विविध वृत्तसमूहांकडून होणार फेसबुकला बातमी पुरवठा
ब्रेनवृत्त | वॉशिंग्टन
फेसबुकद्वारे लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या ‘फेसबुक न्यूज’ या नव्या सुविधेअंतर्गत वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूज इन्कॉर्पोरेशन आणि इतर निवडक वृत्त माध्यमांकडील ठळक बातम्या फेसबुकवर झळकणार आहेत. या वर्षांच्या शेवटपर्यंत प्रत्यक्षात येणाऱ्या बातमी प्रणालीसंबंधीची ही माहिती फेसबुकने काल दिली आहे.
वॉशिंग्टन पोस्ट, बझफीड न्यूज आणि बिझनेस इनसायडर यांसारख्या वृत्त प्रकाशनांनीही फेसबुकसोबत बातम्यांसाठी करार केला असल्याचे प्रसिध्द अमेरिकी वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. याआधी फेसबुकसोबत बातम्यांसंबंधी कारार केल्याचे पहिले वृत्त वॉल स्ट्रीटने प्रकाशित केले होते.
हेही वाचा : समाजमाध्यमांचे ‘आभासी’ जग
या करारबद्ध संस्थांना बातमी पुरवण्याच्या मोबदल्यात फेसबुकद्वारे परवाना शुल्क दिले जाणार आहे. दरम्यान, केबल नेटवर्क कंपन्यांसारखे फेसबुकनेही विश्वासू वृत्त प्रकाशकांना बातम्यांचे वहन खर्च द्यावे, अशी मागणी ‘न्यूज कॉर्पोरेशन’ या प्रसिद्ध अमेरिकी वृत्त मंडळाचे संस्थापक रुपर्ट मुर्दोच यांनी मागच्या वर्षी फेसबुकला केली होती.
फेसबुक, इंस्टाग्रामवर जाणार्या वेळेचं नियोजन करण्यासाठी आता टूल्स उपलब्ध!
फेसबुकच्या ह्या नव्या बातमी उपक्रमासाठी वृत्त समूहांकडून दिल्या जाणाऱ्या काही बातम्या फेसबुकच्या संपादकीय मंडळाद्वारे तपासून पुनर्संपादित केल्या जातील. तर, इतर बातम्या कंपनीच्या अल्गोरिदमद्वारे निवडल्या जाणार आहेत.
खोट्या बातम्या आणि विविध देशांच्या शासकीय यंत्रणांद्वारे केल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या प्रसार-प्रचाराला आळा घालण्यात फेसबुकची यंत्रणा शिथिल असल्याच्या टीका जगभरातून फेसबुकवर झाल्या होत्या. याची दखल घेत फेसबुकद्वारे ‘फेसबुक न्यूज’ च्या माध्यमातून विश्वासार्ह वृत्त समूहांनी पुरवलेल्या बातम्यांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे, फेसबुकचे कार्यकारी संपादक मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
( टीम मराठी ब्रेन डॉटकॉम)
◆◆◆