‘नीरज’ने फुलवले भारताचे ‘सुवर्णकमळ’!

ब्रेनवृत्त । टोकियो


भारताचा २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोपडा याने (Neeraj Chopra) आज टोकियो ऑलम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सोबतच, ट्रॅक-अँड-फील्ड खेळ प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच ऑलम्पिक सुवर्णपदक आहे.

हरियाणातील पानिपतजवळील खांद्रा गावातील नीरज चोपडाने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तब्बल ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून क्रीडा जगताला चकित केले आहे. नीरजच्या या सुवर्ण कामगिरीमुळे भारताची ऑलिम्पिकमधील ट्रॅक आणि फील्ड प्रकारातील पदकाची १०० वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.

नीरजने टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताकडून सातवे पदक व पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. सोबतच, तो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला. २००८ मध्ये झालेल्या बीजिंग ऑलम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याने पहिले वैयक्तिक सुवर्ण पटकावले होते.

वाचा । खेळरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार’ असे पुनर्नामकरण!

या स्पर्धेत सहभागी असलेल्या त्याच्या फक्त तीन सहकारी स्पर्धकांनी २०२१ मध्ये त्याच्यापेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आहे. मात्र, त्यापैकी दोन टोकियो ऑलम्पिकच्या पात्रता फेरीतूनच बाहेर पडले. त्याने मार्चमध्ये ८८.०७ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम (पीबी) भालाफेक नोंदवली, हा एक त्याचा नवीन राष्ट्रीय विक्रम आहे. त्याच्या कामगिरीतील ही आकडेवारी दर्शवते, की त्याने २०१३ पासून जवळजवळ प्रत्येक वर्षी आपली कामगिरी सुधारली आहे.

 

आपल्या कारकिर्दीतील पाचव्या सर्वोत्तम थ्रोसह चोप्राने अशी काही अभूतपूर्व कामगिरी केली आहे, जी मिल्खा सिंग आणि पी टी उषा यांच्यासारख्या दिग्गजांनाही 1960 आणि 1984 च्या ऑलम्पिक आवृत्तीत करता येऊ शकली नव्हती. बेल्जियमच्या अँटवर्प येथे १९२० मध्ये आयोजित झालेल्या ऑलम्पिक खेळांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यापासून आजपर्यंत कोणत्याही भारतीयाने एथलेटिक्समध्ये पदक जिंकले नव्हते. १०० वर्षांचा हा पदकाचा दुष्काळ नीरजने संपुष्टात आणला आहे.

हेही वाचा । अखेर उर्वरित आयपीएलचा मुहूर्त ठरला!

नीरज चोपडाने हे सुवर्णपदक महान धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केले आहे. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीवर मिल्खा सिंग अतिशय आनंदी झाले असते आणि नीरजने त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे, अशा भावना त्यांचे सुपुत्र जीव मिल्खा सिंग यांनी व्यक्त केल्या आहेत. 

 

सहभागी व्हा @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

तुमच्या परीसरातील घडामोडी आणि उपक्रमांबद्दल आम्हाला नक्की कळवा.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in वर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: