आयुषच्या नोटीसनंतर पतंजलीची माघार ; कोरोनावर कोणतेही औषध नाही

ब्रेनवृत्त, २९ जून


उत्तराखंडच्या आयुष विभागने नोटीस जाहीर केल्यानंतर पतंजलीने कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून माघार घेतली आहे. आयुष मंत्रालयाने काढलेल्या नोटिसला उत्तर देताना पतंजलीने कोरोनावर औषध बनवल्याचा दाव्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे. तसेच, ‘कोव्हिड-१९’ रुग्णांना बरे करणारे कोणतंही औषध बनवले नसल्याचं पतंजलीने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पतंजलीचे संस्थापक योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोना विषाणूवर औषध आणल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणे, त्यांनी ‘कोरोनिल‘ (Coronil) हे औषध बाजारातही आणले. ‘कोरोनिल’ नावाचे हे औषध पतंजलीनं विक्रीसाठी उपलब्ध केले आणि जाहिरातही केली. मात्र, केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाच्या चाचण्या सुरू केल्या.

 

दुसरीकडे, पतंजलीचं औषध जगासमोर आल्यानंतर उत्तराखंड आय़ुष विभागाने परवानगी दिली नसल्याचे सांगितले. तसेच आयुष विभागाने याबाबत आपले स्पष्टीकरण देताना म्हटले, ”पतंजलीने औषध बाजारात आणले, मात्र उत्तराखंड आयुष विभागाने कोरोनावर औषध बनवण्याची परवानगी घेतली नव्हती. पतंजलीनं केवळ ताप, खोकला व प्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध बनवण्यासाठी परवानगी घेतली होती. त्यांच्या अर्जात कोरोनाचा उल्लेखही नव्हता.” त्यानंतर २४ जून रोजी पतंजली दिव्या फार्मसीला नोटीस बजावण्यात आली. सध्या केंद्र सरकारने कोरोनाची जाहिरात व विक्री बंद केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय या औषधाच्या चाचण्या घेत आहे, असेही यावेळी आयुष विभागाने सांगितले.

चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवा : शासनाचे पतंजलीला आदेश

कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवरील लसीचे संशोधन करण्यासाठी संपूर्ण जगभरातील संशोधक युद्धपातळीवर कार्यरत आहेत. त्यातच पतंजलीने कोरोना विषाणूवर औषध शोधल्याचा दावा केल्यानंतर याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र औषधावर आक्षेप घेत केंद्र सरकारपासून ते उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: