अफगाणिस्तानवरील तालिबानी ताब्यात पाकिस्तानची मोठी भूमिका?

वृत्तसंस्था । पीटीआय

ब्रेनवृत्त । वॉशिंग्टन


पाकिस्तान आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची तालिबानद्वारे अफगाणिस्तावर ताबा मिळवण्यात व तालिबानला सुरक्षा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा अमेरिकेच्या कायदेमंडळातील एका वरिष्ठ सदस्याने केला आहे. तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर इस्लामाबादमध्ये जल्लोष साजरा केला जाणे हे अतिशय घृणास्पद कृत्य आहे, असे यूएसचे रिपब्लिकन सदस्य स्टीव्ह चॅबोट काल म्हणाले.

“आपणा सर्वांना माहित आहे, की पाकिस्तान व विशेषकरून त्याची गुप्तचर यंत्रणा यांनी तालिबानला संरक्षण पुरवण्यात व अफगाणिस्तानवर ताबा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तालिबानी अधिपत्यामुळे अफगाणी नागरिकांचे जीव धोक्यात येणार आहे. तरीही, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तालिबानच्या यशाचे जल्लोष साजरा करणे अतिशय किळसवाणी बाब आहे”, असे चॅबोट म्हणाले. 

वाचा । ‘तालिबान म्हणजे सर्वसामान्य नागरिक’ इम्रान खान यांचा दावा!

संयुक्त राज्यांच्या सत्ताधारी पक्षातील भारतीय गटाचे सह-अध्यक्ष स्टीव्ह चॅबोट काल (रविवारी) पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी वर्तमान स्थितीवर भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तालिबानी सत्तेच्या घातक नियमांचा व होणाऱ्या छळाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याक समुदायाला भारताने आश्रय देण्याचे ठरवले आहे. भारताच्या या भूमिकेची चाबोट यांनी स्तुती केली.

१५ ऑगस्टच्या संध्याकाळी तालिबानने काबुलमध्ये प्रवेश करून राजधानीत भयावह गोंधळ उडवला. त्याच्या काही वेळेनंतरच राष्ट्रपती अश्रफ घानी देश सोडून पळून गेले. अफगाणी लोकांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने काबूल विमानतळावर मोठी गर्दी केली होती. तसेच मागील आठवड्यापासून दरदिवशी अफगाणिस्तानमधील लोकांचे जत्थे काबुल विमानतळावर येत आहेत, जिथून अनेकांना भारत व अमेरिकासह अनेक देशांमध्ये सुरक्षितपणे नेले जात आहे. यादरम्यान, विमानतळावरील गर्दीत अनेक लोकांना आपले प्राणही गमवावे लागले. 

हेही वाचा । केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात ‘आयएसआयएस’चे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र

दुसरीकडे, भारतात आश्रय घेऊ पाहणाऱ्या अफगाणी नागरिकांना भारताने विशेष व्हिसा सुविधा प्रदान करण्याचे ठरवले आहे. ‘ई-आपत्कालीन एक्स-संमिश्र प्रवेश परवाना’ (e-Emergency X-Misc Visa) अशा विशेष श्रेणीचा व्हिसा अफगाणी नागरिकांना भारताकडून दिला जात आहे. कोणत्याही धर्माचे सर्व अफगाणी नागरिक ऑनलाईन पद्धतीने या श्रेणीच्या व्हिसासाठी अर्ज करू शकतात आणि या अर्जाची पडताळणी नवी दिल्लीत   होईल.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: