स्वच्छतेच्या कामगिरीसाठी नाशिक व कोल्हापूर जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार

जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छतेच्या अनेक निकषांचे विश्लेषण आणि अभ्यास करून शासनाने देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २० जिल्ह्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण’ (SBM-G) अंतर्गत केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे ‘जागतिक शौचालय दिना’निमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ग्रामीण स्वच्छता क्षेत्रातील या विशेष पुरस्कारामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छतेच्या अनेक निकषांचे विश्लेषण आणि अभ्यास करून देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २० जिल्ह्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. आज (दि. १९ नोव्हेंबर) रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त या दोन्ही जिल्ह्यांना दूरदृष्य प्रणालीद्वारे होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री  रतनलाल कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

वाचा | राज्यातील ३ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार

“२ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या ‘स्वच्छ भारत दिवस’ कार्यक्रमात राज्याला ५ पुरस्कार मिळाले होते. आज आणखी दोन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित होणे ही राज्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे”, असे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

ग्रामीण स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र यापुढेही अग्रेसरच राहील आणि राज्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावेल यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोबतच, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि सर्व यंत्रणेचे पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: