२२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल : काय सुरु आणि काय बंद?

ब्रेनवृत्त । मुंबई


राज्यातील एकूण ३६ पैकी २२ जिल्ह्यांमधील कोव्हिड-१९चे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने काल (सोमवारी) घेतला. यानुसार १४ जिल्हे वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये बहुतांश घडामोडींना परवानगी देण्यात आली आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये रविवार सोडून बाकी दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने व मॉल्स सुरु राहू शकतील, तर सिनेमागृहे बंदच ठेवण्यात निर्णय शासनाने घेतला आहे. 

प्रतिनिधिक छायाचित्र

जग करतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश!

● काय सुरु राहील आणि काय बंद?

राज्यातील १४ जिल्हे वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये लागू असलेल्या कोव्हिड-१९ संबंधित निर्बंधांमध्ये शासनाने मोठ्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. त्याबाबतची नियमावली खालीलप्रमाणे आहे

  1. सर्व अत्यावश्यक असलेली व नसलेली दुकाने (खरेदी मॉल्ससह) सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री ८ पर्यंत उघडी राहू शकतील. मात्र, शनिवारी ह्या सर्व बाबी दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरु राहतील, तर रविवारी पूर्णतः बंद राहतील.
  2. चित्रपटगृहे, रंगमंच आणि बहूचित्रपटगृहे (मल्टिप्लेक्सेस) पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील.
  3. सार्वजनिक उद्याने व क्रीडांगणे व्यायाम, सायकलस्वारी, चालणे व धावण्यासाठी सुरु ठेवता येतील.
  4. शासकीय व खासगी कार्यलये पूर्ण क्षमतेसह सुरु राहू शकतात. तथापि, प्रवासादरम्यान गर्दी टाळण्यासाठी म्हणून त्यांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्यात.
  5. शेतीची कामे, बांधकामे व सार्वजनिक नागरी कामे तसेच वस्तूंची दळणवळण पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवता येऊ शकते.
  6. ज्या कार्यालयांची (ऑफिसेस) कामे ‘घरूनच’ (वर्क फ्रॉम होम) होत आहते, त्यांनी शक्यतोवर ती तशीच सुरु ठेवावीत.
  7. व्यायामशाळा (जिम्नॅसियम्स), योग केंद्रे, केसकर्तनालये (सलून), सौंदर्यवर्धनालये (ब्युटी पार्लर) सोमवार ते शुक्रवार या दरम्यान रात्री ८ पर्यंत सुरु राहू शकतात, तर शनिवारी त्यांना दुपारी ३ पर्यंतच परवानगी असेल. रविवारी ते पूर्णतः बंद असतील.
  8. राज्यातील सर्व पूजा-प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील.
  9. शाळा आणि महाविद्यालयांना राज्याच्या शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश लागू असतील.
  10. खानावळी (रेस्तराँ) सोमवार ते शुक्रवार दरम्यान ५०% बैठक क्षमतेसह दुपारी ३ पर्यंत सुरु राहू शकतील. दरम्यान, घरपोच सेवा आधीप्रमाणेच सुरु असेल.
  11. रात्री ९ ते सकाळी ५ पर्यंत हालचालीवर असलेले निर्बंध मात्र कायम राहतील.
  12. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी म्हणून वाढवदिवस समारंभ तसेच राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर लादण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.  

सोबतच, मुखपट्टीचा (फेसमास्क) नियमित वापर करणे व सामाजिक अंतर पाळण्यासह कोव्हिड-१९ च्या सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे, असे शासकीय आदेशात म्हटले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५, साथरोग कायदा व भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात  येणार आहे.

हेही वाचा | राज्यांमध्ये परत कडक निर्बंधांची शक्यता?

राज्यातील इतर १४ राज्यांपैकी ११ राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्याची कोव्हिड टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू राहील. अशा जिल्ह्यांमध्ये दुकाने, व्यायामशाळा आणि केसकर्तनालये आधीप्रमाणे दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच, चित्रपटगृहे व मॉल्स बंदच राहतील. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यांतील निर्बंधांसंबंधीचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांद्वारे घेण्यात येतील.

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: