‘फोटो आणि नमी’

ती आणि तिच्या चार मैत्रिणी आल्या होत्या फोटो काढायला. १२वी नंतर ती जास्त माझ्याकडे फिरकली नाही. एकदाच आली होती फुल साईझ फोटो काढायला, समोरच्या मुलाला द्यायचा होता. मला जरा जरा अंदाज आला होता आणि ती चटकन बोलून गेली, “लग्न ठरलं आहे माझं.”

 

ब्रेनसाहित्य | फोटो आणि नमी

काय राव विसरला वाटतं आम्हाला? असं कुठं असतंय व्हय? आम्ही नाही बाबा विसरलो कुणाला. आणि विसरणार तरी कसे ना. आम्ही म्हणजे ‘आठवण’ असतो बाबा सर्वांची. अन् तीच जर पुसली, तर मग कसं होणार ना? म्हणून आम्हाला सर्व आठवत आणि विसरूनही चालत नाही.

कसले भारी दिवस होते ना आमचेपण! मस्तपैकी मोठ्या कॅमेरामध्ये ‘रीळ’ म्हणून बसायची मज्जा काही औरच होती. सर्व त्या रीळला ‘निगेटिव्ह’ म्हणायचे आणि ह्या निगेटिव्हमधून आम्ही बाहेर पडायचो. मात्र आता या मोबाईलमध्ये आम्हाला बंद करून ठेवलं आहे. कधी कधी त्या मोबाईलमध्ये इतका दम कोंडतो ना, असं वाटत मारतोय की काय. त्यांनी कॅमेराचे फिचर दिले आहे म्हणून मग काय कितीपण काढणार का? बाबा रे बाबा! कसले कसले फोटो काढता तुम्ही. वाकडे, तिकडे, साईड व्हीव, टॉप व्हीव आणि काही काहीचे तर आम्हाला नावही माहीत नाहीत. कधी कधी तर अस वाटतं, तुम्ही फिरायला गेल्यावर डोळ्यांनी कमी पाहता आणि फोटोच जास्त काढता.

काय तो आमचा काळ होता. आमच्यासाठी स्टुडिओ बनवला जायचा. मला की नाही त्या चार-पाच पोरी अंतिम वर्षाला असताना नटून फोटो काढायला यायच्या ना ते खूप आवडायचं. त्या आठवणी अजूनही तशाच ताज्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच नमी माझ्याकडे पाहून ढसाढसा रडली बिचारी. मला अजूनही आठवतंय, १९९६ ची तिची बारावीची बॅच होती. जाम आवडायची राव ती आपल्याला. एका क्षणात प्रेम होणे काय असत ना, ते मी तिला पाहिल्यावर अनुभवलं होतं.

ती आणि तिच्या चार मैत्रिणी आल्या होत्या फोटो काढायला. १२वी नंतर ती जास्त माझ्याकडे फिरकली नाही. एकदाच आली होती फुल साईझ फोटो काढायला, समोरच्या मुलाला द्यायचा होता. मला जरा जरा अंदाज आला होता आणि ती चटकन बोलून गेली, “लग्न ठरलं आहे माझं.” सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा मी, पण त्यावेळी माझ्याच डोळ्यात अश्रू आले होते. थोड्या वेळानी ती बोलली, “लग्नात फोटो काढण्यासाठी तूच यायचं.” मी पटकन डोळे पुसले आणि ठरवलं आता रडायचं नाही. माझ्या नमीचे फोटो असले भारी काढणार ना, की पाहणाऱ्याने नुसते पाहताच राहिले पाहिजे.

लग्नाच्या दिवशी मी नमीला डोळे भरून पाहिले. तिचा प्रत्येक सुखाचा क्षण मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. मला माझी लायकी समजली होती, कोणावरही जीव लावायचा नाही. पण का कुणास ठाऊक, माझी नमी माझ्यावर अजूनही प्रेम करते की काय? कधी कधी ती हेच फोटो पाहते, हसते, आनंदी होती. मग मला खूप बरं वाटतं. खूप साऱ्या लोकांच्या आठवणी आहे मी. काही लोक मला हातात घेऊन रडतात, त्यांच्या जुन्या आठवणीत गुंग होऊन जातात. सर्वात जास्त मज्जा ना त्या प्रेमी युगुलांची येते. कुठे कुठे लपवून ठेवता मला! धड इंग्रजीचा ‘इ’ येत नाही आणि त्या पुस्तकात मला ठेवलेलं. मला पाहतात आणि आनंदी होतात. नवरा-नवरीला लग्नात काय काय गोष्टी घडल्या ते मी सविस्तरपणे सांगतो.

प्रातिनिधिक छायाचित्र

एका सैनिकांची पत्नी माझ्याकडे तासंतास पाहत होती. दुसरीकडे, तिचा पती पॉकेटमधून मला हळूच पाहून परत पॉकेट ठेवून देत होता. एका बापाची आपल्या मुलाला नौकरी लागली म्हणून माझ्याकडे पाहून छाती फुलली होती. एक मुलगा माझ्याकडे पाहून आई-बापाच्या आठवणीत दूर कुठेतरी गेला होता. एक चिमुकली माझ्याकडे पाहून “आजी-आजी” असा आवाज देत होती.

कधी जर तुम्हाला तुमची पंजी, खापर-पंजी, काळं तोंड, निळं तोंड पहायचे असतील, तर मला फक्त एक आवाज द्या.आज मला तुम्ही कॉम्प्युटर, मोबाईल सारख्या डब्ब्यात कोंडून ठेवलं आहे. माझी मुळीच तक्रार नाही. असुदे, काळानुसार बदललं सर्व. पण मला आठवण येते. मलाही संवेदना आहेत, मला पण रडू येत. मी नाही विसरू शकत काहीही. जास्त काही नको, तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट कराल? मला त्या आठवणीत घेऊन जा. तो डब्बा कधीतरी उगढून मला माझं जग परत-परत दाखवा.

आणि हो! “नमे तू माझ्यावर प्रेम करतेस. मला कळलं आहे. असाच प्रेम करत राहा. तुझाच एक ‘फोटो’ !”

 

लेख : प्रविण सानप

ट्विटर : @ErPravinSanap

ई-पत्ता : pravinsan9421@gmail.com

संपादन व मुद्रितशोधन : मराठी ब्रेन

Join @marathibraincom


(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

लेखावरील आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !

अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: