‘मासिकपाळी : स्त्रीसाठी सर्वांत पवित्र गोष्ट’ : भाग १

ब्रेनसाहित्य दिपाली बिडवई


सकाळचे साडे नऊ झाले होते, नाष्टा करून निवांतपणे क्लासमध्ये जाण्यासाठी तयारी करत असतानाच एक अनपेक्षित कॉल आला!.

(स्क्रीनवर पाहते तर बहिणीच्या कॉलेजच्या मॅडमचा कॉल होता! )

 ‘हॅलो! अनन्या आहे का?’

 ‘हो! बोलाना मॅडम…! मी अनन्याच बोलत आहे.’

 ‘अगं, तुझ्या बहिणींचे खूप पोट दुःखत आहे. तू कॉलेजमध्ये येतेस का ? म्हणजे मग तू तिला योग्यप्रकारे आराम करण्यासाठी घरी घेऊन जाशील ?’

‘हो. मॅडम ! जास्त काही नाही ना ?’

‘नाही… पण तू लवकर ये फक्त’

‘हो आलेच… १० मिनिटं.’

मोठी बहीण म्हणून रस्त्यानं प्रवास करताना आणि तिला घरी घेऊन येताना चिंतेच काहूर मनात घरटं घालत होतं, कारण तीला आईने सकाळीच बजावले होते थोडा त्रास होतोय बाळा ! तर आज जाऊ नकोस म्हणून. पण ऐकेल ती आमची ही समृद्धी कसली. तिला एकदिवसही कॉलेजला सुट्टी घेतलेली जमत नाही किंवा तुम्ही असं म्हणू शकता की, ते तिच्या तत्वातच बसत नाही, म्हणजे नाहीच.

तिला घरी घेऊन आल्यावर तिच्या रूममध्ये घेऊन गेले आणि आईनेही तिची सेवा करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. तेव्हा तिच्या रूममधील घड्याळ बरोबर दहा वाजले असे सूचित करत होते, तिकडे डोळेझाक करत माझे सर्व लक्ष समृद्धीवर केंद्रीत केले. आता मात्र एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसे गंभीर मुद्रेने हलकेच मी म्हटले, “समृद्धी, चाल मी क्लासवरून येते ! तसेच आईला सांगूनही जाते की, तुला चहा, कॉफी, ग्रीन टी इ. करण्याऐवजी ‘देशी गायींचे दूध व शतावरी कल्प’ एकत्र करून दे म्हणून”. कारण ते मासिकपाळीमध्ये स्त्रियांसाठी विशेष उपयुक्त असतं ना!

समृद्धीने हसून ओशाळलेल्या स्वरात म्हटले, “अनन्या ! आज माझ्याच जवळ थांब ना ?” तिचे हे शब्द कानांवर पडताच कर्णरंध्रे भाजून निघाली , क्षणापूर्वीच निर्भय झालेल्या ह्र्दयात एकाएकी विषारी बाण घुसला. क्षणाचाही विलंब न करता होकारार्थी मान हलवत मी तिच्या जवळचं बसले. नंतर खाली स्वयंपाक घरात गेले, आईला दूध गरम करून शतावरी एकत्र करायला लावलं आणि परत तिच्या जवळ येऊन बसले.

बराच वेळ झाला तिचे नाजूक सौंदर्य न्याहाळत असताना तिच्या चेहऱ्यावरील वेगवेगळे भाव पाहत होते, तेव्हा मनात आलं इंद्रधनुष्याचे रंग मोजता येतात. पण समृद्धीच्या रंग- छटा कधी मोजता येतील का ?

‘अनन्या’ एक प्रश्न विचारते पण उत्तर देताना जरा इंग्रजी भाषेत सांग, कारण तुझी मराठी इतकी स्पष्ट आहे की मला समजायला जरा क्लिष्ट वाटते…प्लिज!

नाही !! कारण माहीत आहे “मातृभाषां परित्यज्य येऽन्यभाषामुपासते. तत्र यान्ति हि ते यत्र सूर्यो न भासते.”

‘हो आता अर्थ सांगू नकोस, माहीत आहे. जर मुलींना मासिकपाळीच्या वेळी अधिक प्रमाणात अंगावरून जात असेल तर -‘

‘ज्या मुलींना मासिक पाळीच्या वेळी अंगावरून अधिक जाण्याचा (Menorrhagia) त्रास होतो, त्यांनी सर्वात आधी डॉक्टरचा योग्य सल्ला घेऊन योग्य वेळेत तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच मसालेदार पदार्थ, लोणचे, पापड, दही, मांसाहार, यांचे सेवन कटाक्षाने टाळावे. केवळ या पथ्याने बराच फरक पडतो.’

तेवढ्यात आई शतावरीयुक्त दूध घेऊन खोलीत आली. समृद्धी दिङमूढ होऊन आईकडे पाहत राहिली. नंतर ती समूला ‘दूध पिऊन घे’ बोलून मायेचा हात फिरवत निघून गेली. ती दूध पिण्यासाठी उठली. तेव्हा तिची मुखमुद्रा शांत दिसत असली, तरी तिच्या मनात मासिकपाळी संबंधी प्रश्नांचे केवढे थैमान चालले आहे, याची कल्पना तत्क्षणी आली. स्त्रीच्या मनातील चक्रीवादळाची चाहूल एका दुसऱ्या स्त्रीला लागायची कुठे थांबते का ?

‘अनन्या आपण जे सॅनिटरी पॅड वापरतो त्या सर्व भारतीय जाहिरातींमध्ये सॅनिटरी पॅडवर निळा रंग दाखवला जातो. लाल रंग का नाही ? खरं पाहिलं तर मानवी रंग लाल आहे ना ?’

‘अगदी बरोबर ! समाजात मासिक पाळीबद्दल खुलेपणा आणि सहजता नसल्यानं हे असं होत आहे. मासिकपाळी हा विषय चारचौघांत न बोलण्याचा विषय समजला जातो. आपण सर्वांनी मिळून या समजुतींना आव्हान द्यायला हवं. मला व्यक्तिगत पातळीवर वाटते की, सामाजिकदृष्ट्या वर्ज्य मानल्या जाणाऱ्या विषयांवर जास्तीजास्त लोक व्यक्त झाले की ते विषय सामान्य होतात. त्यामुळे सॅनिटरी पॅडच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीही जाहिरातीत खरं सांगायला हवं. पण तसं काही होत नाही.’

‘काल रात्री जेव्हा तुझ्यासाठी सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी गेले तेव्हा ―

 “डॉक्टर, घरी पूजा आहे. पाळी लांबवण्याच्या गोळ्या हव्या होत्या…”

 श्रावण महिना सुरु झाला की सगळ्या मेडिकलमध्ये ऐकू येणारा हा हमखास संवाद!’

 सध्या जेव्हा स्त्रियांच्या देवळातल्या प्रवेशाबद्दल चर्चा सुरु आहे तेव्हा ह्या सर्वात महत्वाच्या मुद्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतेय. तो म्हणजे मासिक पाळी चालू असताना स्त्रीला दिली जाणारी संतापजनक वागणूक.

मासिक पाळी येणे हे जननक्षमतेचे लक्षण आहे. देवी ही जर आपण स्त्रीरुपातच बघतो तर तिला पाळी येत नसणार का? मग देवीचे दर्शन घेताना पाळी चालू असेल तर काय बिघडले? देवाला जायच्या आधी इतर शारीरिक धर्म आपण अंघोळ करून पूर्ण करत असू, तर पाळी चालू असताना आंघोळ करून दर्शनाला गेले तर काय फरक पडतो?

पण दुर्दैवाने आपल्या समाजातल्या सर्व स्त्रियांच्या मनावर मासिक पाळी म्हणजे अशुध्द, अस्वच्छ अशा अत्यंत चुकीच्या समजुतींचा पगडा इतका पक्का आहे की समजावून सांगूनही स्त्रिया ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.

सर्वात चिंताजनक परिस्थिती तर ही  आहे की, करियर करणाऱ्या, इंजिनीयर किंवा कधीकधी डॉक्टर असलेल्या महिलासुध्दा ह्या गैरसमजुतीतून बाहेर पडू शकत नाहीयेत. बऱ्याच जणींना हे चुकीचे आहे हे पटते , पण घरचे व बाहेरचे काही कर्मठ लोक ‘तू असं केलंस तर देवाचा कोप होईल’ वगैरे तथ्यहीन भयगंड ह्या महिलांना घालतात.

मुळातच मासिक पाळी का येते हे समजून घेणे महत्वाचे आहे. गर्भाशयाच्या आतील आवरण दर महिन्याला तयार होत असते. गर्भधारणा झाली तर तयार होणाऱ्या गर्भासाठी पोषक द्रव्ये मिळवीत म्हणून ही तयारी असते. गर्भधारणा झाली नाही तर हे आवरण पाळीच्या रूपाने निघून जाते.

मग हे रक्त अशुध्द कसे असेल? आता तर संशोधनाअंती असं सिध्द झालंय की, या रक्तात ‘स्टेम सेल्स’ असतात जे विविध पेशींमध्ये रुपांतरीत होऊ शकतात. म्हणजे नवनिर्मितीची सृजनशक्ती असलेल्या पेशी या पाळीच्या रक्तात असतात. काही आंतरराष्ट्रीय कंपन्या हे रक्त जमा करून त्यातून स्टेम सेल्स काढून घेण्यासाठी महिलांना आर्थिक मोबदलापण देण्यास तयार आहेत. आणि आपण मात्र जुन्या पुराण्या, बुरसटलेल्या समजुतींना कवटाळून बसलो आहोत.

मुळात, ह्या समजुती पसरवणाऱ्या मागे पुरुषप्रधान संस्कृतीचाच हात आहे. स्त्रीच्या शरीराला अपवित्र मानले, तिला त्या चार दिवसात अस्पृश्य मानले की तिचा आपोआप तेजोभंग होतो. तिला मानसिक आणि शारीरिकरित्याखचवण्याचा हा उत्तम उपाय त्यावेळच्या कर्मठ लोकांना सापडला असावा.

पाळीच्या वेळी विश्रांतीची गरज असते वगैरे हे युक्तीवाद धादांत ढोंगीपणाचे आहेत. आपल्या समाजात एरवी खरोखर आजारी असलेल्या स्त्रीलाही विश्रांती मिळत नाही, मग पाळीच्या वेळी गरज नसताना सक्तीची विश्रांती कशासाठी? या जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांच्या पगड्यांमुळे कित्येक स्त्रियांचे आयुष्य दुर्धर होऊन बसलेले आपण बघतो. कोणताही सण समारंभ अथवा यात्रा असेल तर त्यातील आनंद अनुभवायचा सोडून ‘तेव्हा माझी पाळी तर येणार नाही ना’ याच विचारात ह्या स्त्रिया चिंतातूर होतात. मग पाळी लांबवण्याच्या गोळ्या सतत घेणे सुरु होते. स्त्रियांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने या गोळ्या सारख्या घेणे हानिकारक असते. कधी कधी तर ह्या सगळ्याला कंटाळून ‘गर्भपिशवी काढून टाका’ अशीही मागणीही स्त्रिया करताना दिसतात. या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढायलाच हवे.

