अखेर उर्वरित आयपीएलचा मुहूर्त ठरला!
ब्रेनवृत्त । नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) व्हिवो आयपीएल २०२१ च्या उर्वरित सत्राच्या आयोजनाची आज घोषणा केली. आयपीएलचे सर्व उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळले जाणार आहेत. एकूण २७ दिवसांमध्ये उर्वरित ३१ सामने पार पडतील.
कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या जीवघेण्या उद्रेकामुळे आयपीएलच्या १४ व्या सत्राला काही दिवसांतच मे महिन्यात स्थगित करण्यात आले होते. ह्या स्पर्धेचे उर्वरित सत्र आता येत्या १९ सप्टेंबरपासून युएईत आयोजित केले जाणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे. या सत्राची सुरुवातच दुबईमध्ये चेन्नई सुपर किन्स (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यातील धडाकेबाज सामन्याने होणार आहे.
आयपीएल २०२१ च्या उर्वरित सत्रात एकूण २७ दिवसांत एकूण ३१ सामने खेळले जातील. यांपैकी १३ सामने दुबईत, १० शारजाह आणि ८ सामने अबू धाबीत खेळले जातील. अबू धाबीत पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) यांच्या रंगणार आहे, तर शारजाहमधील पहिला सामना २४ सप्टेंबर रोजी आरसीबी आणि सीएसके यांच्यात होईल.
ऑलम्पिकवरही कोरोनाचे ग्रहण : आढळला पहिला रुग्ण
२७ दिवसांपैकी ७ दिवशी दोन सामने खेळले जातील. त्यांतील पहिला सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल, तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाईल. लीग फेरीतील अंतिम सामना आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ८ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये नियोजित आहे.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in