ब्रेनवृत्त, पुणे
‘कोव्हिड-१९‘ महामारीमुळे देशभरातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र राज्यशासनाने आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर २०२०, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगानेही (युपीएससी) विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा कधी होणार असा प्रश्न राज्यभरातील उमेदवारांकडून उपस्थित केला होता. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स, एमपीएससी समन्वय समिती यांच्यासह राज्यभरातील उमेदवार परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करत होते.
हेही वाचा : शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
या आधी नियोजित वेळापत्रकानुसार ‘एमपीएससी’तर्फे घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिलला होणार होती. परंतु, कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता ही परीक्षा 26 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. नंतर सात एप्रिलला काढलेल्या एका पत्रकात आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपात्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या.