दिवसामागून दिवस जात होते. आमच्यातलं नातं दिवसागणिक दृढ होत चाललं होतं. स्वभाव मात्र जरा बदलला होता. म्हणतात ना, “ढवळ्या शेजारी बांधला पवळा अन् वाण नाय पण गुण लागला”. अगदी तसचं झालं होतं. मी जरा शांत झालो होतो.
साप्ताहिक सदर | ती, मी आणि पाऊस
आता आम्हाला दोघांनापण कळले होते की, आम्ही एकमेकांना आवडतो. त्यामुळे आमच्यात कमालीचा मनमोकळेपणा आला होता. काहीही असले तरी आम्ही बिनधास्त एकमेकांना सांगायचो. तासनतास गप्पा मारत बसायचो. ती माझा जिवलग मित्र आणि मी तिची जिवलग मैत्रीण, असं नातं झालं होतं आमचं. मला मैत्रीच्या पलिकडे जायची ओढ लागलेली होती. प्रेम वगैरे एवढं काय कळत नव्हतं, म्हणजे मला तरी कळत नव्हतं. टीव्हीवर मुव्हीजमध्ये जेवढं पाहिलेलं तेवढंच कळायचं. बाकी, प्रेम म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? याचा दूरपर्यंत गंध नव्हता मला. असचं एक चित्रपट पाहिला आणि तिला प्रपोज करायचं ठरवलं.
त्या दिवशी आम्ही दोघे तिच्या घरात अभ्यास करत बसलो होतो. घरात दुसरं कोणीच नव्हतं. बराचवेळ अभ्यास करून मी पेंगायला लागलो होतो. मला पेंगताना पाहून ती उठली आणि किचनमध्ये गेली. थोड्या वेळाने बाहेर आली, हातात चहाचा कप होता.
ती : हम्मम हा घे चहा. झोप जाईल.
(मी पुस्तक बंद करत बोललो)
मी : कंटाळा येतो मला अभ्यास करायचा! झोप येते.
ती : म्हणून तर चहा केला ना.
(मी चहा पिला, ती माझ्याकडेच पहात होती, गालातल्या गालात हसत होती. मी एक मोठा श्वास घेऊन म्हणालो…)
मी : एक बोलू?
ती : बोल ना
मी : आयुष्यभर असचं माझ्यासाठी चहा बनवून देशील?
ती : (मस्करीत) मी चहावाली बनू का? मी : मस्करी नाही, खरचं विचारतोय. मला तू आवडतेस. आपण गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड होऊया ना.
ती : त्याने काय होईल?
मी : आपण मोठे झाले की लग्न करू.
ती : अजून खूप वेळ आहे त्याला.
मी : हो. पण आता गर्लफ्रेंड झालीस म्हणून काय होतं?
ती : आपण शाळेत ‘पौगंडावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल’ यावर शिकलोय की. आपल्यात जे आहे ते प्रेम आहे की आकर्षण, हे अजून कळलं नाही मला. अजून आपण लहान आहोत, दोन वर्ष थांबुया आणि आपलं नातं असचं राहिलं, तर मग गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड होऊया. थांबशील?
मी : नक्की!
ती : थॅन्क्स डिअर!
तिने मला घट्ट मिठी मारली आणि दुसर्याच क्षणाला बाजूला झाली. तोंडासमोर पुस्तक पकडलं आणि अभ्यास सुरू केला. मी नुसता बघत राहिलो, डोळ्याची पापणी न लवता.
हेही वाचा : ती, मी आणि पाऊस : भाग २
दिवसामागून दिवस जात होते. आमच्यातलं नातं दिवसागणिक दृढ होत चाललं होतं. स्वभाव मात्र जरा बदलला होता. म्हणतात ना, “ढवळ्या शेजारी बांधला पवळा अन् वाण नाय पण गुण लागला”. अगदी तसचं झालं होतं. मी जरा शांत झालो होतो (कदाचित तिच्या सहवासात राहून) आणि ती जरा मस्तीखोर झाली होती (कदाचित माझ्या सहवासात राहून). आता बर्यापैकी कळायला लागलं होतं. एकमेकांबद्दल मनात आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढत होता. एकमेकांना समजून घेणे, समजून सांगणे हे प्रकार आपोआप होऊ लागले. माझ्या स्वभावात झालेला हा बदल बहुतेक तिला फारच आवडला होता. असचं काही बोलताना मध्येच ती मिठी मारायची. मला सुचायचं बंद व्हायचं. मी तिच्या पाठीवर हात ठेवणार तेवढ्यात ती दूर झालेली असायची. मी गालातल्या गालात हसायचो आणि मिठी मारायला उचललेले हात पुन्हा खाली घ्यायचो.
आमची दहावीची परिक्षा झाली आणि ती मामाच्या गावाला सुट्टीला गेली. “2 महिने सुट्टीची मजा घेऊन येणार” असं म्हणाली जाताना. मला अजिबात करमत नव्हतं ती नसताना. 2 महिने कसे जाणार या विचाराने अजून त्रास व्हायचा.
त्या दिवशी सकाळी मी झोपेत होतो, माझ्या तोंडावर कोणीतरी पाणी मारले. खडबडून जागा झालो. समोर बघतो तर ‘ती’! हातात पाण्याची बाटली घेऊन.
मी : तू??
ती : भूत पाहिल्यासारखं का तोंड केलयं?
मी : तू दोन महिन्यांनी येणार होतीस ना? आठ दिवसांत कशी काय आलीस?
ती : जाऊ का परत?
मी : नको.
(ती हसत हसत बाहेर निघून गेली. कदाचित तिलाही करमत नसणार म्हणून लगेच माघारी आली.)
दुपारी घरात कोणीच नव्हतं. आई बाबा कामाला गेलेले, आजी आजोबा मंदिरात भजनाला, आणि ताई क्लासला गेलेली. तिचेही आई-बाबा कामाला गेलेले. आम्ही दोघेच होतो घरात. निवांत टीव्ही पहात गप्पा मारत बसलो होतो. जोरात वारा सुटला होता. वादळी वारा. अंधारून यायला सुरवात झाली होती. तेवढ्यात लाईट गेली आणि टिव्ही बंद झाला.
ती : चल आपण टेरेसवर जाऊ. आता जोरात पाऊस पडणार बहुतेक.
मी : भिजायचयं तुला?
ती : हममम चल. मजा येईल!
आम्ही दोघे टेरेसवर गेलो. आकाश काळ्या ढगांनी गच्च भरलं होतं, जोरात वारा सुटला होता. तिचे केस वाऱ्यावर उडत होते, केस नीट करायची तिची धडपड चालू होती. मी तिला केस सावरायला मदत करू लागलो, ती एकटक माझ्याकडे पाहू लागली. पावसाचे मोठमोठे थेंब पडायला सुरवात झाली. आम्ही तसेच एकमेकांकडे पहात स्तब्ध उभे होतो. पाऊस जोरात पडू लागला. वळवाच्या पावसात आम्ही भिजत उभे होतो, एकटक एकमेकांकडे पहात. भिजल्यावर तिचं सौंदर्य अजून खुललं होतं. खूप सुंदर दिसत होती ती. तिच्या चेहर्यावरची केसांची बट कानामागे सरकवत मी म्हणालो,
मी : खूप सुंदर दिसतेय तू!
एवढ्यात जोरात वीज कडाडली आणि ती अलगद मला बिलगली. आता मी मिठी घट्ट करायला हात उचलले. क्षणभर थांबलो. ती तशीच मिठीत होती. मग मीपण मिठी घट्ट केली. पावसाचा जोर वाढला होता. मी तिच्या गालावर हात ठेवले आणि तिच्याकडे पहात म्हणालो
मी : I Love you.
ती : माहितीये मला..
मी : तू?
ती : माहितीये तुला.
मी : तुझ्या तोंडून ऐकायचयं.
ती : नाही सांगितलं तर?
(माझ्या आणि तिच्या ओठांमधे खुपच कमी अंतर राहिलं होतं. प्रत्येक वाक्यानंतर ते अजून कमी व्हायचं.)
मी : सांगशील तूू. आज. आत्ता!
(एवढ्यात जोरात वीज कडाडली, ढगांचा गडगडाट झाला. ओठांमधलं अंतर संपलं. ओठांना ओठ भिडले. डोळे आपोआप मिटले गेले. मिठी अजून घट्ट झाली. थोडावेळ सगळ्या जगाचा विसर पडला. एका वेगळ्याच विश्वात आम्ही रमलो होतो. काही वेळाने आम्ही भानावर आलो. डोळे उघडले. भिडलेले ओठ एकमेकांपासून दूर झाले.)
ती : I Love You too!
(तिने पुन्हा मला मिठी मारली आणि बराचवेळ असचं भिजत आम्ही उभे राहिलो.)
(क्रमशः)
लेखक : दिग्विजय विभुते
ट्विटर : @Digvijay_004
ई-पत्ता : digvijayjvibhute@gmail.com
संपादन व मुद्रितशोधन : मराठी ब्रेन
(लेखक अभियंता व नवउद्योजक असून, विविध विषयांवर मुक्तलेखन करतात.)
इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.
Join @marathibraincom
लेखावरील आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.