ब्रेनविश्लेषण : भारत क्षयरोग अहवाल २०२०

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे मागील आठवड्यात ‘भारत क्षयरोग अहवाल २०२०’ (India TB Report 2020) जाहीर करण्यात आला. या अहवालातील नोंदी आणि त्यासंबंधी निगडित विविध मुद्यांचे विश्लेषण वाचा या ब्रेनविश्लेषणात.

ब्रेनविश्लेषण | क्षयरोग अहवाल २०२०

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoFHW) नुकताच (२४ जून) ‘भारत क्षयरोग अहवाल २०२०’ (India TB Report 2020)  प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 2019 मध्ये भारतात 24 लाखांहून अधिक क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 79,144 क्षयरोगग्रस्त रुग्ण दगावले आहेत.  2019 मधील रुग्णांची ही संख्या 2018 च्या तुलनेत 14% नी वाढली आहे. तसेच एकूण रुग्णांपैकी ११ लाख  (47%) रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत, तर आणखी 47% लोकांवर उपचार सुरू केले गेले असून, त्यांचे निकाल निश्चित करण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या या प्रकाशित अहवालानुसार, भारतात वर्ष 2018 मध्ये क्षयरोगाच्या (TB) एकूण 21,02,828 रुग्णांची नोंद करण्यात आली. या एकूण रुग्णांपैकी 4,83,781 रुग्ण हे खासगी क्षेत्रातील (खासगी संस्थांमध्ये उपचार घेणारे) होते, तर 16,19,047 रुग्ण हे सार्वजनिक क्षेत्रातील होते. उपचार सुरु झाल्यानंतर 96% रुग्णांपैकी 80%, म्हणजेच तब्बल 16,79,267 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

● जगातील २७% क्षयरोगी भारतात

दुसरीकडे, ऑक्टोबर 2019 मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (World Health Organization) प्रकाशित केलेल्या ‘वैश्विक क्षयरोग अहवाला’नुसार (Global Tuberculosis Report 2019) ऑक्टोबर 2019 मध्ये जगातील क्षयरोग्यांच्या एकूण संख्येपैकी दोन तृतीयांश रुग्णांची संख्या असलेल्या आठ देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या आठ देशांमध्ये भारत  (27%), चीन (9%), इंडोनेशिया (8 %), फिलीपिन्स (6%), पाकिस्तान (6%), नायजेरिया (4%), बांगलादेश (4%) आणि दक्षिण आफ्रिका (3%) या देशांचा समावेश आहे. तसेच हे आठ देश आणि संपूर्ण जगभरातील ३० देशांमधील २२ ठिकाणी टीबीचे सर्वाधिक प्रमाण आढळले आहे. तसेच, 2018 मध्ये भारतात क्षयरोगाच्या एकूण घटनांची संख्या 26,90,000 होती.

‘एमओएचएफडब्ल्यू’च्या अहवालानुसार, भारतामध्ये क्षयरोगावर मात मिळविण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न पाहता 2018 च्या तुलनेत 2019 या वर्षात उलट टीबीच्या रुग्णांमध्ये 12% टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे अंदाजे प्रति लाख लोकसंख्येमागे १५९ क्षयरोग प्रकरणांचा नोंदणी दर प्रति लाख लोकसंख्येमागे १९९ इतका झाला. 2019 मध्ये टीबीच्या सर्वाधिक रुग्णांचे प्रमाण खासगी क्षेत्रातून आढळून आले. खासगी क्षेत्रातून आलेल्या रुग्णांचे प्रमाण 6.79 लाख इतके होते.  म्हणजेच एकूण रुग्णसंख्येपैकी 28% रुग्ण हे खासगी क्षेत्रातील होते. हे प्रमाण 2018 च्या आकडेवारीच्या तुलनेत 25% टक्क्यांनी वाढले आहे. तथापि, उपचार घेणारे बहुसंख्य रुग्ण हे खासगी क्षेत्रात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.

कोव्हिड-१९’मुळे आफ्रिकेत पाच लाख एड्सग्रस्त दगावण्याची शक्यता

● संतुलित आहार आणि क्षयरोगावर नियंत्रण

दरम्यान, पौष्टिक आहार न मिळणे, कुपोषण हे क्षयरोग होण्याचे प्रमुख कारण आहेत आणि भारतातील वार्षिक क्षयरोगाच्या अंदाजे 55% घटनेत त्याचे योगदान आहे. एमएचएफडब्ल्यूच्या अहवालात असेही म्हटले आहे की, कुपोषण आणि पौष्टिक आहार न मिळाल्यामुळे रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होणे, इतर संसर्ग होणे अशा अनेक समस्याही उद्भवू शकतात. क्षयरोगाच्या अपचयी (Catabolic) परिणामांमुळे वजन कमी होते, कुपोषण वाढते. म्हणूनच, कुपोषणामुळे या आजाराचा धोका अधिक वाढू शकतो. हे लक्षात घेता, टीबी असलेल्या रूग्णांसाठी पौष्टिक आहार सर्वात महत्त्वाचा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सक्रीय टीबी आणि कुपोषणाच्या उपचारांमध्ये पोषण मूल्ये आणि काळजी हे दोन घटक दिशानिर्देशक म्हणून ठेवले आहेत. टीबी आणि कुपोषण झालेल्या रुग्णांना योग्य आहार, ज्यामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतील व जे त्यांची  रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास आणि आरोग्यास आवश्यक आहेत. असा पौष्टिक आहार देण्यावर आरोग्य संघटनेने भर दिला आहे.

● क्षयरोग : बालमृत्यूंचे प्रमुख कारण

बालकांमधील क्षयरोग (टीबी) हे मृत्युदरांच्या दहा प्रमुख कारणांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर 15 वर्षाखालील तब्बल ११ लाख बालके टीबीने आजारी पडली, तर २ लाख 50 हजार बालके टीबीमुळे मरण पावली. यातील काही बालके ही एचआयव्हीशी संबधित होती. भारतात दरवर्षी बाल क्षयरोगाच्या सुमारे 3 लाख 42 हजार घटनांची नोंद होत असल्याचा अंदाज आहे. हे प्रमाण जागतिक स्तरावर हे प्रमाण 31 टक्के आहे, तर भारतात हे प्रमाण 13 टक्के आहे.

येत्या सहा महिन्यांत भारतात लाखों बालमृत्यूंची शक्यता !

● निधीचा अभाव अभियानाला प्रतिरोधक

भारतातील क्षयरोग निर्मूलनाच्या प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक म्हणजे केंद्राकडून निधीचा अभाव. ‘भारत क्षयरोग अहवाल २०२०’नुसार ‘राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रम’साठी (NTEP : National TB Elimination Programme) विनंती केलेल्या निधीत आणि त्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय वाटणी आणि केंद्राने जाहीर केलेल्या निधीमध्ये खूप फरक होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ सत्तेत आल्यापासून जानेवारी, २०२० पर्यंत, म्हणजेच 2014-15 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांच्या दरम्यान या कार्यक्रमासाठी विनंती केलेले बजेट 13,498 कोटी रुपये होते. तथापि, कार्यक्रमासाठी एकूण बजेटचे वाटप 10,303.36 कोटी रुपये इतके झाले, जे विनंती केलेल्या बजेटच्या सुमारे 76.33% होते. शिवाय, सरकारने राज्यांना दिलेला निधी 3719.46  कोटी रुपये होता. हा निधी अर्थसंकल्पात विनंती केलेल्या एकूण 9398.62 कोटी रुपयांच्या 69.63% आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: