उपासमारी विरोधात अब्जाधीशांची मदत गरजेची : डब्ल्यूएफपीची मागणी

0
29

कोव्हिड-१९ चा उद्रेक झाल्यापासून जगभरात उपासमारीने ग्रासलेल्या लोकांची संख्या दुपटीने वाढली आहे. या भयावह समस्येवर मात करण्यासाठी म्हणून जगभरातील अब्जाधीशांनी ‘फक्त काही’ अब्जांची मदत करणे गरजेचे असल्याचे जागतिक अन्न कार्यक्रमाचे प्रमुख डेव्हिड बिसले (David Beasley) यांनी म्हटले आहे.

 

ब्रेनवृत्त | संयुक्त राष्ट्रे

जगभरात उपासमारीने ग्रासलेल्या लोकांच्या संख्येत ‘कोव्हिड-१९‘मुळे अजूनच वाढ झाली असून, कोटींच्या संख्येत लोक उपासमारीच्या स्थितीत ढकलले जात आहेत. अशा परिस्थितीत जगभरातील अब्जाधीशांनी (Billionaires) लाखों लोकांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी फक्त काही अब्ज खर्च करावेत, अशी आग्रहाची भूमिका यंदाच्या शांततेचा नोबेल पारितोषिक विजेत्या ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ने (WPF : World Food Program) पुन्हा व्यक्त केली आहे.

जगभरात वाढत जाणारी आर्थिक-सामाजिक विषमता आणि असमतोल विकास यांसारख्या कारणांमुळे जगभरातील कोटींच्या संख्येत लोक उपासमारीने ग्रासले आहेत. त्यातच ‘कोव्हिड-१९’च्या उद्रेक झाल्यापासून जगभरात उपासमारीने ग्रासलेल्या लोकांची संख्या दुपटीने वाढली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झाल्यापासून जगभरातील उपासमारीने ग्रासलेल्या लोकांची संख्या १३५ मिलियनवरून २७० मिलियनवर पोहचली आहे. या भयावह समस्येवर मात करण्यासाठी म्हणून जगभरातील अब्जाधीशांनी ‘फक्त काही’ अब्जांची मदत करणे गरजेचे असल्याचे जागतिक अन्न कार्यक्रमाचे प्रमुख डेव्हिड बिसले (David Beasley) यांनी म्हटले आहे.

बिसले म्हणाले, “आज मानवतेला तत्काळ मदतीची गरज आहे. जग आडरस्त्यांवर उभा आहे आणि अशावेळी जगभरातील अब्जाधीशांनी याआधी केली नसेल अशाप्रकारची मदत करणे करणे गरजेचे आहे. ही एकवेळसाठीची विनंती आहे.” ते असेही म्हणाले की, द्वितीय विश्वायुद्धानंतर ओढवलेली या सर्वांत मोठ्या संकटातून मानवतेला वाचविण्यासाठी आणि कोटी लोकांचे जीव वाचवण्यासाठी मला फक्त काही अब्जांची गरज आहे. ही काही खूप मोठी मागणी नाही.”

वाचा | मोदी सरकारच्या काळात भूकबळींचा चढता क्रम

● अब्जाधीशांची संपत्ती २ ट्रिलियन डॉलर्सने वाढली

कोव्हिड-१९ संकट अधिकच तीव्र झालेल्या एप्रिल ते जुलैच्या काळात जगभरातील जवळपास २,२०० अब्जाधीशांनी वैश्विक संपत्ती तब्बल २ ट्रिलियन डॉलर्सनी वाढल्याची माहिती संयुक्त राष्ट्रे अन्न संस्थेच्या कार्यकारी संचालकांनी संयुक्त राष्ट्रांच्या एका आभासी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली आहे. स्विस बँक UBS आणि PwC यांनी मागील आठवड्यात प्रकाशित केलेल्या संबंधित अभ्यासाचा अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार, जगभरातील अब्जाधीशांची एप्रिल, २०२० च्या सुरुवातीला असलेली $८ ट्रिलियनची वैश्विक संपत्ती जुलैमध्ये $१०.२ ट्रिलीयन इतकी झाली आहे.

दरम्यान, नेमक्या कोणत्या अब्जाधीशांना उद्देशून डेव्हिड बिसले मदतीची मागणी करताहेत अशा काहींची नावे सांगावी, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “मला त्या लोकांच्या विषयात गुंतायचे नाही आहे. तर माझ्यासाठी उपासमारीने ग्रासलेल्या लोकांच्या गर्दीचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे.”

वाचा | जगभरातील कंपन्या घेणार ₹१०० अब्जाहून अधिकचे कर्ज!

● आताच्या आर्थिक संकटाचे पडसाद २०२१ च्या अर्थसंकल्पांवर

पुढे ते म्हणाले की, “जागतिक अन्न कार्यक्रम वर्ष २०२१ विषयी जास्त गंभीर आहे. कारण जगभरातील अर्थव्यवस्थांच्या चालू वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कोरोनामुळे वाढणारे खर्च व आर्थिक हानी याचा विचार करण्यात आला नव्हता. यामुळे या सर्वांचा परिणाम येत्या २०२१ मधील अर्थसंकल्पांवर पडणार आहे.” अनेक श्रीमंत देशांनी कोरोना विषाणूच्या विरोधात उपाययोजना व नागरिकांच्या सुविधांसाठी जवळपास $१७ ट्रिलीयनची विशेष आर्थिक तरतूद केली. मात्र, हे $१७ ट्रिलीयन आता २०२१च्या अर्थसंकल्पांत नसणार आहेत, असेही बिसले म्हणाले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष संस्था म्हणून कार्यरत असलेला ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ (World Food Programme) हा जगभरात उपासमारी व दारिद्र्य कमी करण्यासाठी सतत कार्यरत असलेला विशेष उपक्रम आहे. डब्ल्यूएफपीच्या कार्याचा सन्मान म्हणून २०२०चा शांततेचा नोबेेल पारितोषिक ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’ला जाहीर झाला आहे.

 

Join @marathibraincom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here