४ ऑगस्टपासून चंद्रपूर व गडचिरोलीतील शाळा सुरू होणार!
प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळता गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा ४ ऑगस्ट २०२० पासून सुरु होतील. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात गरीब, आदिवासी मोठ्या संख्येने आहेत. यातील ९० टक्के पालकांकडे स्मार्टफोन, अँड्रॉइड मोबाईल नाहीत.
ब्रेनवृत्त | मुंबई
प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळता गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा ४ ऑगस्ट २०२० पासून सुरु होतील. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात गरीब, आदिवासी मोठ्या संख्येने आहेत. यातील ९० टक्के पालकांकडे स्मार्टफोन, अँड्रॉइड मोबाईल नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे गरीब आदिवासी मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून या भागातील शाळा सुरु सुरू करण्याचा निर्णय राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात टाळेबंदी आहे. अशातच राज्यातील शहरी भागात ऑनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळा कधी सुरु होणार हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या समोर आहे. त्यामुळे मंत्री वडेट्टीवार यांनी या भागातील शाळा सुरु करण्याला परवानगी दिली आहे. या निर्णयानुसार, गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्के शाळा सुरू होतील, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के शाळा सुरू होतील, असंही त्यांनी सांगितले.
नक्की वाचा : आजपासून ‘टिलीमिली’द्वारे दररोज भरणार पहिली ते आठवीचे वर्ग !
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला आहे. याबाबत बोलाताना ते म्हणाले, “कंटेन्मेंट झोनमधील शाळा सुरू होणार नाहीत. मात्र ज्या भागात शाळा सुरु होणार आहेत, त्या भागात शाळा सुरु करण्यासंबधी नियमावली दिली जाईल. तसेच कंटेन्मेंट झोन वगळता बाकी ठिकाणी शाळा सुरू होतील. शाळांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल, त्यांना मुखपट्टी (मास्क) उपलब्ध करून दिले जातील, प्रत्येक विद्यार्थ्याला ठराविक अंतरावर बसवले जाईल, संपूर्ण शाळा सॅनिटाईझ केल्या जातील.”
हेही वाचा : शासनातर्फे ऑनलाईन वर्गांविषयी शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
दरम्यान, चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांत ‘कोव्हिड-१९’चा प्रादुर्भाव कमी आहे. तसेच या जिल्ह्यातील आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची आवश्यक साधनेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. हा विचार करुन या दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या 4 ऑगस्ट रोजी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे.