ब्रेनवृत्त । मुंबई
तब्बल दीड वर्षांपासून रखडलेल्या एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ची नवीन तारीख आयोगाने जाहीर केली आहे. आता ही परीक्षा बरोबर एक महिन्याने, म्हणेजच ४ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. यामुळे परीक्षेची कित्येक दिवसांपासून वाट बघत राज्यातील लाखों उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे सन २०२० सत्राची असलेली ही परीक्षा तब्बल पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतली जाणारी अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० यापूर्वी रविवार, दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सर्व तयारीही पूर्ण झाली होती, मात्र कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुन्हा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारीत प्रसिद्धीपत्रक काढून लोकसेवा आयोगाची ही परीक्षा ४ सप्टेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
वाचा । ४ ऑक्टोबरला होणार युपीएससीची पूर्वपरीक्षा !
राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून आलेल्या पत्रावरून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
हेही वाचा । मोठी बातमी : वैद्यकीय व दंत शिक्षणात ओबीसी व ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण जाहीर!
“राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल व वन विभाग यांच्याकडून ३ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या परवानगीनुसार शनिवारी, ४ सप्टेंबर २०२१ रोजी अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२०चे आयोजन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीवर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, याबाबतची अधिक माहिती संकेत स्थळावर देण्यात येईल”, असेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.