साधारणपणे पाळी चालू असताना खास विश्रांतीची काही गरज नसते.( गरज आहे की नाही हे त्या स्त्रीच्या स्वास्थ्यावर अवलंबून आहे) बिचाऱ्या कामावर जाणाऱ्या महिला सगळी कामे निमुटपणे करत असतात; फक्त देवाचा विषय आला की मग ह्या समजुती उफाळून येतात. हे सगळे कर्मकांड करणाऱ्यांचा सोयीचे आणि कमालीचे दांभिक आहे. मला असे वाटते की स्त्रियांनी ह्याही विषयाला वाचा फोडावी आणि ह्या बुरसटलेल्या हीन अंधश्रध्दांना मूठमाती देण्यासाठी जनजागर करावे.

‘अस सातत्याने वाटतं, माहीत आहे का समृद्धी? !!’

‘अनन्या ! सर्वजण ते खूप अशुद्ध असतं असं बोलतात.’

‘ समृद्धी! सर्वांत पवित्र काय असेल तर ती पाळी. नेहमी लक्षात ठेव.’

 ‘नियमितपणे सॅनिटरी पॅड वापरायला काही नाही पण त्यांच्या किंमती खूप आहेत ना ? त्यात त्यावर GST…’

 ‘म्हणून नेहमी बोलते – वर्तमान पत्र वाचत जा. जीएसटी परिषदेच्या २८व्या मिटिंगसंबंधी, Good news for women, no tax to be levied on sanitary napkins, ही Headline नाही वाचली का ? Finally! Govt is able to understand that Sanitary napkins are not a luxury item, but a necessity. समजलं का ? आता किंमती कमी होतील बघ.’

‘ सोबतच एखाद्या वस्तूची किंमत कमी होते, तेव्हा तिची मागणीही झपाट्याने वाढत असते ‘

आता ती सकाळच्या सहन न होणाऱ्या वेदनेतून बरीच बाहेर पडली होती. तिच्या चेहऱ्यावरील छटा सामान्य झाल्या होत्या.

तेव्हा एक क्षणही वाया नाही घातलं तिने पुढचा प्रश्न विचारला ― ‘तुला आठवत, जेव्हा तुला पहिली पाळी आली तेव्हा घरात छोट्याखाणी कार्यक्रम आयोजित केला होता?’

‘आठवत ना ? चांगलंच आठवतं. त्याच दिवशी शारीरिक बदलांवर शिक्षण आणि त्या दिवसांतली स्वच्छता कशी ठेवावी हे शिकवलं गेलं ना ? असे घरात वैयक्तिक पातळीवर कार्यक्रम आयोजित करून पालकांनी डॉक्टरांना बोलून त्यामुलींना योग्य माहिती देऊन सक्षम करायला हवं जसं आपल्या पालकांनी केलं आहे. हो की नाही?’

स्मित हास्य करत तिने विचारलं ― ‘ प्रत्येक महिन्याला किमान दोन दिवस ‘पिरियड लीव्ह’ कॉलेजमध्ये द्यायला हवी ना ?’

‘शाळकरी मुलींना किंवा महिलांना पाळीच्या काळात होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास लक्षात घेता अशी रजा मिळावी यासाठी लोकसभेमध्ये 201७ साली खाजगी विधेयक मांडण्यात आलं होतं. यात प्रत्येक महिन्याला दोन दिवस पिरियड लीव्ह देण्याचा प्रस्ताव होता. पण मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं की, यामागचा हेतू चांगला आहे पण अशी पीरियड लीव्ह देण्याचा सरकारचा आता विचार नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं.’

तिच्या चेहऱ्यावर आलेले स्मित हास्य विरळ झालं आणि थोड्या दुःखी भावात ― या देशात “Menstruation Goddess” – म्हणजे ‘मासिक पाळीची देवी’ आहे पण स्त्रियांना योग्य स्थान नाही.

‘हे बघ समृद्धी, सरकारी पातळीवरही जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. तरीही महिलांच्या मासिक पाळीतील स्वच्छता, आरोग्य आणि त्याबद्दल असलेली अंधश्रद्धा या अनुषंगाने खूप काम करण्याची अजूनही गरज आहे.’

‘अनन्या, महिलांसाठी ‘मेन्स्ट्रुअल लीव्ह’ नक्कीच आरामदायी ठरू शकते का ?

‘मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात रक्तस्रावाचा खूप त्रास होतो. यालाच ‘डिसमेनोऱ्हिया’ असं म्हणतात. या दरम्यान महिलांना होणारा त्रास इतका जास्त असतो की, त्यांना दिवसभर दुसरं काहीही काम करता येत नाही. या अशा महिलांसाठी ‘मेन्स्ट्रुअल लीव्ह’ नक्कीच आरामदायी ठरू शकते.’

‘खाजगी कंपन्या त्या देतील का ? ( हा प्रश्न ती इंग्रजीत विचारते तेव्हा तिला लगेच खडसावते ‛मराठीत’ बोल ) सॉरी सॉरी !! नाही क्षमस्व !’

नक्की एक ठरव काय बोलायचं?

थोडा दीर्घ श्वास घेत ती “क्षमस्व” हे शब्द उच्चारते.

डोळ्यांच्या पापण्यांच्या इशाराने तिच्या शब्दांवर सहमती दर्शवते. “कॉर्पोरेट कंपन्यांनी मासिक पाळीसंबंधी गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी ‘मेन्स्ट्रुअल लीव्ह’ संबंधीच्या विषयांची मांडणी करायला हवी. तसंच मासिक पाळीमुळं महिलांना भेदभावाची वागणूक न मिळता महिलेला फक्त महिला म्हणून द्यायला हवं ” काही लोकांना मासिक पाळी ही क्षुल्लक बाब वाटते आणि उगाचच महिलांना यानिमित्ताने सुट्टी मिळते, असं वाटतं. त्यामुळे अशा प्रकारच्या सुट्टीबाबत विरोध करतात.

  ‘हे बरोबर आहे तुझं मात्र त्यामुळे अशाप्रकारे सुट्ट्या दिल्यातर कंपन्यांच्या उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम नाही होणार का ?’

 ‘हो होऊ शकतो, पण आपल्या दृष्टीने स्त्रीचे आरोग्यही महत्त्वाचे आहे ना ? ‘मेन्स्ट्रुअल लीव्हच्या’ नावाखाली कर्मचाऱ्यांना सरळ घरी पाठवण्याऐवजी कंपन्यांनी ऑफिसमध्येच काही आरामाची व्यवस्था करायला हवी किंवा सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून महिला कर्मचाऱ्यांवर घरी थांबायची वेळ येणार नाही.  तुला पाळी आली असतानाही तू कॉलेजमध्ये गेली पण तिथे विश्रांती करण्याची सोय असती तर तू घरी आली असती का ?’

 ‘या पद्धतीचा अवलंब केल्यास कुणालाही झुकतं माप देण्याचा प्रश्न येणार नाही. शिवाय, ही बाब सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवेल आणि लैंगिक गैरसमजांनाही यामुळं आळा बसेल.’

 ‘हे सर्व करण्यासाठी सरकार किंवा पुरुष मंडळी तयार आहे का ?’

 ‘सध्या तरी स्पष्टपणे काही सांगता येणार नाही. मासिक पाळीसंबंधीची धोरणं पुरुष मंडळी तयार करू शकत नाही. महिला मासिक पाळी प्रत्यक्ष अनुभवतात, त्यांना त्यातून जावं लागतं. त्यामुळं त्यांनीच ही धोरणं बनवण्याकरिता, त्यांच्या अंमलबजावणीकरिता पुढाकार घेणं गरजेचं आहे. मात्र आजपर्यंत जेवढे संसदेत महिलांविषयी कायदे केले त्यात पुरुषी मंडळीचं योगदानही अमूल्य आहे. त्यामुळे नक्कीच अपेक्षा आहेत.’

 ‘मासिक पाळीच्या काळात कोणता योग /साधना करावी?’

 ‘सर्वांगासन, हलासन, नौकासन तसेच वज्रासन ही महिलांसाठी विशेष उपयुक्त योगासने आहेत. सूर्यनमस्कार घालणे हा सर्वात लाभदायी व्यायाम आहे.’

 ‘मासिकपाळी मध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिनला पर्याय म्हणून कोणकोणते साधन ( Equipment ) उपलब्ध आहेत?’

  १. पहिला मेन्स्ट्रुअल कप –

हा कप सिलिकॉन किंवा लेटेक्स रबरापासून बनवलेला असतो. सॅनिटरी नॅपकिन पाळीतला रक्तप्रवाह शोषून घेतात. पाळीच्या वेळी हा कप अशाप्रकारे योनीमध्ये बसवावा लागतो की त्यात पाळीचा रक्तप्रवाह जमा होईल. हे कप वापरायला अगदी सोपे आहेत आणि अनेक वर्षं वापरता येतात.

२. दुसरा टॅम्पॉन –

पाश्चात्य देशांमध्ये प्रचलित असलेला हा प्रकार भारतात फारसा वापरला जात नाही. पॅड्स योनीच्या बाहेर राहून पाळीचा रक्तस्राव शोषतात तर टॅम्पॉन योनीच्या आत घालावे लागतो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची शोषणक्षमता सर्वाधिक असते. अनुक्रमे कापडी नॅपकिन्स, पिरीयड पॅंटी, पीरियड स्पंज हे सॅनिटरी पॅडला पर्याय उपलब्ध आहेत.’

‘या सर्वांबद्दल सविस्तर सांग ना ?’

‘हो हो !! सांगते ना.’

 उत्तर सुरू करणार तेवढ्यात आईचा आवाज ऐकू आला…

तिने आम्हाला खाली बोलवलं होतं. कारण खाली तिने जेवणाचे पान लावले होते. आणि घड्याळातही बरोबर एक वाजलं होतं. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.

आता फक्त जिन्यावरून उतरताना मनात एकचं विचार येत होता, त्या वाक्याचा अर्थ तिला माहिती होता. तुम्हाला माहीत आहे का ?

 ‘नाही ना ?’

“मातृभाषेचा त्याग केल्यास ज्ञानाच्या सूर्यापासून वंचित राहावे लागते!!!”

 समजलं नाही का ?

जाऊ द्या, काही नाही, पण कधी कधी वाटतं ―

एकवेळ निरक्षरांना बदलता येईल, सुधारता येईल, पण या कोट्याधिश, उच्च शिक्षित गुलामांना बदलणं फार अवघड !!

 

दिपाली बिडवई.

( Twitter – @BidwaiDipali )

संपादन व मुद्रितकार्य:- टीम मराठी ब्रेन


(प्रस्तुत लेख हा पूर्णतः लेखिकेच्या हक्काधीन आहे. प्रकाशित करण्याच्या उद्देशाने फक्त आवश्यक त्या सुधारणा व मुद्रितकार्य मराठी ब्रेनमार्फत झाले आहे.)

तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया दिलेल्या प्रतिक्रिया बॉक्समध्ये नक्की कळवा.

(प्रस्तुत लेखात प्रकाशित विचार हे पूर्णतः लेखकाचे असून, मराठी ब्रेन व संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

सहभागी व्हा @marathibrainin

विविधांगी माहिती, विश्लेषण, बातम्या, साहित्य आपल्या मायबोली मराठीतून थेट जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा  writeto@marathibrain.in वर.

One thought on “‘मासिकपाळी : स्त्रीसाठी सर्वांत पवित्र गोष्ट’ : भाग १

  • August 22, 2018 at 10:18 am
    Permalink

    एका संवेदनशील मुद्द्यावर सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत गुंफून ठेवण्यात यशस्वी झाली आहेस. सोबतच न समजणारे मुद्देपण नीट समजून सांगितले आहेत.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: