राज्य शिक्षण मंडळाचे शैक्षणिक नियोजन तयार
ब्रेनवृत्त, २४ मे
राज्यात ऐन परीक्षेच्या काळात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दहावीच्या बोर्डाचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या निकालासही विलंब होणार असल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे. त्यासाठी काही प्रवेश फेऱ्या रद्द करून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
नव्या नियोजनाबाबत बोलताना पुण्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, ‘’कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात 22 मार्चपासून टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा उशिराने लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने प्रवेश प्रक्रियेचा किमान 15 दिवसांचा कालावधी कमी करुन अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करणार आहोत. दरवर्षीपेक्षा एक फेरी कमी करून मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश व व्होकेशनल आणि बायफोकलचे प्रवेश लवकर होतील असेही नियोजन आहे.’’
त्याचबरोबर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून राज्यातील ‘कोव्हिड-१९‘ची स्थिती पाहून साधारणत: जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा 1 ऑगस्टपासून कॉलेज सुरु करण्याचे नियोजनही मंडळाने केले आहे. मात्र, यासाठी रेड, ऑरेंज व ग्रीन झोनचे नियोजन वेगवेगळे असेल.
सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; जुलैमध्ये होणार परीक्षा
दरवर्षी मे च्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी अर्ज विक्री सुरू होते. जूनमध्ये गुणपत्रिका हाती आल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रीया सुरु होते. 30-35 दिवसांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून महाविद्यालये सुरू होतात, तर मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश शेवटी दिले जातात.
हेही वाचा : राज्यात यंदा शैक्षणिक शुल्कवाढ होणार नाही !
दरम्यान, शिक्षण मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रवेश प्रक्रियेत तीन मुख्य फेऱ्या आणि त्यानंतर एक विशेष फेरी होईल. एखाद्या वर्गासाठी प्रवेश कमी झाल्यास महाविद्यालय स्तरावर गरजेनुसार पुन्हा प्रवेश फेऱ्या होतात. त्याचप्रमाणे आताही, मात्र तीन फेऱ्यांमधील अंतर कमी करून जुलैअखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच, राज्यभरातील सुमारे पाच लाख विद्यार्थी विविध विषयांतून (फॅकल्टी) अकरावीला प्रवेश घेणार असल्याने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे पोर्टलची तांत्रिक पडताळणीही पूर्ण झाली आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होताच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल, असेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी सांगितले.