तान्हापोळानिमित्त चिरेखनी गावात विविध स्पर्धांचे आयोजन

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी

तिरोडा, १ सप्टेंबर

लहान-लहान मुलांचा आनंदोत्सव म्हणजे पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा म्हणजे ‘तान्हापोळा’. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बालगोपाळांचा तान्हापोळा उत्सव काल उत्साहात पार पडला. गावातील तरुणवर्ग, वरिष्ठ गावकरी व पालकवर्गाच्यावतीने तान्हापोळानिमित्त शाळकरी मुलामुलींसाठी संगीतखुर्ची, हंडीफोड, धावस्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सोबतच, मुलांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले,तर स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

तान्हापोळा निमित्त चिरेखनी गावात आयोजित कार्यक्रमाला बाळगोपाळांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

बाळगोपाळांचा उत्साह वाढवणारा आणि समस्त ग्रामवासीयांसोबत वर्षातून एकदा साजरा केला जाणारा सण म्हणजे ‘तान्हापोळा’. तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात यानिमित्ताने विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून मुलांसाठी हा उत्सव साजरा करण्यात आला. मुलांनी त्यांचे लाकडी नंदीबैल विविध रंगांनी आणि सजावटीच्या साहित्यांनी सजवून आणले होते.

 

मुले व त्यांच्या पालकांची गावाच्या दोन्ही चौकात तान्हापोळानिमित्त गर्दी उसळली होती. मोठ्या चौकात तान्हापोळानिमित्त गावकरी वर्ग व विशेषकरून तरुण मंडळींनी गावातील लहान मुलामुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. गावातील वरिष्ठ मंडळी आणि पालकवर्गांच्या सहाय्याने आपले विविधरंगी नंदीबैल घेऊन उत्सवात सहभागी झालेल्या लहान मुला-मुलींना अंकलिपी, नोटबुक्स, पेन-पेन्सिल अशा विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. सोबतच, मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊंच्या पाकिटांचेही वाटप गावकऱ्यांतर्फे आले.

तान्हापोळाच्या निमित्ताने मुलींसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
धावण्याच्या शर्यतीसोबतच लहान मुलांसाठी हंडीफोड स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले.

तान्हापोळानिमित्त गावात विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले. शाळकरी मुलांची वर्ग १ ते ५ वी, ६ वी ते ८वी आणि ९ ते वरील वर्ग अशा तीन गटांत धावण्याची शर्यत आयोजित करण्यात आली. त्यानंतर, हंडीफोड आणि मुलींसाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील मुलामुलींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि मुलांचे उत्साहवर्धन करण्यासाठीही पालकवर्ग व नागरिकांची गर्दी उसळली होती. तान्हापोळाच्या या उत्सवाच्या शेवटी विविध स्पर्धांच्या प्रथम तीन विजेत्यांना पदक व रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

गावातील तान्हापोळ्याचा हा उत्सव सर्वांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला आणि युवकवर्गाने नियोजन केलेल्या विविध स्पर्धांमुळे या उत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली.

यावेळी गावाचे माजी सरपंच घनश्यामभाऊ पारधी, माजी उपसरपंच सोनुभाऊ पारधी, मान्यवर शिक्षक भुवनलालजी बिसेन, घनश्यामजी पारधी व इतर वरिष्ठ नागरिकगण उपस्थित होते. सोबतच मुन्ना रहांगडाले, अमोल चचाणे, आकाश बिसेन आणि इतर युवकवर्गाने तान्हापोळ्याच्या उत्सवाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तर, गावच्या लहान चौकात शाळकरी मुला-मुलींसाठी तान्हापोळा भरवण्यात संजुभाऊ पारधी आणि सोबतच्या मंडळींनी विशेष मेहनत घेतली. यावेळी गावच्या युवकांनी व वरिष्ठ नागरिकांनी बाळगोपाळांना विशेष प्रोत्साहन दिले, तर पालकवर्गाने त्यांच्या मुलांसह उपस्थित राहून मुलांचा आनंद द्विगुणीत केला. तान्हापोळा निमित्त आयोजित कार्यक्रमाचे व विविध स्पर्धांचे निवेदन कुवरलालजी चचाणे, कार्तिक बिसेन आणि रामेश्वर कुर्वे आदींनी केले.

 

◆◆◆

 

तुमच्या परिसरातील घडामोडी आणि विविध उपक्रमांविषयी आम्हाला कळवा थेट इमेलवरून. www.marathibrain.com ला मेल करा writeto@marathibrain.com वर. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: