विविध कर्ज रेपो रेटशी जोडण्यासाठी आरबीआयचे बँकांना आदेश

वृत्तसंस्था | नवी दिल्ली

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशातील बँकांना त्यांच्यातर्फे दिले जाणारे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि लघु उद्योगांसाठी दिले जाणारे कर्ज यांना १ ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर वरील तिन्ही कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

वाहनकर्ज, गृहकर्ज आणि लघु उद्योगांसाठीच्या कर्जावर बँकांद्वारे आकारण्यात येणाऱ्या मनमानी व्याजदराच्या कारभारावर आता चाप बसणार आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून वरील सर्व प्रकारचे कर्ज रेपो रेटशी (आरआर) जोडण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत आरबीआयने सातत्याने व्याजदरात कपात केली आहे, मात्र त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचत नसल्याचे कळल्यावर, आरबीआयने कर्ज रेपो रेटशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

वेळोवेळी आरबीआयद्वारे करण्यात आलेल्या रेपो रेट कपातीनंतर ठरावीक राष्ट्रीय बँकांनीदेखील त्यांचा व्याजदर कमी केला आहे. परंतु अनेक बँकांनी त्या प्रमाणात कर्जांवरील व्याजदर कमी केले नाहीत, त्यामुळे सामान्यांना आरबीआयच्या कमी केलेल्या रेपो रेटचा फायदा मिळत नव्हता. यासाठी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्वतः याबाबत खंत व्यक्त केली होती. यावर तोडगा म्हणून सर्व प्रकारचे कर्ज रेपो रेटशी जोडण्याचे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: