कांद्याच्या पैशांचे मोदींना मनिऑर्डर !
कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने निराश झालेल्या नाशिकच्या शेतकऱ्याने मिळालेल्या पैशाचे मोदींनाच मनिऑर्डर केले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही व्यथा.
नाशिक, १ डिसेंबर
घामाने पिकवलेल्या कांद्याला बाजार समितीत केवळ एक ते दीड रुपये भाव मिळत असल्याने निराश झालेल्या नाशिकच्या शेतकऱ्याने मिळालेले पैसे थेट पंतप्रधान मोदींनाच मनिऑर्डर परत केले आहेत. ही व्यथा आहे नाशिकच्या संजय साठे या एका शेतकऱ्याची.
नाशिकमधील निफाडच्या नैताळे गावातले कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी बाजारसमितीत ७ क्विंटल ५० किलो कांदा विकला. मात्र लासलगाव बाजारसमितीत या कांद्याच्या मोबदल्यात त्यांना फक्त १ हजार ६४ रुपयेच मिळाले. म्हणजे त्यांना प्रतिक्विंटल फक्त १५१ रुपयेच मिळाले. अर्थात, साठेंना एवढ्या कमी भावात कांदा नाईलाजाने विकावा लागला, कारण शेतकऱ्यांना त्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नगण्य अशा या बाजारभावामुळे संजय यांनी मिळालेले पैसे ऑनलाइन मनिऑर्डरने थेट पंतप्रधान मोदींनाच परत पाठवले आहेत. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या खिशातील ५४ रुपायांचाही समावेश या मनिऑर्डरमध्ये संजय यांनी केला आहे.
छायाचित्र स्रोत : एबीपी माझा
संजय साठे यांच्या या निराशेचा मागोवा एबीपी माझा ने प्रकाशित केला आहे. संजय यांनी ट्रॅक्टरभर कांदा निफाड बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. मात्र त्यांना योग्य तो भाव मिळाला नाही. यामुळे निराश होऊन संजय यांनी मिळालेले पैसे शासनाला परत करणार असल्याचे जाहीर केले. “शेतकरी, व्यापारी बंधूंनो, आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून त्याकडे कुणीही गांभीर्याने पहात नाही. शेतकऱ्यांच्या या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळाव्यात या उद्देशाने आज मी आणलेल्या सर्व कांद्याचे पैसे ऑनलाईन मनीऑर्डरद्वारे पंतप्रधानांना पाठवणार आहे. मी हे कुठल्याही राजकीय हेतूने करत नसून, केवळ शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधानांना कळाव्यात या उद्देशाने करत आहे,” असा मजकूर त्यांनी ट्रॅक्टरवर लिहिला आहे. एबीपी माझा
गेल्या काही दिवसांपासून सलगरित्या कांद्याच्या भावात घसरण होत चालली आहे. मात्र याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. बाजारसमितीत कांद्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या भावामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाहीही परतफेड होत नाही. यामुळे वैतागून संजय साठे यांनी पंतप्रधान कार्यालयातून शेतकऱ्यांना नुसतेच दिल्या जाणत्या पुसत आश्वासनांचा विरोध करत मनिऑर्डर पाठवून शासनालाच जाब विचारला आहे. पंतप्रधान मोदींना मनिऑर्डर पाठवून शेतकऱ्यांच्या व्यथा कळवण्याचा संजय यांचा प्रयत्न आहे.
छायाचित्रे स्रोत: ट्विटर
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सटाणा परिसरातही कांद्याच्या भावात झालेल्या घरसरणीविरुद्ध शेतकरी रस्त्यावर आले होते. कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी वैतागले होते. प्रतिक्विंटल फक्त १५० पर्यंतचाच भाव बाजार समितीद्वारे त्यांना मिळाला आहे.
◆◆◆