ओडिशा तटावरून QRSAM प्रणालीचे यशस्वी प्रक्षेपण

स्थिर तसेच गतीत असलेल्या लक्ष्यांना शोधण्याची व त्यांचा पत्ता लावण्याची क्षमता या क्षेपणास्त्र प्रणालीत आहे. भारतीय लष्कराला हवाई संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

 

वृत्तसंस्था, एएनआय

ब्रेनवृत्त, चांदीपूर

भारताने काल (शुक्रवारी) ओडिशाच्या बालासोर समुद्र किनाऱ्यानजीक ‘जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्वरित प्रतिक्रिया क्षेपणास्त्र’ (QRSAM :Quick Response Surface to Air Missile) प्रणालीची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. यावेळी क्षेपणास्त्राने ३० किमी अंतरावरील चालक नसलेल्या लक्ष्याचे थेट भेदन केले. काल दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी या क्षेपणास्त्राचे एकात्मिक चाचणी क्षेत्र, चांदीपूर (ITR Chandipur) येथून प्रक्षेपण करण्यात आले.

संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या उपप्रणालींचा समावेश असलेल्या या क्षेपणास्त्राचे एकल टप्पा घन-नोदक (Single Stage Solid Propellant) रॉकेेेट मोटरच्या वापराने प्रणोदन (Propulsion) करण्यात आले. या क्षेपणास्त्राने काल सुमारे ३० किमी लांबीवरील लक्ष्याला अचूकपणे भेदले. जास्तीत जास्त १०० किमी अंतरावरील लक्ष्यांना भेदण्याच्या क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. ६ कॅनिस्टराईज्ड क्षेपणास्त्रांचे वहन करण्याची क्षमता असलेल्या मोबाईल प्रक्षेपकाद्वारे या क्षेपणास्त्राचे वहन व प्रक्षेपण करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

ओडिशाच्या चांदीपूर तळावरून QRSAM प्रणालीची चाचणी यशस्वीपणे पार पडली

बॅटरी बहुकार्य रडार, बॅटरी टेहाळणी रडार, बॅटरी कमांड पोस्ट वाहन व मोबाईल प्रक्षेपक यांसारखे QRSAMचे सर्व घटक चाचणीच्या वेळी तैनात करण्यात आले होते. स्थिर तसेच गतीत असलेल्या लक्ष्यांना शोधण्याची व त्यांचा पत्ता लावण्याची क्षमता या क्षेपणास्त्र प्रणालीत आहे. भारतीय लष्कराला हवाई संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

ब्रेनबिट्स | जाणून घ्या लढाऊ विमाने सुखोई-३०एमकेआय व मिग-२९ विषयी

चाचणीच्या सुरुवातीला रडारने दूरवरच्या पल्ल्यावर असलेल्या बंशी (Banshee) लक्ष्याचा शोध घेतला व जेव्हा लक्ष्य मारक क्षेत्रात (Kill Zone) आले, त्यावेळी क्षेपणास्त्र प्रक्षेपित करून त्यास भेदण्यात आले. डीआरडीएल, आरसीआय, एलआरडीई, आर एन्ड डी ई, आयआरडीई व आयटीआर या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) प्रयोगशाळांनी या चाचणीत सहभाग घेतला.

हेही वाचा | नौदलाच्या युद्धनौकेवरून ब्रह्मोसची यशस्वी चाचणी !

ही क्षेपणास्त्र प्रणाली संरक्षण क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक लिमिटेड व खासगी क्षेत्रातील एल अँड टी कंपनीद्वारे तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व सरंक्षण व विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: