आजपासून ‘टिलीमिली’द्वारे दररोज भरणार पहिली ते आठवीचे वर्ग !

राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलिमिली’ या उपक्रमानंतर्गत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून आजपासून नियमितपणे शैक्षणिक मालिका सुरू होत आहे. शालेय शिक्षणाला समर्पित एकूण ४८० भागांची ही दूरदर्शन शिक्षण मालिका आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

कोव्हिड-१९‘च्या संक्रमाणामुळे ठप्प झालेले शिक्षण क्षेत्र हळूहळू ऑनलाइन अथवा दृकश्राव्य माध्यमांच्या मदतीने पूर्वस्थितीत आणण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे. आजपासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज नियमित शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. “इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून २० जुलैपासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जाणार आहे”, असे त्या म्हणाल्या.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक क्षेत्र अजूनही पुर्णपणे चालू झालेले नाहीत. सोबतच, राज्यातील शाळाही बंद आहेत. त्यामुळे चालू सत्राचे वर्ग कधी भरणार याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. यावर तोडगा म्हणून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून सह्याद्री वाहिनीवर दररोज शिक्षण मालिका प्रक्षेपित केली जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. सोबतच, वर्ग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाचा : शालेय शिक्षणाला सुरुवात करायची! पण कशी?

● असे असेल दैनंदिन मालिकेचे स्वरूप

दररोज प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसांत ६० भागांमध्ये सादर केले जाणार आहेत. यासाठी दिवसभरात प्रत्येक इयत्तेला एक तास मिळणार आहे. सकाळी 7:30 वाजेपासून ही शाळा भरणार आहे. सर्वात पहिला आठवीचा तास भरणार आहे. त्यानंतर तासातासाने उतरत्या क्रमवारीत सातवी, सहावी, पाचवी, चौथी, तिसरी, दुसरी आणि पहिलीचा तास भरेल.

छायाचित्र : mkclkf.org

प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे दहा आठवडे हा उपक्रम चालणार आहे. या मालिकेचे नाव ‘टिलीमिली’ असून, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) व ‘एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शैक्षणिक मालिका प्रक्षेपित करण्यात येत आहे.

वाचा : शासनातर्फे ऑनलाईन वर्गांविषयी शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

दरम्यान, असे असले तरी राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न सुटेलच असे नाही. कारण, ज्या विद्यार्थ्यांच्या घरी दूरचित्रवाणी (टीव्ही) अथवा चलभाषयंत्र (मोबाईल फोन्स) नाहीत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अथवा विद्यार्थ्यांनी या स्थितीत काय करावे, हा प्रश्न आहे. शासनाकडून याविषयी ठोस निर्णय अद्याप नाही. तसेच दुसरीकडे, शासन आपली शिक्षण पुरवण्याची जबाबदारी ऑनलाइन वा दृकश्राव्य माध्यमांतून पार पाडते आहे. मात्र या सोयी-सुविधांकडे राज्यातील विद्यार्थी व पालकवर्ग किती गांभीर्याने बघतील व फायदा घेतील याविषयी काही निश्चित नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: