खड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येला वैतागून नागरिकांचे ‘रस्ता बंद आंदोलन’

अनेक वर्षांपासून गावातील खड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येला कंटाळून तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावच्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाविरोधात थेट बेमुदत ‘रस्ता बंद आंदोलन’ पुकारले आहे.

 

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी

तिरोडा/गोंदिया, दि.१९ सप्टेंबर

खड्डेमय रस्त्यांच्या समस्येला घेऊन तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावात नागरिकांनी बेमुदत ‘रस्ता बंद आंदोलन’ पुकारले आहे. गावातील मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाणी-चिखलामुळे वाहतुकीस घातक ठरत आहे, मात्र स्थानिक प्रतिनिधी आणि जिल्हा परिषद यांच्याकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षाच्या विरोधात गावातील तरुणांनी रस्त्यावर लाकडं आडवी करून आज बेमुदत ‘रस्ता बंद’ आंदोलन पुकारले आहे.

नागरिकांनी खड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येला वैतागून ‘रस्ता बंद आंदोलन’ पुकारले आहे.

राज्यातील अनेक शहरांत आणि गावांमध्ये रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि खड्डेमय रस्ते ही समस्या सद्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागात तर दैनंदिन रहदारीचे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. तिरोडा तालुक्यातील चिरेखनी गावातही खड्डेयुक्त रस्त्यांची समस्या कायम असून, स्थानिक जनप्रतिनिधी या समस्येकडे कानाडोळा करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील काही नागरिक व तरुणांनी मुख्य रस्ता अडवून बेमुदत ‘रस्ता बंद आंदोलन’ सुरू केले आहे. गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वार्ड मेंबर, जिल्हा परिषद सदस्य, आमदार व एकूणच संबंधित जनप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.

आज (दि.१९) सकाळपासून गावातील शंकर मंदिर चौकाच्या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर लाकडं आडवी करून मुख्य रस्ता अडवून धरला. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावरून मोठ्या वाहनांची ये-जा बंद राहिली. चिरेखनी गावातून ‘चिरेखनी बसस्थानक ते पंचायत समिती तिरोडा’ हा मुख्य रस्ता जातो. मात्र, गावातून जाणारा हा रस्ता नागरिकांच्या दैनंदिन वापराचा असला, तरी या रस्त्याने दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. सोबतच, अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा हा रस्ता कायमच वापरला जातो. मात्र, या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि त्यामुळे वाहतुकीस निर्माण होणारा अडथळा गावकऱ्यांसाठी समस्येचा विषय बनला आहे. कित्येक वर्षांपासून गावातील हा मुख्य रस्ता आणि इतर रस्ते खड्डेमय झाले आहेत, मात्र स्थानिक प्रशासनाकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षामुळे गावातील काही नागरिक आणि तरुण मंडळींनी आता थेट रस्ता बंद आंदोलन पुकारले आहे.

मात्र, दिवसभरात या आंदोलनाकडे एकाही जनप्रतिनिधीने येऊन बघितलेही नाही अथवा दखलही घेतली नाही. अशाप्रकारे गावच्या सरपंच आणि इतर ग्रापंचायत सदस्यांनी या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले. माध्यमे दखल घ्यायला आली असता, नेमके सरपंच व बॉडीचे या समस्येवर काय म्हणणे आहे? हे सांगायलाही कुणी उपस्थित नव्हते. दुसरीकडे, तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजयभाऊ रहांगडाले व जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मीबाई तुरकर यांनीही या समस्येची माहिती असूनही सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, जोपर्यंत जनप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना केली जात नाही अथवा योग्य ते पाऊल उचलले जाणार नाही, तोपर्यंत रस्त्यांच्या खड्ड्यांच्या समस्येचा हा प्रश्न लावून धरणार असल्याचे संबंधित रस्ता बंद आंदोलन पुकारणाऱ्या तरुणाईचे म्हणणे आहे.

खड्ड्यांमुळे झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न सरपंच व वॉर्ड मेंबरकडे घेऊन गेल्यावर गैरजबाबदारपणाचे उत्तर त्यांच्याकडून मिळाले असल्याचे येथील तरूणांनी सांगितले. “खड्डेमय झालेला रस्ता सुधारण्यासाठी आम्ही अनेकदा सरपंच शिलाबाई पारधी यांच्याकडे तक्रार केली आणि वॉर्ड प्रतिनिधीकडेही या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. मात्र, सरपंचांकडून कधीही योग्य उत्तर मिळाले नाही. उलट मुख्य रस्ता जिल्हा परिषदेचा आहे, ते बघतील असे उत्तर त्या देतात”, असे रस्ता बंद आंदोलनात सहभागी असलेल्यांनी सांगितले.

तान्हापोळानिमित्त चिरेखनी गावात विविध स्पर्धांचे आयोजन

दुसरीकडे, गावातील मुख्य रस्ता हा जरी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असला, तरी स्थनिक जनप्रतिनिधींनी या विषयाची दखल घेत या समस्येचा मागोवा घ्यायचा असतो. या संदर्भात आंदोलनकर्त्या तरुणांनी कित्येक दिवसांआधी सरपंचांना प्रश्न केला असता, त्यांनी “माझ्याकडे याचे काही नाही. मला विचारु नका. कधीकधी मलाच सरपंच पदाचा राजीनामा द्यावा असे वाटते” असे उत्तर सरपंचांनी दिले असल्याचे उपस्थित आंदोलनातील एकाने सांगितले. सोबतच, खड्ड्यांच्या समस्येचा प्रश्न कमिटीकडे मांडण्यासाठी संबंधित नागरिकांनी वॉर्ड प्रतिनिधी पौर्णिमा पारधी यांच्याकडे विनंती केली असता, त्यांनी वार्ड प्रतिनिधी पदाचा राजीनामा कधीच दिला असल्याचे आणि माझ्याकडे आता काही नाही, असे म्हटले असल्याचे रस्ता अडवणाऱ्या युवकांनी म्हटले आहे.

खरंतर, गावातून जाणार हा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे, असे म्हणून जनप्रतिनिधींकडून नेहमीच खड्ड्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाला आहे. मुख्यत्त्वाने गावातल्या लोकांच्या दैनंदिन रहदारीचा असलेला हा रस्ता संकटग्रस्त झाला आहे. ऐन पावसाळ्यात हे खड्डे चिखल-पाण्याने भरतात व समस्या अजूनच गंभीर होत जाते. शाळकरी मुलांसह अनेक लोक या रस्त्यावरून प्रवास करतात. दरम्यान, गावातील काही लोकांनी आणि तरुणांनी मुख्य रस्ता बंद केला असला आणि जनप्रतिनिधींकडून तो जिल्हा परिषदेचा आहे असे सांगण्यात येत असले, तरी गावातील इतर रस्तेही असेच खड्डेमय झाले आहेत. त्यांकडेही गावच्या प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे, असे उपस्थित नागरिकांकडून कळले.

खड्ड्यांच्या समस्येसाठी गावच्या नागरीकांनी पुकारलेल्या या रस्ता बंद आंदोलनात परिसरातील स्त्रिया, वरीष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि लहान मुलांनीही सहभाग नोंदवला आहे. आकाश बिसेन, अनिल रिनाईत, कार्तिक कुर्वे, सोनू पारधी, प्रेम पारधी व इतर तरुणांनी या रस्ता बंदचे नेतृत्व केले आहे. गावच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ही अनेक वर्षांची समस्या असून, जनप्रतिनिधींकडून जोपर्यंत योग्य निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हा विषय आम्ही लावून धरणार असल्याचेही आंदोलकांनी म्हटले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: