शिल्पा शेट्टी व राज कुंद्रावर सेबीने ठोठावला ₹३ लाखांचा दंड

ब्रेनवृत्त | मुंबई


 भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाने (Securities and Exchange Board of India) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा आणि त्यांच्या विआन कंपनीवर मंडळाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोघांच्या विआन इंडस्ट्रीज लिमिटेडने (VIL) मंडळाच्या अंतर्गत व्यापार प्रतिबंध विषयक नियमांचे (Prohibition of Insider Trading Regulations) उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे.

अश्लील चित्रपटांच्या गैरव्यवहारात अडकलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर अजून एक संकट ओढवले आहे. देशाच्या प्रतिभूती व विनिमय मंडळाने तब्बल ३ लाख रुपयांचा दंड ठोठावून दोघांना व त्यांच्या व्हीआयएल कंपनीला चांगलाच दणका दिला आहे. सेबीचे (SEBI) न्यायालयीन अधिकारी सुरेश मेनन यांनी सर्व बाबी व परिस्थितींचा आढावा घेत हा आर्थिक दंड आकारला आहे. 

मंडळाच्या या आदेशाच्या ४५ दिवसांच्या आतमध्ये तिघांनाही (शिल्पा, राज व विआन इंडस्ट्रीज) संयुक्तपणे हा दंड भरावा लागणार आहे. 

हेही वाचा | फ्रान्सने गुगलवर ठोठावला ५०० दशलक्ष युरोंचा दंड!

● काय आहे प्रकरण?

विआन इंडस्ट्रीज लिमिटेड (VIL) या कंपनीचे समभाग मुंबई रोखे बाजारात (BSE) सूचिबद्ध आहेत. दरम्यान, या कंपनीने तिचे ५ लाख समभाग विशिष्ट प्राधान्य देऊन ४ व्यक्तींमध्ये वाटप केले आहेत. यांपैकी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना प्राधान्याने प्रत्येकी १,२८,८०० समभाग वाटण्यात आले आहेत. पण दोघांनीही याबाबत भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाकडे काहीही सांगितले नाही आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली नाही.

सेबीच्या अंतर्गत व्यापार प्रतिबंध विषयक नियमाच्या (PIT Regulations) नियम ७(२) नुसार, दोघांकडील समभागांची किंमत ₹१० लाखांच्या वर जाते. त्यामुळे दोघांनाही याबाबत मंडळाला कळवणे नियमांनुसार गरजेचे होते. पण दोघांनीही असे न करता मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

हेही वाचा | अदानी प्रकल्पाचे ऑस्ट्रेलियात गैरकृत्य; समभागधारक विरोधात एकवटले!

सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत व्हीआयएलने केलेल्या व्यापार व आर्थिक व्यवहारांचा लेखाजोखा सेबीने तपासाला. या तपासणीतून मंडळाला असे आढळले, की शेट्टी, कुंद्रा आणि व्हीआयएल यांनी नियम ७(२) च्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सेबीने ह्या तिघांवर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू केली होती.

 

आमच्या टेलिग्राम वाहिनीचे मोफत सभासद व्हा : @marathibrainin


विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: