आता मुंबईला तीन दिवस आधीच मिळणार पुराचा इशारा

ब्रेनवृत्त, मुंबई

केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने मुंबईसाठी पुराचा इशारा देणारी अद्ययावत ‘आय फ्लोवस-मुंबई’ (iFLOWS – Mumbai) प्रणाली विकसित केली आहे. मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाच्या वेळी मुंबईतील पाणी वाढण्याविषयी म्हणजे पूरस्थितीविषयी पूर्वसूचना देऊन, बचावाच्या दृष्टीने शहराला अधिक समर्थ करणे, या प्रणालीमुळे शक्य होणार आहे. या प्रणालीचा वापर करून 3 दिवस आधी पुराचा अंदाज वर्तविणे आणि 3 ते 6 तासांपर्यंतच्या तत्कालीन अंदाजासह तसे भाकीत वर्तविणे शक्य होणार आहे.

विशेषतः या प्रणालीद्वारे सखोल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची गरज भासल्यास याचा निश्चित उपयोग होईल, कारण एखादा विशिष्ट भाग पाण्याखाली जाणार असल्याचा अंदाज आपणास 12 तास अगोदरच कळू शकेल. प्रत्येक लहान-लहान भागातील पावसाच्या प्रमाणाचाही अंदाज या प्रणालीमुळे कळू शकेल. तसेच, ‘निर्णय आधार प्रणाली’मुळे (Decision Based System) खबरदारी म्हणून झटपट निर्णय घेता येईल व धोक्याचे मूल्यमापन करून प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यवाही करणे शक्य होणार आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ‘पूर-इशारा प्रणाली’ (Flood Warning System) विकसित करणाऱ्या केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. विज्ञानाबाबत आपण जगातील कोणाहीपेक्षा कणभरही मागे नाही ही अभिमानाची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, मुंबईची पूरस्थिती- विशेषतः 2005 आणि 2017 मधील अवस्था सर्वांच्याच स्मरणात आहे. आता ही अत्याधुनिक पूर-इशारा प्रणाली मात्र मुंबईकरांच्या मदतीला धावून येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोबतच, मुंबईसाठी 160 पेक्षा जास्त वेधशाळा आणि (पुढच्या पावसाळ्यापर्यंत उपयोगात येणारे असे) आणखी 4 रडार ऑर्डर केले असून, यामुळे दर 500 मीटर अंतरापर्यंत व दर 15 मिनिटांसाठी पावसाचा अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे, अशी माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.एम.राजीवन यांनी यावेळी दिली.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

● ही अंदाज-प्रणाली कशी काम करते ?
भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ही अत्याधुनिक प्रणाली तयार केली आहे. पावसाच्या परिमाणाची आकडेवारी तसेच, मुंबई मनपाने पुरविलेली अन्य स्थानिक माहिती- जसे की- भूमी-उपयोजनाची आकडेवारी, जमिनीचे चढ-उतार, जलनिस्सारण प्रणाली, शहरातील जलस्त्रोत, भरतीची पातळी, पायाभूत सुविधा आणि लोकसंख्या, इत्यादी. या सर्व माहितीचा वापर करून ही प्रणाली हवामान, पर्जन्यमान, पाणी वाहून जाण्याचे प्रमाण, पाण्याची हालचाल, भरती आणि वादळी स्थितीमुळे होणारी वाढ व तिचा प्रभाव या सर्वांबद्दलचे एक प्रतिमान (मॉडेल) तयार करते, व त्या आधारे अंदाज व्यक्त करते.

पावसामुळे येणारी पूरस्थिती, नदीकाठांच्या वरून पाणी वाहणे, वादळाचा प्रभाव, रस्त्यामुळे तसेच इमारती, रेल्वेमार्ग, यामुळे प्रवाहात निर्माण होणारा अडथळा, भरती आणि सागरजलपातळीत वाढ, अशा सर्व मुद्यांचा या प्रणालीत विचार केलेला आहे.

आयफ्लोज प्रणालीमध्ये सात भाग आहेत. यांपैकी, माहिती संकलन भागात हवामानविभागाच्या अंदाजांसह विविध प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणात गोळा केली जाते. यात मुंबईतील नद्या आणि सरोवरांच्या खोलीबद्दलच्या माहितीचाही समावेश आहे. पूरस्थिती भागात ही सर्व माहिती, पुराची 3 दिवस अगोदर माहिती देण्यासाठी वापरली जाईल. शहरातील विविध क्षेत्रातून पाण्याची हालचाल कशी होईल, याबद्दल प्रणालीचा पूर भाग माहिती देईल. प्रणालीच्या धोकाविषयक भागांची मिळून निर्णय-आधार-व्यवस्था बनलेली आहे. यामुळे पूरस्थिती पाहून झटपट व शास्त्रशुद्ध निर्णय घेण्यास प्रशासनाला मदत होणार आहे. प्रणालीतील वितरण भागामुळे प्रत्यक्ष क्षेत्रातील अधिकाऱ्यांना संपर्कयंत्रणेद्वारे सर्व माहिती पोहोचविण्याची सोय होते. यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात तत्पर कार्यवाही करणे शक्य होते.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

● आय फ्लो प्रणाली कशी विकसित झाली ?

महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ हे देशातील एक प्रमुख महानगर आणि भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे. शहराला नैसर्गिक आणि वादळी स्थितीतील जलनिस्सारण यंत्रणा लाभलेली असूनही वारंवार येणाऱ्या पूरस्थितीमुळे शहर ठप्प होण्याचे संकट अनेकदा ओढवते. या पूरप्रवण शहरातील बचावयंत्रणेला पूरक ठरण्यासाठी मुंबईसाठी एकात्मिक पूर-इशारा प्रणाली (Integrated Flood Warning System) विकसित करण्याच्या उद्देशाने चेन्नईतील अशाच प्रकारचे प्रतिमान डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाशी संपर्क साधला. सदर मंत्रालयाने जुलै-2019 मध्ये कामास सुरुवात केली. हवामानशास्त्र विभाग, मध्यम पल्ला हवामान अंदाज वर्तविणारे राष्ट्रीय केंद्र, भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था आणि राष्ट्रीय किनारी संशोधन संस्था यांच्याकडील ज्ञानाचा व तंत्र-कौशल्यांचा वापर करून, तसेच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रणालीबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. भूविज्ञान मंत्रालयाने विकसित केलेली ही अद्ययावत अशी पूर-इशारा प्रणाली म्हणजे मुंबईकरांसाठी एक अनोखी भेट आहे. कोरोनामुळे उभे राहिलेले आरोग्यसंकट आणि नुकत्याच येऊन गेलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रक्त-व्यवस्थापन आणि पूर-व्यवस्थापन दोन्हींना सारखेच महत्त्व आहे. हवामानशास्त्र विभागाने निसर्ग चक्रीवादळाचा अगोदरच अंदाज दिल्याने, आपत्तीचा आणखी मोठा फटका बसण्यापासून आणि आणखी जीवितहानी होण्यापासून राज्याला वाचविणे राज्य सरकारला शक्य झाले, असे म्हणत त्यांनी भूविज्ञान मंत्रालयाचे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: