‘आधार’ असल्यास त्वरित मिळेल ‘पॅन’ !
आधार कार्ड क्रमांक उपलब्ध असलेल्या करदात्यांना कोणतेही स्वतंत्र अर्ज न करता त्वरित पॅन कार्ड उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
जर एखाद्याकडे आधारकार्ड क्रमांक असेल, तर त्या व्यक्तीला स्वतंत्र अर्ज न करता त्वरित पॅन कार्ड उपलब्ध केले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. संसदेत मोदी २.० काळातील पहिला पूर्ण ‘अर्थसंकल्प २०२०-२१‘ अर्थमंत्री सीतारामन यांनी आज सादर केला.
केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांनी कर क्षेत्रासबंधी महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्या करदात्यांकडे आधार क्रमांक आहे, त्यांना त्वरित पॅन कार्डही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी नवीन यंत्रणा लवकरच सुरू केली जाणार असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. “करदात्यांच्या आधार क्रमांकावर आधारित व्हेरिफिकेशन करून करदात्यांना पॅन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी एक नवी यंत्रणा निर्माण केली जाईल”, असे त्या म्हणाल्या. या यंत्रणेद्वारे आधारच्या सहाय्याने ऑनलाईन पॅन कार्डची सुविधा त्वरित पुरवली जाणार असून, त्यासाठी कुठलाही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसणार आहे.
पॅन-आधार जोडणीस आठव्यांदा मुदतवाढ!
देशात आर्थिक देवाण-घेवाण व प्राप्तिकर परतावा करण्यासाठी पॅन कार्ड/क्रमांक असणे गरजेचे असते. नागरिकांसाठी ते कायमस्वरूपी खाते क्रमांक (परमनंट अकाउंट नंबर) असते. प्राप्तिकर विभागाकडून एनएसडीएल आणि युटीआय-आयटीएसएल या दोन एजन्सीजच्या माध्यमातून पॅन कार्ड वितरित केले जातात. प्राप्तिकर कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना आपल्या आधार क्रमांकाचा उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२० पर्यंत पॅन-आधार जोडणी करणे बंधनकारक आहे.
दुसरीकडे, अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये ई-वाणिज्य कंपन्यांच्या संचालकांना स्रोतस्थानी कर कपात (TDS – Tax Deducted at Source) करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार पॅन किंवा आधार असलेल्या देयक सहभागींवर १% दराने, तर पॅन किंवा आधार नसलेल्यांवर ५% दराने कपातीची परवानगी देण्यात आली आहे.
◆◆◆