ती काळरात्र !

मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या निर्घृण हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. मुंबईच्या इतिहासातील हा महाभयंकर हल्ला होता.

 

मराठी ब्रेन | गोपाळ दंडगव्हाळे (@GopalDandgavale)

२६ नोव्हेंबर, २०१८

बरोबर १० वर्षांपूर्वी रात्री साडे नऊ-दहाच्या दरम्यान दूरचित्रवाणीवर कुलाबा येथील एका हॉटेलमध्ये दोन गटात भांडण होऊन गोळीबार झाल्याची बातमी फ्लॅश होऊ लागली. आणि त्यानंतर लगेचच अतिरेक्यांनी समुद्रमार्गे मुंबईवर हल्ला केल्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरु असलेल्या बेछूट गोळीबारच्या संदर्भातली बातमी स्क्रीनवर येऊन धडकली! अशा अनपेक्षित बातमीमुळे एकदम थरकाप झाला, अंगावर शहारे आले. पायाखालची जमीन सरकली. आज या घटनेच्या दशकपूर्तीनंतरही हे लिहिताना त्यावेळच्या परिस्थितीची आठवण ताजी झाली. कारण त्यादिवशीच दोन-अडीच तासांपूर्वी ह्याच ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन लोकल पकडून घरी आलो होतो. त्यानंतरच्या दोन-एक तासांनी असं काही होईल याची पूसटशी कल्पनाही मनाला शिवली नव्हती. पण मुंबईत कुठेही केव्हा काय होईल याची अजिबात शाश्वती नाही.

आपल्या मुंबईवर यापूर्वी असंख्य संकटे आली. यांपैकी काही संकटांचा, घटनांचा मी जीवंत साक्षीदारही आहे. पण हा हल्ला मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण आणि भयावह हल्ला होता. असे असले तरी, आजही जगातले सर्वात सुरक्षित मुंबईलाच समजतो. अशी ही बहुरंगी, बहुढंगी मुंबई माझ्या नसानसात भिनली आहे. पण २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. ही फक्त मुंबईकरांसाठी नाही, तर तमाम भारतीयांसाठी कधीही न विसरता येणारी भयावह घटना आहे. पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी २६ ते २८ नोव्हेंबर २००८ या तीन दिवसांत मुंबईतील महत्त्वाच्या स्थळांवर घडवलेला नरसंहार कधीही स्मृतिपटलाच्या आड करता येणार नाही.

पाकिस्तानातील ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्या कटकारस्थानातून २६/११चा कट रचला गेला होता. अजमल कसाब आणि त्याचे नऊ साथीदार मुंबईत बोटीने उतरले. दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागे झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट केला.

स्रोत: NewsNation

२६ नोव्हेंबर २००८ ला रात्री ९:२० वाजता हल्ला सुरू झाला. अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू देरा इस्माईल खान यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या स्टेशनमध्ये घुसल्या घुसल्या ए. के. ४७ रायफलीतून अंधाधुंद गोळीबार सुरु करुन हातबॉम्ब फेकले. त्यांनी अवघ्या १५ मिनिटांमध्ये ५८ लोकांचा बळी घेतला आणि १०४ लोकांना जखमी केले. पुढे त्यांनी आपला मोर्चा कामा इस्पितळाच्या दिशेला वळवला. जी. टी. इस्पितळ आणि मेट्रो सिनेमासमोर गोळीबार सुरु असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. तर तिकडे अरबी समुद्रावर खेटून उभे असलेले हॉटेल ताजमहल पॅलेस आगीच्या ज्वाळांना धगधगत होते. हॉटेलमध्ये अडकलेले पर्यटक ‘ओह गॉड प्लीज सेव अस’ असा टाहो फोडीत मदतीसाठी याचना करत होते. होटेलला पोलिसांचा वेढा होता. दहशतवाद्यांचा धूमाकुळ सुरु होता. पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये युद्धजन्य परीस्थिती निर्माण झाली होती.

हल्ल्यात जखमी झालेल्यांना तत्परतेने जे. जे. रुग्णालयात नेले जात होते. जे. जे. तले दृश्य तर हृदय पिळवटून टाकणारे होते. जे. जे. तले डॉक्टर्स, परिचरिका जखमींवर उपचार करत होते. जखमींना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका कमी होण्याचं नावच घेत नव्हत्या. रक्ताची कमतरता भासू नये यासाठी रक्तदात्यांची लांबच लांब रांग लागली होती. तेव्हढ्यात अतिरेक्यांनी हॉटेल ओबेरॉयवर हल्ला चढवल्याची बातमी आली. हॉटेल ओबेरॉयमधून मोठमोठे आवाज येत होते. वेळ जशी पुढे पुढे सरकत होती, तसा हा हल्ला अधिक मोठा मोठा होत चालला होता. इतका नरसंहार मुंबई प्रथमच अनुभवत होती. अशोक कामटे, विजय साळसकर आणि हेमंत करकरे यांनी स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता झुंज दिली, मात्र  नंतर तेही धारातीर्थी पडले होते. या हल्ल्याच्या वेळी या दहशतवाद्यांचा कराचीस्थित म्होरक्या दुरचित्रवाणी वाहिन्या पाहून मोबाईलद्वारे मुंबईतील अतिरेक्यांना सूचना देत होते. या अशा ‘मॉडर्न टेररिझम’पुढे मुंबई पोलिस व सुरक्षा यंत्रणा पूर्णत: हतबल झाली होती. तितक्यात गिरगाव चौपाटीजवळ पोलिस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळेंनी जिवाची पर्वा न करता छातीवर गोळ्या झेलत एका अतिरेक्याला जिवंत पकडले. आणि मुंबई पोलिसांना पहिले यश मिळाले. ओबळेंच्या अतुलनीय धाडसामुळे हे शक्य झाले. पण त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबईत इतर ठिकाणी अतिरेक्यांच्या वाढलेल्या प्रभावापुढे सुरक्षा यंत्रणा हतबल झालेली असताना, ‘सर्वदा सर्वोत्तम सुरक्षा’ असे ब्रिदवाक्य असलेल्या ब्लॅक कॅट कमांडोंना पचारण करण्यात आहे. संदीप उन्नीकृष्णन यांच्या हौतात्म्याच्या मोबदल्यात ६० तास सुरु सैतानी हिंसाचाराला सर्व अतिरेक्यांचा खातमा करुन सुरूंग लावला. २९ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता ऑपरेशन ब्लॅक टोरँटो संपल्याचे जाहीर करण्यात आले. आणि मुंबईकरांना हायसे वाटले, मुंबईचे जनजीवन सुरळीत सुरू  झाले.

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या अतिरेक्यांनी एकुण १० ठिकाणी हल्ले केले. ताजमधून २०० पोलीस मुक्त करण्यात आले. ६० तासांनंतर मुंबई मुक्त झाली.

पुढे २५ फेब्रुवारीस जिवंत पकडलेल्या एकमेव पाकिस्तानी दहशतवादी कसाबवर ११ हजार ३५० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. कसाबवर ८६ आरोप ठेवले गेले. या खटल्यात सरकारी वकील ऊज्वल निकम यांनी ६५४ साक्षीदार तपासले. २१ फेब्रुवारी २०११ ला कसाबच्या फाशीवर मुंबई उच्च न्यायालयाने अखेर शिक्कामोर्तब केले, तर २९ ऑगस्ट २०१२ ला सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. पण चार दिवस आधीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले असल्यामुळे अत्यंत गोपनीयपणे २१ नोव्हेंबर २०१२ ला कसाबला पुण्यातल्या येरवडा कारागृहात जल्लाद भिवा जाधव यांनी फाशी दिली.

मुंबईला रक्तबंबाळ करणाऱ्या कसाबच्या सुरक्षेवर कोट्यावधी रुपये खर्च झाले. कसाब लटकला पण पाकड्यांच्या भारतविरोधी कारवाया थांबल्या नाहीत. आजही पाकिस्तान अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन काश्मिरात घुसवत आहे. आणि या घुसखोरीला काश्मिरमध्ये मिळणारे स्थानिक पाठबळही वाढत आहे. दुसरीकडे, भारताला या पाकिस्तानी दहशतवादासारखाच देशांतर्गत नक्षलवादाचा धोका आहे. देशभर रक्तरंजित हिंसाचार करुन या नक्षल्यांनी आता आपला मोर्चा शहरांकडे वळवला आहे. तरुणाच्या मनात विष कालवून अर्बन नक्षलिस्ट घडवण्याचा नवा उद्योग सुरु केला आहे. आणि दहशतवादाचे हे नवे स्वरूप अत्यंत घातक आहे. आज २६/११ ची दशकपूर्ती होत असताना या नव्यां स्वरूपाच्या दहशतवादावर मंथन करणे आता तितकेच गरजेचे झाले आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

 

लेख : गोपाळ दंडगव्हाळे

           कल्याण, मुंबई.

इमेल : gdandgavale@gmail.com

ट्विटर : @GopalDandgavale

 

◆◆◆

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: