आरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होणार असून, दुसऱ्या सहामाहीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही संपूर्ण वर्षाचा विचार करता अर्थव्यवस्थेचा संकोच होण्याची भीती आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

कोव्हिड-१९’मुळे ओढवलेले आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर उपाय म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहित केलेल्या नव्या द्विमासिक पतधोरणात सध्याचे व्याजदर कायम ठेवले आहेत. सोबतच, सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, लघुउद्योजक यांना दिलासा देणाऱ्या काही घोषणाही बँँकेतर्फे करण्यात आल्या आहेत.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नवे पतधोरण जाहीर करताना म्हटले, “वाढत असलेल्या महागाईवर उपाय म्हणून सध्याचे व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, चालू आर्थिक वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कठीण आहे.” आगामी काळात महागाईत कसा बदल होऊ शकतो हे दास यांनी स्पष्ट केले. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकेने व्याजदर कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होणार असून, दुसऱ्या सहामाहीत वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही संपूर्ण वर्षाचा विचार करता अर्थव्यवस्थेचा संकोच होण्याची भीती त्यांनी यावेळी वर्तविली.

वाचा | शासनाद्वारे आरबीआयच्या स्वायत्ततेच्या गळचेपीचे प्रयत्न

या द्विमासिक पतधोरणात सामान्य नागरिक, उद्योजक, लघुउद्योजक यांना दिलासा देणाऱ्या काही घोषणाही करण्यात आल्या. सोन्यावर घेतल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय दास यांनी घोषित केला. सध्या सोन्याच्या निर्धारित दराच्या ७५ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळते. ही रक्कम ९० टक्क्यांवर नेण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरांनी केली आहे. म्हणजेच सर्वसामान्यांना आता सोन्याच्या तारणावर ९० टक्के कर्ज मिळेल.

दुसरीकडे, कंपन्या तसेच उद्योजकांना वैयक्तिक पातळीवर घेतलेल्या कर्जांची फेररचना करण्याची परवानगी आरबीआयने दिली आहे. तसेच, गृहबांधणी क्षेत्राला मदत मिळावी यासाठी १० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम नाबार्डला देण्याची घोषणा त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: