लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या : विधानसभाध्यक्ष नाना पटोले
जेष्ठ साहित्यिक व समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र शासनातर्फे ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात यावे यासाठी मागणी करावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे
ब्रेनवृत्त | मुंबई
जेष्ठ साहित्यिक व समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र शासनातर्फे ‘भारतरत्न‘ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात यावे यासाठी मागणी करावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. लोकशाहीर, साहित्यरत्न दिवंगत अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची १ ऑगस्ट २०२० रोजी सांगता होत आहे. अण्णाभाऊंनी आपल्या प्रत्ययकारी लेखनप्रतिभेने कथा, कादंबरी, पोवाडा, पटकथा, प्रवासवर्णन आदी. विविधांगी साहित्याद्वारे शोषित-वंचित समाजघटकांची व्यथा, वेदना समर्थपणे मांडल्या.

मुंबईत वास्तव्यात असताना कामगार- श्रमिकांचे लढे तसेच भारतीय स्वातंत्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम यात अण्णाभाऊंनी सहभागी होत आपल्या शाहिरीद्वारे मोठी जनजागृती घडवली. ‘फकिरा’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीसह अन्य कथा, कादंबऱ्याही बऱ्याच गाजल्या व अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
साहित्यरत्न दिवंगत अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची यंदा १ ऑगस्टला सांगता होत आहे. त्यामुळे, त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराव्दारे सन्मानित करण्यात यावे, अशी भावना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांच्यावतीने व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेवून आदरणीय अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी शिफारस या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
◆◆◆
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे