धान उत्पादकांना मिळणार प्रति क्विंटल ७०० रुपयांचे प्रोत्साहन

खरेदी करण्यात आलेल्या प्रति क्विंटल धानामागे धान उत्पादक शेतकऱ्याला ₹७०० अधिक मिळणार आहेत, मात्र ही राशी फक्त ऑनलाइन खरेदी करण्यात आलेल्या धानासाठीच मिळणार आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

केंद्र शासनाने २०२०-२१ च्या खरीप पणन हंगामातील धानासाठी निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹७०० प्रोत्साहनपर साहाय्य (Paddy Procurement Incentive Support) म्हणून देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने साधारण धानासाठी १८६८ रुपये व ग्रेड धानासाठी १८८८ रुपये इतकी आधारभूत किंमत निश्चित केली आहे. मात्र, धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय राज्याद्वारे घेण्यात आला आहे. यानुसार खरेदी करण्यात आलेल्या प्रति क्विंटल धानामागे धान उत्पादक शेतकऱ्याला ₹७०० अधिक मिळणार आहेत. मात्र, ही राशी फक्त ऑनलाइन खरेदी करण्यात आलेल्या धानासाठीच मिळणार आहे.

या निर्णयामुळे शासनावर ₹१४०० कोटींचा अतिरिक्त खर्च येणार असल्याचे शासनाने म्हटले आहे. या वर्षी १ कोटी ७८ लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.

वाचा | तुडतुड्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पूर्व विदर्भात ठिकठिकाणी नव्या शासकीय धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी, “शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची लूट होता कामा नये, प्रामाणिकरित्या शेतकऱ्यांच्याच धान पिकाची खरेदी करावी. धान खरेदी केंद्रातील व्यवस्थापक मंडळाने व्यापारी व दलालांपासून सावध राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची गरज आहे”, असे म्हटले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: