स्मार्ट शहरे अभियानांतर्गत सर्व शहरांना २ वर्षे मुदतवाढ

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


स्मार्ट शहरे अभियानांतर्गत (स्मार्ट सिटीज मिशन) कार्यरत असलेल्या स्थानिक प्रशासनांना संघ शासनाने मोठा दिलासा दिला आहे. देशाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कोव्हिड-१९मुळे झालेल्या विलंबामुळे आणि ऑगस्टमध्ये नीती आयोगाने दिलेल्या शिफारशींच्या आधारावर सर्व 100 सहभागी शहरांसाठी स्मार्ट सिटीज मिशनअंतर्गत (SCM) असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जून, 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

देशातील विविध ठिकाणच्या स्मार्ट शहर प्रकल्पांबद्दलच्या लोकसभेत अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांच्या उत्तरात काल (गुरुवारी) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत स्मार्ट शहर अभियानाच्या अंमलबजावणीचा कालावधी जून 2023 पर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती दिली. 

नक्की वाचाफक्त २५ शहरेउत्सर्जित करतात ५०% पेक्षा जास्त हरितगृह वायू !

“सन 2015 मध्ये स्मार्ट शहरे अभियान (स्मार्ट सिटीज मिशन) घोषित केले गेले होते. परंतु, पुढे 2016 ते 2018 या कालावधीत शहरांची निवड करण्यासाठी हे अभियान स्पर्धा म्हणून आयोजित करण्यात आले होते”, असे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले आहे. या अभियानांतर्गत सद्या देशभरातून एकूण १०० शहरे निवडण्यात आली असून, अभियानाअंतर्गत असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या शहरांना पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला होता.

दरम्यान, या १०० शहरांच्या स्मार्ट सिटीज प्रकल्पांचा पहिला संच 2021 मध्ये पूर्ण होते अपेक्षित होते. परंतु, नीती (NITI) आयोगाने केलेल्या एका मध्यावधी मूल्यमापनात असे आढळून आले, की स्मार्ट सिटी प्रकल्पांद्वारे अनेक शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण केली जाणे अद्याप बाकी आहे आणि यासाठी “सखोल” पातळीवर करणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. सोबतच, कोरोनाच्या साथीच्या रोगामुळे एक वर्ष वाया गेले, असेही  अधिकाऱ्याने नमूद केले. या सर्व बाबी विचारात घेऊन ऑगस्टमध्ये नीती आयोगाने सर्व शहरांसाठी जून 2023 पर्यंत मुदत वाढवण्याची शिफारस मंत्रालयाला केली होती.

सोबतच, लोकसभेत एका दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री (MoS) कौशल किशोर यांनी सांगितले, की स्मार्ट सिटीज अभियानांतर्गत 12 नोव्हेंबरपर्यंत 1.84 लाख कोटी रुपयांच्या 6,452 प्रकल्पांसाठी निविदा जारी केल्या होत्या. त्यापैकी 5,809 प्रकल्पांसाठी कार्यादेश (वर्क ऑर्डर) जारी केले होते आणि यांपैकी 3,131 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

 ब्रेनबिट्स : राष्ट्रीय हायड्रोजन अभियान (नॅशनल हायड्रोजन मिशन)

“कोव्हिड-१९ साथीच्या आजाराशी संबंधित टाळेबंदी आणि इतर अभूतपूर्व परिस्थितींमुळे देशभरातील स्मार्ट सिटीच्या कामांच्या अंमलबजावणीत तात्पुरता व्यत्यय आला आहे. तथापि, स्मार्ट सिटीजने टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा काम सुरू केले आहे आणि अशा अभूतपूर्व व अनपेक्षित परिस्थितीमुळे गमावलेला वेळ भरून काढण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत,” असेही राज्यमंत्री म्हणाले.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: