मुंबई-कर्नाटक क्षेत्राचे नाव कित्तुर-कर्नाटक करणार : मुख्यमंत्री बोम्मई
ब्रेनवृत्त | बंगळुरू
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज (सोमवारी) मोठे विवादास्पद वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तसेच प्रांतीय अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटून उठण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी थेट मुंबई-कर्नाटक क्षेत्राचे नाव बदलणार असल्याची भाषा केली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीच पदभार हाती घेतलेले कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कल्पनेच्याही पलीकडचे विवादास्पद विधान केले आहे. “मुंबई-कर्नाटक क्षेत्राचे कित्तुर-कर्नाटक असे नामकरण करेल”, असे बोम्मई आज म्हणाले. पुन्हा पुन्हा सीमावादाचा प्रश्न उपस्थित राहत असेल, तर या जुन्या नावांचा काही उपयोग नाही, नावच बदलून दिलेले चांगले, असेही बोम्मई म्हणाले.
ब्रेनबिट्स : कोण आहेत कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई?
“अलीकडेच आम्ही हैदराबाद-कर्नाटक क्षेत्राचे नाव बदलून कल्याण-कर्नाटक केलेले आहे. आता येत्या काही दिवसांत मुंबई-कर्नाटक क्षेत्राचे कित्तुर-कर्नाटक असे नामकरण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे”, असे कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्ताने घोषित केले. कर्नाटक राज्याची स्थापना होऊन यंदा ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने राज्योत्सव साजरा केला जात आहे.
Will rename Mumbai-Karnataka region as Kittur Karnataka: CM Basavaraj Bommai
— Press Trust of India (@PTI_News) November 1, 2021
मुंबई-कर्नाटक क्षेत्राचे नाव बदलण्याची घोषणा करताना बोम्मई यांचा अप्रत्यक्ष इशारा महाराष्ट्राकडे होता. कर्नाटक क्षेत्रातील बहुसंख्य असलेला मराठी भाषिक भाग व बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडून कित्येक वर्षांपासून केली जात आहे.
ब्रेनविशेष : संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वातंत्र्यानंतरचा संयुक्तलढा
उत्तर कर्नाटक भागातील मुंबई-कर्नाटक क्षेत्राचे नाव बदलण्याच्या निर्णयामागील कारण सांगताना बोम्मई म्हणाले, “कर्नाटक राज्याचे संयुक्तीकरण झाल्यानंतर आमच्यात सीमावाद निर्माण झाले आणि त्यावर नंतर तोडगाही काढण्यात आला. परंतु, अजूनही सीमावादावरून भांडणे होत असल्याचे आपण ऐकत आलो आहोत. जर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असतील, तर अजूनही या भागाला मुंबई-कर्नाटक क्षेत्र संबोधण्यात काही अर्थ तरी आहे का?”
जे काही बदल राज्यात व्हायला हवे होते, ते १९५६ मध्येच व्हायला हवे होते, ज्यावेळी राज्य पुनर्रचना आयोग अंमलात आला होता, असेही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in