“साहेब, त्या झेंडावंदनाचे काय झाले हो?”

शिक्षणाच्या दारी शिक्षकांची भासणारी कमी आणि दुसरीकडे शासनाच्या दारी रखडलेली शिक्षकभरती, ह्या दोन्ही बाबी मुलांच्या शिक्षणासाठी व पात्रताधारक बेरोजगार सुशिक्षितांसाठी प्रश्नांकित भविष्य निर्माण करणाऱ्या आहेत. कितीतरी आश्वासने देऊन अद्याप शिक्षकभरतीला योग्य ती सुरुवात न केलेल्या शिक्षणमंत्र्यांना एका अभियोग्यताधारक युवकाचे हे पत्र…

 

नमस्कार विनोदजी,

                   आपणास कधी पत्र लिहावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नाही. पण कारणही तसेच आहे म्हणून लिहावे लागते आहे. तसेच गेल्या वर्षभरात आपल्या 15 ते 20 भेटी झालेल्या आहेतच. त्यामध्ये आपण नेहमीच संवाद साधून 5 ते 10 मिनिटे आश्वस्त करता. परंतु साहेब आज या ई-मेलच्या दुनियेत पत्र लिहिण्यास एक विशेष प्रयोजन आहे, ते म्हणजे शाळेत झेंडावंदन येत आहे. त्यामुळे आम्हा सर्वांच्या मनातील प्रश्न विचारतो, ”साहेब, त्या झेंडावंदनाचे काय झाले हो?”

           माहे फेब्रुवारी 2018 रोजी सलग 13 दिवस आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन केले. दोन -तीन कॅबिनेट मंत्र्यांना गाठून कशीबशी मध्यस्ती केली. आणि जून-जुलै मध्ये भरती प्रक्रिया करू असे म्हणून एक ‘शाश्वत’ शब्द आपण दिलात, “पुढचे झेंडावंदन तुमच्या शाळेत होणार”. पण या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम होता की प्रश्नचिन्ह ते आम्हाला तेव्हा कळले नाही; ते आता कळते. आहो! जेव्हा जेव्हा झेंडावंदन जवळ येते, तेव्हा तेव्हा तुम्हाला विचारावेसे वाटते, “साहेब, त्या झेंडावंदनाचे काय झाले हो?”

           खरंतर तुम्ही राजकारणी प्रत्येक गोष्ट बोलताना पळवाट ही ठेवताच. मला अजून आठवते, जाता जाता त्या भेटीत मिश्किल हास्य करून तुम्ही एक वाक्य म्हणालेले, “झेंडावंदन तुमचे शाळेत होणार, पण साल माहिती नाही.” तरीही, त्या भेटीनंतर 8 वर्ष शिक्षकभरतीची वाट पाहणारे आम्ही हृदयात आणि डोळ्यांच्या बुबुळांत मोठ्या आशेने झेंडावंदनाचे स्वप्न रंगवू लागलो. पण कित्येक झेंडावंदन आले व गेले आणि प्रत्येकवेळी मनी प्रश्न पडला, “साहेब, त्या झेंडावंदनाचे काय झाले हो?”

             साहेब, आपलं नावच विनोद. खरंच या 1,78,000 अभियोग्यता बांधवांचा तुम्ही विनोद करताय असं नाही का वाटत तुम्हाला? शाळेत काय, दरवर्षी प्रथेप्रमाणे झेंडावंदन होतच असते. परंतु स्वतःच्या हाताने माझ्या देशाचा तिरंगा फडकावणे औरच. आजही कुठे तिरंगा डौलाने आकाशात मिरवताना दिसला, तर मनी प्रश्न येतो, “साहेब, त्या झेंडावंदनाचे काय झाले हो?” आठवड्यात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून पुन्हा झेंडावंदनचा मुहुर्त येतोय. सालाबादप्रमाणे आपण अनेक ठिकाणी झेंडावंदन करत आहात, पण यावेळी तुम्हाला एक प्रश्न नक्कीच विचारला जाईल, “साहेब, त्या झेंडावंदनाचे काय झाले हो?”

         काल परवा आपण ABP माझा न्यूज चॅनेलवर मुलाखत दिलीत. त्यावेळी नेहमीप्रमाणे आपला आत्मविश्वास शिखरावर होता, पण यावेळी   त्या अश्वासनातील पोकळपणा आम्हाला जाणवलाच. 5 मार्च पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करतो, असे तुम्ही म्हणाले. परंतु यावेळीसुद्धा तुम्ही साल सांगायला विसरले की हातचा राखून ठेवला हे देवच जाणे. भरती लांबण्यामागाची तुम्ही सांगितलेल्या सबबी इतरांना पटतीलही किंतु आम्हाला मात्र ती न पटणारीच होती. कारण ‘पवित्र पोर्टलचे’ काम घोषणा केल्यानंतर केव्हा सुरू झाले आणि टेंडर केव्हा निघाले यावरची दिनांक बोलकी आहे. खरंतर आपण मनात आणलं असतं, तर ही भरती प्रक्रिया आपण जून-जुलै मध्येच पूर्ण करून आमचे झेंडावंदन 15 ऑगस्ट 2018 रोजीच शाळेत संपन्न झाले असते, पण राजहट्ट आम्हाला नडला. तो म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि खाजगी संस्थांची भरती एकत्र करणे.

          नाही! हा असा विचार तुम्ही बिलकुल मनात आणू नका. आपण घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि उत्तमच आहे. या राजहट्टापायी आम्हा 1,78,000 बांधवांसोबतच अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे शिक्षण घेत असलेल्या मुलांचे पण आपण शैक्षणिक नुकसान केले.  तेव्हा ती मुलं 26 जानेवारी रोजी आपणांस नक्की विचारतील, “साहेब, त्या झेंडावंदनाचे काय झाले हो?”

       साहेब, काल आपण दाखला दिलात की, ‘असर’ (ASER) चा अहवाल. साहेब मी ही एक छोटी NGO चालवतो, मागील 9 वर्षांचा या क्षेत्रातील अनुभव खूप बोलका आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळातील व्यवस्थापन मी जवळून पाहिले आहे. सिस्टीम सोबत सुस्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या ही कर्तृत्वाने शिक्षकांच्या संख्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.  जगात कोणत्याही देशात तरुणाईला मोठी मागणी आहे, कारण त्यांच्यामध्ये क्षमता आणि उमेद मोठ्या प्रमाणात असते. पण या तारुण्यातील ऐन उमेदीची 8 वर्ष सरुन काहींनी तिशी गाठली, काहींनी 35 गाठली तर काही वयोमर्यादा ओलांडून गेलेत. त्याचे तुम्हाला काय? एक मंत्री म्हणून तुम्ही आकड्याचे फुगे फुगवण्यात धन्यता मानणारे. तुम्हाला एकच काम थोडे आहे. ज्या ज्या वेळी तुमची भेट घेतो किंवा तुम्ही टेलिव्हिजनवर येता, त्या त्या वेळी आजूबाजूच्या घरातून प्रश्न विचारले जातात, “काय रे! कधी होईल भरती? तावडे काय म्हणाले?” मग नजर चोरून उत्तर द्यावे लागते, “होईल लवकरच (?)”

       साहेब, शेवटी हात जोडून तुम्हाला विचारतो, “आपण 2018-2019 च्या संचमान्यतेची वाट तर नाही ना पाहत? तसं असेल तर अवश्य सांगा?” तशी योग्य पावले आम्हाला पोटापाण्यासाठी नाईलाजाने उचलायला लागतील. जाता जाता परत एकदा विचारतो, “साहेब त्या झेंडावंदनाचे काय झाले हो?”

        आपल्या उत्तररूपी पत्राची अजूनही आवर्जून वाट पाहतोय…

                                 

                                एक अभियोग्यता बांधव
                                 कल्पेश ठाकरे, ठाणे

 

 

लेख : कल्पेश वासुदेव ठाकरे,

मु.पो. मेट, जि. ठाणे

ईमेल : kalpeshthakare99@gmail.com

ट्विटर : @KalpeshThakre99

 

(संपादन : मराठीब्रेन डॉटकॉम)

◆◆◆

 

(इथे प्रकाशित होणाऱ्या लेखांतील माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असतात व मराठी ब्रेन त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: