Site icon MarathiBrain.in

दारू दुकाने उघडल्याने बाटलीसह कोरोना आणि हिंसाही घरी पोहचेल : डॉ. अभय बंग

“मद्याची दुकाने सुरू झाल्याने तिथे लोकांची गर्दी होईल आणि तिथे नियम न पाळण्याची जास्त शक्यता आहे. सोबतच, त्या गर्दीतून पुरुष दारूच्या बाटलीसह कोरोना व तसेच, हिंसा घरी घेऊन येईल”, अशी चिंता समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेनवृत, ४ मे

कोरोना विषाणू’चा फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना मद्य विक्रीला परवानगी देऊन शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी आज केली. देशात तिसऱ्या लॉकडाऊनची आज सुरुवात झाली आणि काही आर्थिक व्यवहारांसह मद्य विक्रीलाही आजपासून परवानगी देण्यात आली. यामुळे, देशभरात विविध ठिकाण मद्यप्रेमींनी पहाटेपासूनच मद्य दुकानांसमोर रांगा लावल्या. याविषयी, जेष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी चिंता व्यक्त केली आहे.

संग्रहित छायाचित्र

कोव्हिड-१९‘च्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशात आजपासून लॉकडाऊनचे तिसरे सत्र सुरू झाले. मात्र, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था बघता यावेळी केंद्राने काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरू करण्याचे ठरवले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यशासनाने राज्यातील बहुतांश भागांत मद्याची दुकाने सुरु करण्याला सशर्त परवानगी दिली. त्यामुळे आज सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत वाईन्स सुरू करण्यात आली.  मात्र, कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी देऊन शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केली आहे.

डॉ. बंग म्हणाले, “दारूची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले न जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारूच्या बाटलीवाटे घरी करोना घेऊन येतील. सोबतच घरपोच हिंसाही घेऊन येतील. त्यामुळे ही लोकांना घरपोच करोना पोहोचविण्याची योजना असावी, असे स्वरूप शासनाच्या या निर्णयामुळे निर्माण होईल.”

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात शासनाने देशातील ‘रेड झोन‘मधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी सर्वच ठिकाणची दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या या काळात गेल्या महिनाभरापासून शासनाने मद्य, खर्रा व तंबाखूवर घातलेल्या बंदीचा हजारो पटीने फायदा या काळात झाला. ही बंदी कायम ठेवली असती, तर लोकांचा आणखी फायदा झाला असता. पण दुर्दैव असे की दारुमुळे मार खाणारी जनता बोलत नाही. ती उलट दारूच्या दुकानासमोर रांग लावते. जनतेचे हित आणि आरोग्य हा जर शासनाचा हेतू आहे. अशा निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले जात असल्याची खंतही डॉ. बंग यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : जाणून घ्या मुळव्याधीवरील घरगुती उपाय

● दारूमुळे दरवर्षी पाच लाख मृत्यू

दारू विक्रीस मान्यता देण्याच्या पार्श्वभूमीवर संभावित सामाजिक समस्यांसह, डॉ. बंग यांनी देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले, आज भारतात ४२ हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, तर १३०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.  ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे.  दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी दारूमुळे पाच लाख मृत्यू होतात. भारतातील ५ कोटी लोक दारूच्या व्यसनाने ग्रासलेले आहेत.  म्हणजे कोरोना संसर्गामुळे होणार्‍या मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजार पटीने जास्त आहेत. मग काम बंद, कमाई बंद पण दारू सुरू हे करण्यामागचे रहस्य काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

◆◆◆

Exit mobile version