ब्रेनवृत्त | मुंबई
२८ जून २०१९
दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर पुढील एका महिन्यात बंदी लागू होणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल विधानसभेत दिली. प्लॅस्टिकबंदी अंमलबजावणी संदर्भात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
राज्यात मागील वर्षी प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली होती, मात्र दुधाच्या प्लास्टिक पिशव्या अद्याप वापरात आहेत. या विषयाकडे काल विधानसभेत सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास यांनी एका महिन्यात दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी लागू होणार असल्याची घोषणा केली. दुधाची पिशवी घेताना ५० पैसे जमा करायचे आणि पिशवी परत देताना ५० पैसे परत द्यायचे, या योजनेला दूध कंपन्यांनी होकार दिला असल्याची महितीही त्यांनी दिली.
मागील वर्षीच्या प्लास्टिकबंदीचा आढावा देताना कदम मम्हणाले की, ‘प्लास्टिकबंदीपूर्वी राज्यात १२०० टन कचरा निर्माण होत होता. बंदीनंतर यातील ६०० टन प्लास्टिक कचरा कमी झाला. राज्यभरात गुजरातमधून तब्बल ८० टक्के प्लास्टिक येते.’ ही आवक बंद करण्यासाठी स्वतः गुजरात सीमेवर जाऊन कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. तर, परराज्यातून येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक घेऊन येतात, रेल्वेच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात आणले जातात, असे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
● राज्यातील प्लास्टिकबंदी
राज्यात दर दिवशी १ कोटी दुधाच्या प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर येतात. त्यातून ३१ टन इतका प्लास्टिक कचरा तयार होतो. मागच्या वर्षी अंमलबजावणी करण्यात आलेल्या बंदीनंतर १ लाख २० हजार २८६ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्यावेळी ६ हजार ३६९ दुकानांवर कारावाई झाली, तर सुुमारे ४ कोटी १२ लक्ष २० हजार रुपये एवढा दंड आकारण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या नियमांचा देशातील इतर राज्यांनीही अवलंब करावा, असे केंद्राने सुचवले आहे.
◆◆◆
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.