विधानसभेच्या मुहूर्तावर व्यंगचित्रांतून अशीही जनजागृती ! 

ब्रेनवृत्त | गोपाळ दंडगव्हाळे             

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली हे चार विधानसभा मतदार संघ येतात. या चार मतदार संघांपैकी कल्याण पूर्व हा भाग कित्येक दशकांपासून विकासापासून वंचितच राहिला आहे. खरंतर, महाराष्ट्राच्या नकाशावर कल्याण शहराची एक ऐतिहासिक शहर म्हणून, तर डोंबिवलीची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. याच जुळ्या ‘कल्याण व डोंबिवली’ शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाली होती. मात्र, वर्तमान स्थितीत खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते, ठिकठिकाणी जमा असेलेले कचऱ्याचे ढिग, वाहनकोंडी या कल्याण पूर्वेकरांच्या पाचवीलाच पुजलेल्या समस्या आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण विकासिनी संस्थेने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मतदारांना जागरूक करण्याची चळवळ सुरू केली आहे.

कल्याणच्या पूर्व भागातील अशा आणि यांसारख्या इतर अनेक अन्य समस्यांवर परखड भाष्य व्यंगचित्रांच्या माध्यमातून सध्या कल्याण पूर्वेत होत आहे. शब्दांपेक्षा कैकपटीने अधिक सामर्थ्य चित्रात असते, असं म्हणतात. म्हणूनच याच चित्रांचा वापर करून कल्याण पूर्व भागातील नागरी समस्या ‘कल्याण विकासिनी’ या संस्थेने संबंधित चित्रांसह समाजमाध्यमांतून जनजागृतीचे कार्य करण्याचे हाती घेतले आहे. सोबतच, विविध प्रकारच्या व्यंगचित्रांना जागोजागी लावून शहरातील मुख्य समस्या समोर मांडल्या आहेत.

कल्याण पूर्वेतील जिम्मीबागेत दुकानफोडीची घटना

येत्या ऑक्टोबर महिन्यात पार पडणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, “कल्याण पूर्वेकरांना खरंच नागरी सोयी-सुविधा हव्या असतील, तर ऐकणारे, बोलणारे आणि बघणारे मतदार बना !” असे आवाहन या व्यंगचित्रांच्या माध्यमातून कल्याण विकासिनी संस्थेने स्थानिक जनतेला व मतदारांना केले आहे. अर्थातच, वास्तविक समस्या आणि ज्या प्रश्नांनी स्थानिक नागरिक हैराण आहे, अशा विषयांना अगदी हिंमतीने आणि आगळ्यावेगळ्या पध्दतीने या सामाजिक संस्थेने हात घातला आहे.

रस्त्यांवरील खड्डे, कचरा समस्या, वाहतूक कोंडी, सुसज्ज रुग्णालयांचा अभाव, लहानग्यांसाठी उद्याने-मैदाने नसणे, पाणीसमस्या, गटारे-नाल्यांची समस्या, विजबिलातून होणारी ग्राहकांची लूट यांसारख्या अनेक समस्या कल्याण पूर्वेकरांना भेडसावत आहेत.  यांसारख्या गंभीर समस्यांवर व्यंगचित्र रेखाटून कल्याण विकासिनी संस्थेने नागरिकांच्या व्यथा आणि सद्यस्थितीवर परखड भाष्य केले आहे. त्यामुळे फेसबुकवर प्रसिद्ध होणाऱ्या या व्यंगचित्रांना उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना निवडणून देण्याआधी संबंधित समस्यांचा विचारतरी लोकांनी डोक्यात आणावा, हेच यातून सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, अशा अनेक गंभीर आणि स्थानिक जनप्रतिनिधींकडून दुर्लक्ष करण्यात आलेल्या नागरी समस्यांना कंटाळून बहुतेक कल्याण पूर्वमधील नागरिक पश्चिम भागात स्थलांतरित होऊ लागले आहेत. परंतु नाजूक आर्थिक परिस्थिती असल्यामुळे स्थलांतर करू न शकणारे बहुसंख्य नागरिक मात्र आजही या समस्यांमध्ये खितपत पडून आहेत. दरम्यान, “नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी जागृत होऊन भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ऐकावे, बघावे, बोलावे आणि मग निर्भीडपणे मतदान करावे”, असे आवाहन कल्याण विकासिनी संस्थेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक आणि ‘ड’ प्रभाग समितीचे माजी सभापती उदय रसाळ यांनी कल्याण पूर्वेकारांना केले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: