‘सायबर गुंडगिरी’ विरोधी फिचरसह इन्स्टाग्रामची सात नवी अद्यतने
ब्रेनवृत्त, १५ मे
फोटो शेअरिंग अनुप्रयोग ‘इन्स्टाग्राम‘ने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी सात नवीन वैशिष्ट्ये (फिचर) आणि अद्ययने (अपडेट्स) आणली आहेत. सायबर गुंडगिरी (Cyber Bullying) कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे फीचर्स तयार केले आहेत. या वैशिष्ट्यांद्वारे इन्स्टाग्राम वापरकर्ते आता त्यांच्या पोस्टवरील अनावश्यक टिप्पण्या काढून टाकू (डिलीट) शकतील, टिप्पण्यांवर (कमेंट्स) मर्यादा घालू शकतील, तसेच टॅगिंगला परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची, असे फीचर्सही वापरू शकतील.
‘समुदाय मानक अंमलबजावणी‘च्या (कम्युनिटी स्टैंडर्ड्स इंफोर्समेंट) अहवालानुसार, कंपनीने आपले व्यासपीठ अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवा पसरवण्याबरोबरच सायबर गुंडगिरीचा (सायबर बुलिंग) नवा ट्रेंडही सुरू झाला आहे. यामुळे वापरकर्ते त्यांचे मत पोस्ट करू शकत नाहीत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कंपनीने त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल केले आहेत.
हेही वाचा : भारतात लवकरच सुरू होतंय ‘व्हाट्सऍप पे’!
● एकाचवेळी अनेक कमेंट्स डिलीट करण्याचा पर्याय
पूर्वी इन्स्टाग्रामवर एकेक कमेंट्स डिलीट करता येत होती. परंतु, नवीन फीचर्समुळे वापरकर्त्यांना आता एकाचवेळी अनेक कमेंट्स डिलीट करता येतील. सध्या हे वैशिष्ट्य आयओएस वापरकर्त्यांसाठी सुरू केले आहे. त्यानंतर, लवकरच हे फीचर अँड्रॉइड मोबाईलसाठीही जारी केले जाईल. एकाचवेळी अनेक कमेंट्स डिलीट करण्यासाठी वापरकर्त्यांना उजव्या कोपर्यातील तीन ठिपक्यांवर टॅप करून ‘टिप्पण्या व्यवस्थापित करा’ (मॅनेज कमेंट्स) हा पर्याय निवडायाचा आहे. या पर्यायामुळे वापरकर्ते एकाच वेळी २५ कमेंट्स निवडून त्या डिलीट करू शकतात.
वाचा : सायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण!
● ‘अँटी सायबर बुलिंग’ फिचर
अँटी बुलिंगसाठीही कंपनीने एक फिचर जारी केले आहे. याद्वारे, कोणते वापरकर्ते एखाद्या इन्स्टाग्राम वापरकर्त्याला टॅग करू शकतात, याचे सर्व अधिकार त्या वापरकर्त्याला दिले आहेत. त्यामध्ये तीन पर्याय असतील, ‘प्रत्येकजण’ (Everyone), दुसरा ‘केवळ आपण अनुसरण करीत असलेले लोक’ (Only People You Follow) आणि तिसरा, ‘कोणीही नाही (No One)’ असे पर्याय वापरकर्ता निवडू शकतो.
सोबतच, आता काही निवडक खात्यांमधून काही कमेंट्सल प्रतिबंधित करता येतील. हे करण्यासाठी, वापरकर्त्यांना फोटोंच्या कमेंट्स विभागात जाऊन उजव्या कोपर्यातील तीन ठिपक्यांवर टॅप करावे लागेल. यात ‘टिप्पणी व्यवस्थापन’मध्ये (Comments Management) ‘अधिक पर्याय’ चा पर्याय दिसेल. यामध्ये वापरकर्त्याला त्याच्या पोस्टवर कमेंट्स नको असलेली खाती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हे फिचर अँड्रॉइड आवृत्तीसाठीही प्रसिद्ध केले गेले आहे.
◆◆◆