आदिवासी विकास क्षेत्रातील शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार

ब्रेनवृत्त | नागपूर

कोव्हिड-१९‘च्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात घोषित करण्यात आलेली टाळेबंदी व संबंधित नियम टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत आहेत. अशात राज्यातील आदिवासी विकास क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळांतील इयत्ता ९वी ते १२वीचे वर्ग येत्या १ डिसेंबरपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दिली आहे.

आयुक्तांद्वारे जाहीर करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धीपत्रकानुसार, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाने राज्यातील शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यापूर्वी तसेच सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र ; स्रोत : Citizen Foundation

दरम्यान, आश्रमशाळा या निवासी असल्याने आपल्या पाल्याला शाळेत किंवा वसतिगृहात पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेणे सर्व आश्रमशाळा आणि वसतीगृह यांना घेणे बंधनकारक राहणार आहे. आदिवासी विभागातील शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी 23 ते 29 नोव्हेंबर 2020 या कालावधीत कोव्हिड-१९ चाचणी करून व संबंधित अहवाल मुख्याध्यापकांना सादर करणे अनिवार्य असणार आहे.

वाचा | राज्यात दिवाळीनंतर ९वी ते १२वी वर्ग प्रत्यक्ष भरणार!

● शाळा सुरू करण्याआधी व नंतरसाठीच्या मार्गदर्शक सूचना

– संपूर्ण आश्रमशाळेचा तसेच वसतिगृहांचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक करावा, गर्दी होणार नाही या दृष्टीने विविध समित्या गठीत करून त्यांचे कार्य ठरवावे.

– विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था तसेच निवासव्यवस्था यांचे योग्य नियोजन करणे, शारीरिक अंतर राखण्याबाबतच्या खुणा आणि चिन्हे आश्रमशाळेत आणि वर्गात लावणे.

– राज्यातील शाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे. शालेय वेळापत्रक बनवणे, भोजनवेळेचे नियोजन करणे.

– विद्यार्थ्याच्या आपसातील ६ फुटांचे शारीरिक अंतराचे पालन करणे तसेच संशयित किंवा कोरोना विषाणूबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे.

– यासोबतच, विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षिका आणि गृहपाल यांच्यावर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: