ओझोनचा थर : पृथ्वीवरील जीवसृष्टीचा संरक्षक

आज जागतिक ‘ओझोन दिवस’, अर्थातच आपल्या वातावरणात असलेल्या ओझोन वायूच्या थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाला ‘आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षक दिवस किंवा जागतिक ओझोन दिवस’ (International Day for the Preservation of the Ozone Layer) असेही म्हटले जाते. या ‘ओझोन दिना’च्या निमित्ताने आपण ओझोनविषयी व ओझोनशी संबंधित विविध बाबींचा आढावा इथे घेणार आहोत.

 

ब्रेनविशेष | जागतिक ओझोन दिवस

सागर बिसेन @sbisensagar


● ‘ओझोन’ म्हणजे नेमकं काय?

ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र ‘O3’ असे लिहितात. ओझोन हा ऑक्सिजनचा एक विशेष प्रकार आहे. आपण ज्या ऑक्सिजनचा श्वास घेतो आणि पृथ्वीवरील जीवनासाठी जे आवश्यक आहे ते ‘O2’ आहे. असे असले तरी, ओझोन हा आपल्या वातावरणाचा एक छोटासा, परंतु मानवी अस्तित्वाचा महत्त्वाचा भाग आहे. बहुतांश ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 ते 40 कि.मी. पर्यंतच्या उंचीवर असतो. या प्रदेशास ‘स्ट्रॅटोस्फियर‘ असे म्हणतात आणि त्यात वातावरणातील सर्व ओझोनपैकी 90% समाविष्ट असतो

 

● ओझोनचा शोध
क्रिस्टियन फ़्रेड्रिक स्कोएनबेन या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला. 1913 साली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी पृथ्वीवरील ओझोन थराचा शोध लावला. 1930 साली भौतिकशास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली.

 

● ओझोन म्हणजे जीवन संरक्षक

सहसा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 7 ते 25 मैल, म्हणजेच सुमारे 11 ते 40 किलोमीटरपर्यंत वर आकाशात स्थिरवलेला हवेचा थर म्हणजे ‘ओझोनचा थर’. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जात असताना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘स्ट्रॅटोस्फिअर’ या थरातच ओझोनचा (O3) थर आहे. हे ओझोन एखाद्या सनस्क्रीनप्रमाणे कार्य करते व पृथ्वीवर येणार्‍या सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून व सोबतच, त्यामुळे होणार्‍या हानीकारक प्रभावांपासून जीवसृष्टीचा बचाव करते. अर्थातच, मानवी जीवनाला अतिनील किरणांच्या धोक्यापासून वाचवण्याचे कार्य हे ओझोन करत असते.

मात्र, आधुनिक काळात ज्या झपाट्याने तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण विस्तारत व विकसित होत गेले, तसतसे विपरीत परिणाम या ओझोनच्या थरावर पडू लागले. कालांतराने, मानवी जीवसृष्टीसाठी वरदान असलेल्या या ओझोनवर पृथ्वीवर उत्सर्जित होणाऱ्या विविध हानिकारक वायूंमुळे वाईट परिणाम पडले. या हानिकारक वायू आणि रासायनिक क्रियांमुळे ओझोनच्या थरावर खूप मोठे भगदाड निर्माण झाले, म्हणजे त्यातील ओझोनचे थरच नाहीसे होत गेले आणि नको ते परिणाम आज पृथ्वीवर दिसू लागले आहेत. त्यामुळे ह्या ओझोनला वाचवणे अपरिहार्य ठरले आणि त्याचाच वैश्विक प्रयत्न म्हणून जागतिक स्तरावर ओझोन संरक्षणासाठी विविध पर्याय योजले गेलेले. यामुळे ओझोनच्या पुनर्निर्मितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून यश येऊ लागले आहे. हे प्रयत्न काय होते ते बघणे महत्त्वाचे आहे.

● प्रवास ओझोन संरक्षणाचा

ओझोन थर कमी करण्यास प्रामुख्याने वातावरणातील अथवा विविध ठिकाणांतून उत्सर्जित होणारे क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) आणि इतर काही रसायने कारणीभूत ठरतात. यामुळे ओझोन थराच्या संरक्षणासाठी दि. 16 सप्टेंबर 1987 रोजी कॅनडातील मॉन्ट्रियल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षर्‍या केल्या. हा करार ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा होता. हा करार The Montreal Protocol on Substances that Deplete the Ozone Layer, म्हणजेच मॉन्ट्रियल करार’ म्हणून ओळखला जातो.

मॉन्ट्रियल करारामधून ‘CFC’च्या उत्पादनावर बंदी आणणे, त्यांना पर्यायी रसायने शोधणे वगैरे उपाययोजना आखण्यात आल्या. या करारातल्या अटी 1989 सालापासून लागू झाल्या. भारताने 1992 सालापासून मॉन्ट्रियल करारातील उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. १९८७ मध्ये झालेल्या कराराचे स्मरण म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने 1994 मध्ये 16 सप्टेंबर हा ‘ओझोन दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. सन 1995 मध्ये पहिला ‘जागतिक ओझोन दिवस’ साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम’ या विशेष संस्थेतर्फे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना ‘३२ वर्षे आणि उपचार’ ही ठेवण्यात आली आहे. मागच्या वर्षी ‘थंड राखा आणि राखत रहा’ या संकल्पनेखाली ओझोन दिवस साजरा करण्यात आला होता.

● ओझोनसंबंधी काही महत्त्वाचे करार

१. व्हिएना करार : ओझोन थराच्या संरक्षणार्थ व्हिएना करार (Vienna Convention for the Protection of the Ozone Layer) – 22 मार्च 1985

२. मॉन्ट्रियल करार : ओझोन थराचे क्षपण करणाऱ्या पदार्थांवरील नियमावली पाळण्याचा करार ( The Montreal Protocol on Substances that Deplete the Ozone Layer) – 16 सप्टेंबर 1987

३. वरील दोन्ही करारांना 16 सप्टेंबर 2009 रोजी जागतिक मान्यता मिळाली. अशी जागतिक मान्यता मिळवणारे संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासातील हे पहिलेच करार आहेत.
४. 15 ऑक्टोबर 2016 रोजी किगाली (रवांडा) येथे आयोजित परीषदेत Montreal Protocol मध्ये दुरूस्ती करण्यात आली.

 

● ओझोनविषयी सद्यस्थिती

NASA च्या ‘औरा’ उपग्रहाने केलेल्या मोजमापानुसार शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून अंटार्क्टिकवरील ओझोन छिद्रामध्ये क्लोरीन पातळीचा अभ्यास करीत आहेत आणि ही पातळी कमी होत आहे. 2005 सालापासून झालेल्या छिद्रामध्ये 20% ची घट झाली असे निर्देशनास आले.
मात्र, दुसरीकडे नेचर्स  या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधाभ्यासानुसार ओझोन वायूच्या थराला धोकादायक ठरणारे आणि कमी करणारे ‘ट्रायकोरोफ्लोरोमिथेन (किंवा CFC-11) या प्रतिबंधित रसायनाचा चीन बेकायदेशीररित्या वापर करीत आहे.

1987 साली झालेल्या मॉन्ट्रियल कराराच्या (Montreal Protocol) अंतर्गत CFC-11 या रसायनाचा वापर संपुष्टात आणला गेला. या करारावर स्वाक्षरी करणारा असूनही आणि 2010 साली CFC-11 याचे उत्पादन थांबविण्याचे मान्य करणार्‍या चीनने अजूनही या पदार्थाचा वापर थांबविलेला नाही, असे एका अभ्यासातून आढळून आले आहे.

दुसरीकडे, ब्रिटनमधील एनवायरनमेंटल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (EIA) या ना-नफा संस्थेनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले, की 2013 सालापासून CFC-11 याचे उत्सर्जन वाढत आहे आणि 2012 सालापासून त्याचे उत्सर्जन 25 टक्क्यांनी वाढले आहे. चीनने सन 2014 ते सन 2017 या काळात वर्षाला सुमारे 13,400 मेट्रिक टन CFC वायूचे उत्सर्जन केले आहे.

शेवटी, ओझोनचे हे थर एखाद्या विशिष्ट देशाला प्रभावित करणारे घटक नसून, पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणारे अत्यावश्यक आवरण आहे. या आवरणाला संरक्षण करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी संयुक्तिकरित्या सोबत येऊन विविध करारानुसार योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे. तेव्हाच ओझोनचा होणारा ऱ्हास आपल्याला थांबवता येईल.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: