तरावर माता मृत्यू गुणोत्तर प्रति एक लाख जिवंत बालकांमागे ७० पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे, एखाद्या प्रदेशातील महिलांच्या प्रजनन आरोग्याच्या मापणासाठी माता मृत्यू हे महत्त्वाचे साधन आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, गरोदरपणाच्या काळात किंवा गर्भधारणा संपुष्टात आल्याच्या ४२ दिवसांच्या आतमध्ये गर्भधारणा किंवा संबंधित व्यवस्थापनाशी निगडित कारणांमुळे महिलेचे मृत्यू होणे म्हणजे ‘माता मृत्यू‘ होय.

मागील महिन्यात केंद्र शासनातर्फे देशातील माता मृत्यू दर कमी करण्यासाठी व माता आरोग्याशी संबंधित उपाययोजना सुचविण्यासाठी जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. येत्या ३१ जुलैला हा कृतीदल आपला अहवाल सादर करेल.

 

Join @marathibraincom

आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !

अशाच माहितीपर व विश्लेषणात्मक बातम्यांसाठी थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: