महाराष्ट्राची केरळला नर्स व डॉक्टरांची मागणी !

ब्रेनवृत्त | मुंबई

महाराष्ट्रात कोरोना विषाणू बधितांची संख्या वाढतच असून, मुंबई आणि पुणेसारख्या शहरांमध्ये भविष्यातही या महामारीच्या रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे चिन्ह आहेत. या पार्श्वभूमीवर आगाऊ नियोजन म्हणून महाराष्ट्र शासनाने केरळ राज्य शासनाकडे तज्ज्ञ डॉक्टर व परिचरिकांची मागणी केली आहे. राज्याच्या आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांनी याविषयी केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी पत्र पाठवून विनंती केली आहे.

कोव्हिड-१९‘मुळे महाराष्ट्राची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. देशात ‘कोव्हिड-१९’ सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामुळे भविष्यात वाढत जाणारा कोरोना विषाणूचा घाला आणि त्यावर लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केरळला मदतीचा हात मागितला आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित परिचारिका (नर्सेस) पाठविण्याची विनंती राज्याने केली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने यांनी केरळच्या आरोग्य मंत्र्यांना याविषयी विनंती पत्र पाठवले आहे. भविष्यात पुणे आणि मुंबईत रूग्णांची संख्या वाढणार असल्याने राज्यात आणखी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची गरज पडणार आहे.

विनंती पत्रात किमान 50 तज्ज्ञ डॉक्टर आणि 100 नर्स महाराष्ट्राला देण्याच्या विनंती लहाने यांनी केली आहे. याअंतर्गत राज्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचारांना चांगले मानधन मिळणार आहे. एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार, तज्ज्ञ डॉक्टरांना 20 लाख, तर नर्संना 30 हजार मानधन मिळेल. केरळहून आलेल्या ह्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाचे, जेवणाची आणि योग्य ती सुरक्षा देण्याची हमीही महाराष्ट्र शासनाने दिली आहे.

देशात सर्वप्रथम कोरोना विषाणूचा होकारात्मक रुग्ण केरळ राज्यात आढळला होता. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या केरळमध्ये झपाट्याने वाढली. मात्र, त्यानंतर केरळच्या शासनाने कडक उपाययोजना करत ‘कोव्हिड-१९‘वर यशस्वी नियंत्रण मिळवले आहे. यामुळेच, कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केरळने कशी योजना राबवली याचीही माहिती व सोबतच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी राज्याने केरळला केली आहे.

दरम्यान, महाराष्‍ट्र शासनाने मुंबईतील महालक्ष्‍मी रेसकोर्स भागात 600 खाटांचे ‘कोव्हिड-१९’ रुग्णालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यात 125 खाटांचे अतिदक्षता गृहही (ICU) असेल. कोरोनाची मध्‍यम लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना येथे ठेवण्यात येणार आहे.

● राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ५० हजार पार

राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार गेला आहे. काल एकाच दिवशी 3,041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर ११९६ रुग्ण कोरोनामुुुक्त झाले. राज्यातील मृत्यूंची संख्या 1635 इतकी झाली आहे, तर आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: