रेल्वेने जाहीर केली महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे ; जाणून घ्या सर्वकाही

ब्रेनविश्लेषण | २१ मे

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW) व केंद्रीय गृह मंत्रालय (MHA) यांच्याशी सल्लामसलत करून रेल्वे मंत्रालयाने 01 जून 2020 पासून भारतीय रेल्वेची सेवा अंशतः सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत भारतीय रेल्वे 200 प्रवासी गाड्या सुरु करणार असून, या गाड्यांसाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र शासनाने जाहीर केली आहेत. तसेच, या सर्व गाड्यांचे आरक्षण 21 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. मात्र सर्व मेल / एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी सेवांसह इतर नियमित प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत रद्द असतील.

गाडीचा प्रकार : नियमित गाड्यांच्या धर्तीवर विशेष गाड्या

या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित या दोन्ही वर्गातील पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील. सामान्य डब्यातही बसण्यासाठी आरक्षित जागा असेल. गाडीमध्ये कोणताही डबा अनारक्षित राहणार नाही. तर, सर्वसाधारण डब्यातील आरक्षणानुसार तिकीट दर सामान्य असतील आणि सर्व प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्था असेल आणि त्याचे भाडे आकारले जाईल.

तिकीट आरक्षण आणि प्रवासी तक्ता

‘भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ’च्या (IRCTC) संकेतस्थळाद्वारे किंवा मोबाइल अनुप्रयोगाद्वारे केवळ ऑनलाईन ‘ई-तिकीट’ आरक्षण केले जाईल. कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीवरून तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. ‘मध्यस्थी’ (आयआरसीटीसी दलाल आणि रेल्वे दलाल दोघे) यांच्यामार्फत तिकिट आरक्षित करण्यास परवानगी नाही.

– आगाऊ आरक्षण कालावधी (ARP : Advance Reservation Period) जास्तीत जास्त 30 दिवस असेल.

– कोणतीही आरक्षित नसलेली तिकिटे दिली जाणार नाहीत आणि तसेच, प्रवाशाला गाडीत चढल्यावर प्रवासादरम्यान तिकिट दिले जाणार नाही.

– गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या कमीतकमी 4 तास आधी पहिला प्रवासी तक्ता तयार केला जाईल व दुसरा तक्ता गाडी सुटण्यापूर्वी किमान 2 तास आधी (सध्याच्या 30 मिनिटांऐवजी) तयार केला जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या  तक्त्याच्या तयारी दरम्यान फक्त तात्काळ ऑनलाइन आरक्षणाला परवानगी असेल.

– गाडीत चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग होईल आणि फक्त रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.

● विशेष सेवांनी प्रवास करणारे प्रवासी खालील खबरदारीचे पालन करतील

1. केवळ पुष्टीकृत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.

2. गाडीत चढताना आणि प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी चेहऱ्यावर मास्क घातला पाहिजे.

3. स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवासी कमीतकमी 90 मिनिटे आधी स्थानकावर पोहोचेल. रोगाची लक्षणे न आढळणाऱ्या प्रवाशांनाच केवळ प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

4. प्रवाशांनी स्थानकावर आणि रेल्वेमध्ये सुरक्षित अंतराचे पालन केले पाहिजे.

5. त्यांच्या गंतव्यस्थानावर आगमन झाल्यानंतर प्रवाशांना तेथील राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे लागेल.

राखीव जागा परवानगी

नियमित गाड्यांप्रमाणे या विशेष गाड्यांमध्ये सर्व राखीव जागांना परवानगी देण्यात येईल. यासाठी मर्यादित संख्येत आरक्षण (पीआरएस) खिडकी सुरु ठेवल्या जातील. तथापि, या खिडकीवर सामान्य तिकिट आरक्षण करता येणार नाही.

सवलती

– या विशेष गाड्यांमध्ये चार प्रकारांच्या दिव्यांगजण सवलती आणि 11 प्रकारच्या रुग्ण सवलतींना परवानगी आहे.
– गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गाडीत चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग होईल आणि फक्त रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.
– तपासणी दरम्यान एखाद्या प्रवाशाला खूप ताप आणि ‘कोव्हिड-१९’ इत्यादी लक्षणे आढळल्यास तिकीटाची पुष्टी केलेली असूनसुद्धा त्याला प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

अशा परिस्थितीत प्रवाशांना संपूर्ण परतावा खालीलप्रमाणे दिला जाईल –

(i) प्रवासी नाव आरक्षणावर (पीएनआर) एकल प्रवासी

(ii) तिकिटावर जर एखादा प्रवासी प्रवास करण्यास अयोग्य आढळला असेल आणि त्याच पीएनआरवरील इतर सर्व प्रवाशांना त्यावेळी प्रवास करण्याची इच्छा नसेल, तर सर्व प्रवाशांना संपूर्ण परतावा देण्यात येईल.

(iii) तिकिटावर जर एखादा प्रवासी प्रवास करण्यास अयोग्य वाटला असेल आणि पीएनआरवरील इतर प्रवाशांना त्या प्रवासाची इच्छा असेल, तर प्रवासाची परवानगी नसलेल्या प्रवाशाला संपूर्ण परतावा देण्यात येईल.

प्रातिनिधिक छायाचित्र

हेही वाचा : ‘श्रमिक विशेष’ गाड्यांतून १२ लाख प्रवासी घरी पोहचले

भोजन सेवा

भाड्यात कोणतेही भोजन शुल्क समाविष्ट केले जाणार नाही. जेवण मागविण्याची आगाऊ आरक्षण तरतूद, ‘ई-खानपान’ हे उपलब्ध नसेल. तथापि, ज्या गाड्यांमध्ये भोजनाचा डबा जोडलेला आहे, त्या मर्यादित गाड्यांमध्येच पैसे आकारून आयआरसीटीसी, मर्यादित भोजन व सीलबंद पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देईल. या संदर्भातील माहिती तिकिट आरक्षणाच्या वेळी प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

– प्रवाशांना त्यांचे स्वतःचे खाद्यपदार्थ व प्यायचे पाणी नेण्यास प्रोत्साहन देण्यात येईल.

– रेल्वे स्थानकांवरील सर्व स्थिर उपहार स्टॉल व व्हेंडिंग युनिट्स (बहुउद्देशीय स्टॉल्स, पुस्तकांचे स्टॉल्स, औषधांचे स्टॉल्स इत्यादी) खुले राहतील. फूड प्लाझा आणि विश्रामगृहात शिजवलेले पदार्थ बसून खाता येणार नाहीत, फक्त पार्सल बरोबर घेऊन जाऊ शकतात.

अंथरूण- पांघरूण 

– गाडीमध्ये अंथरूण-पांघरूण, पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांना प्रवासासाठी स्वतःचे पांघरूण घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या उद्देशाने वातानुकूलित डब्यातील तापमान योग्य प्रकारे नियमित केले जाईल.

सोबतच, सर्व प्रवाशांनी ‘आरोग्य सेतू अनुप्रयोग’ (Aarogya Setu App) डाऊनलोड करुन वापरणे आवश्यक आहे. प्रवाशांना कमी वजनाच्या सामानासह प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांना, तसेच रेल्वे स्थानकात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहन चालकास ई-तिकीटाच्या आधारे परवानगी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: