कारगिल विजय दिन : अमर हुतात्म्यांची विजयगाथा

“या सर्वांनी आपल्या कुटुंबियांना पुन्हा घरी येण्याचे वचन दिले होते आणि ते त्यांनी निभावालेही. मात्र त्यांचा अंदाज काहीसा वेगळा होता. ‘ते घरी गेले त्या लाकडी पेटीत…तिरंग्यात लपेटून, ज्याचे संरक्षण करण्याची शपथ त्यांनी घेतली होती. ज्या राष्ट्रध्वजासमोर त्यांचा माथा सन्मानाने झुकत होता, तोच तिरंगा मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांच्या कर्तृत्त्वाची गाथा सांगत होता.”

 

ब्रेनविशेष | कारगिल विजय दिवस


“हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।” (एकतर तू युद्धात लढताना प्राणाची आहुती देऊन स्वर्ग प्राप्त करशील किंवा विजयश्री मिळवून पृथ्वीवरील राज्य भोगशील।) गीतेतील याच श्लोकाला प्रेरणास्थान मानून भारतीय सैनिकांनी वीस वर्षांपूर्वी प्राण पणाला लावून लढलेल्या कारगिलच्या युद्धात शत्रूला माघार घ्यायला लावली. यांतील अनेकांनी तर वयाची ३० वर्षेही पूर्ण केली नव्हती. या सर्वांनी आपल्या कुटुंबियांना पुन्हा घरी येण्याचे वचन दिले होते आणि ते त्यांनी निभावालेही. मात्र त्यांचा अंदाज काहीसा वेगळा होता. ‘ते घरी गेले त्या लाकडी पेटीत…तिरंग्यात लपेटून, ज्याचे संरक्षण करण्याची शपथ त्यांनी घेतली होती. ज्या राष्ट्रध्वजासमोर त्यांचा माथा सन्मानाने झुकत होता, तोच तिरंगा मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांच्या कर्तृत्त्वाची गाथा सांगत होता

२६ जुलै १९९९. याच दिवशी भारतीय लष्कराने कारगिल युद्धात ‘ऑपरेशन विजय’ फत्ते करत भारतमातेला घुसखोरांच्या तावडीतून सोडवले होते. हाच दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस त्या शूरवीरांना अर्पण केला जातो, ज्यांनी या युद्धात आपले सर्वस्व पणाला लावून भारतमातेची रक्षा केली. मातृभूमीला शत्रूच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. असंख्य भारतीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी हसत हसत बलिदान दिले. त्यांच्या याच बलिदानाची आठवण करून देण्यासाठी आजचा हा दिवस देशभरात साजरा केला जातो.

ब्रेनविशेष | प्रवास तिरंगी झेंड्याचा

● कारगिल युद्धाची पार्श्वभूमी

कारगिल युद्ध ‘कारगिल संघर्ष’ या नावानेही ओळखले जाते. मे, १९९९ मध्ये जम्मू काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात युद्धाला सुरुवात झाली. भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेचा ताबा मिळवणे, भारतातील महत्त्वाच्या भाग बळकावणे आणि आपला हक्क सांगणे, लेह-लदाख ला जोडणाऱ्या मार्गाचा ताबा मिळवून सियाचीन शिखरावरील भारतीय स्थिती कमजोर करून आपल्या राष्ट्रीय अस्मितेला धोका पोहचवणे, अशा अनेक कारणांसाठी पाकिस्तानने मोठ्या संख्येने त्यांचे सैनिक आणि दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवले होते.

दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या युद्धात भारतीय लष्कर आणि वायुसेनेने ‘नियंत्रण रेषा’ (लाईन ऑफ कंट्रोल) पार न करण्याचे आदेश असतानाही भारतीय हद्दीत घुसलेल्या घुसखोरांना पळवून लावले होते. यामुळेच स्वातंत्र्य हे अमुल्य असते. हे वीरांच्या रक्तानेच चुकवले जाते. या युद्धात तब्बल पाचशेहून अधिक सैनिक हुतात्मा झाले, तर १३०० हून अधिक गंभीर जखमी झाले होते.

● कारगिल युद्धातील भारतमातेचे निवडक शूरवीर

 – कप्तान विक्रम बत्रा

हिमाचल प्रदेशातील पालमपूर या भागात ‘१३ जम्मू काश्मीर रायफल्स’चे कप्तान विक्रम बत्रा यांनी या युद्धात एकामागून एक सामरिक महत्त्व असणाऱ्या उंचीवर भीषण लढा देत शत्रूवर विजय मिळवला. त्यांचा हा पराक्रम पाहता शत्रुनेही त्यांच्या या शौर्याला सलाम केला आणि त्यांना ‘शेरशाह’ या नावाने गौरविले. आपल्याला मिळालेल्या मोहिमेवर ठाण मांडून समोरून होणाऱ्या गोलीबाराची चिंता न करता या शूराने एकट्यानेच अनेक शत्रुना ठार केले. हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही त्यांनी आपल्या डेल्टा तुकडीसोबत एक ठराविक उंची क्रमांक ४८७५ वर हल्ला केला. मात्र एका घायाळ सहकाऱ्याला युद्धभूमीच्या बाहेर काढण्याच्या प्रयत्नात कप्तान विक्रम बत्रा ७ जुलैला रोजी धारातीर्थी पडले. त्यांचे हे अद्वितीय साहस, त्याग आणि पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर सर्वोच्च सैनिक पुरस्कार ‘परमवीर चक्र’ने सन्मानित करण्यात आले.

– कप्तान अनुज नायर

१७ जाट रेजिमेंटचे शूर कप्तान अनुज नायर यांच्याकडे टायगर हिल्स सेक्टरवरील एक मह्त्वपूर्ण शिखर आलेल्या ‘वन पिंपल’ ची मोहीम सोपविण्यात आली होती. या मोहिमेत त्यांचे सहा सहकारी मारले गेले, तर अनुज नायर गंभीर जखमी झाले होते. अशा जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला करून कब्जा केलेले वन पिंपल शिखर पुन्हा भारतीय सैन्याला मिळवून दिले. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सैन्य पुरस्कार ‘महावीर चक्र’ने सन्मानित करण्यात आले.

– मेजर पद्मपानी आचार्य

कारगिलमध्ये शत्रूंचा सामना करताना राजपूताना रायफल्सचे मेजर पद्मपानी आचार्यही हुतात्मा झाले. द्रास सेक्टरमधील या युद्धामध्ये त्याचा भाऊही सहभागी होता. या पराक्रमासाठी त्यांना ‘महावीर चक्र’ने गौरवान्वित करण्यात आले.

– लेफ्टनंट मनोज पांडे 

१/११ गोरखा रायफल्सचे लेफ्टनंट मनोज पांडे यांचे शौर्यगाथा आजही बटालिक सेक्टरच्या ‘जुबार टॉप’ वर लिहिली आहे. आपला गुरखा तुकडी घेऊन त्यांनी दुर्गम पर्वतीय प्रदेशात ‘काली माता की जय’ या घोषणेने शत्रूंच्या नाकी नऊ आणले. अत्यंत कठीण भागात लढा देत मनोज पांडे यांनी शत्रूंचे अनेक बंकर नष्ट केले. गंभीर जखमी असूनही मनोज पांडे शेवटच्या क्षणापर्यंत लढा देत राहिले. भारतीय सैन्य दलाच्या ‘कोणालाही मागे न सोडण्याच्या’ या परंपरेचे पालन करणाऱ्या मनोज पांडे यांना त्यांच्या वीरता आणि त्यागाबद्दल मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ने सन्मानित करण्यात आले.

कॅप्टन सौरभ कालिया

भारतीय हवाई दलानेही या युद्धामध्ये अद्वितीय कामगिरी केली. टोलिंगच्या दुर्गम डोंगरात लपलेल्या घुसखोरांवर हल्ले करताना अनेक शूर अधिकारी आणि वायुसेनेचे अन्य गटही या युद्धात धारातीर्थी पडले. सर्वप्रथम बलिदान देणारे कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या गस्ती पक्षाचे सैनिक होते. भयंकर अत्याचारानंतरही कॅप्टन कालिया यांनी शत्रूंना कोणतीही माहिती दिली नाही.

– स्क्वॉड्रॉन लीडर अजय आहूजा

स्क्वॉड्रॉन लीडर अजय आहूजा यांचे लढाऊ विमान शत्रूच्या गोळीबारात नष्ट झाले. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि पॅराशूटवरून खाली उतरताना शत्रूंवर गोळीबार सुरूच ठेवला. मात्र या लढाईत त्यांचा मृत्यू झाला. तर या युद्धात पाकिस्तानने फ्लाइट लेफ्टनंट नचिकेता यांना युध्दबंदी केले.

शौर्य व बलिदानाची ही यादी येथे संपत नाही. ‘ऑपरेशन विजय’मध्ये भारतीय सैन्याच्या विविध स्तरांतील सुमारे ३० हजार अधिकारी व सैनिक सहभागी झाले होते. युद्धानंतर पाकिस्तानने या युद्धासाठी काश्मिरी अतिरेक्यांना दोषी ठरवले, तर पाकिस्तान या संपूर्ण युद्धामध्ये सामील आहे हे कुणापासून लपलेले नाही. नंतर नवाझ शरीफ आणि वरिष्ठ सैन्य अधिका-यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाक सैन्याची भूमिका स्वीकारली.

अलीकडील उंचीवर जगात लढल्या गेलेल्या प्रमुख युद्धांपैकी हे युद्ध आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दोन्ही देश अण्वस्त्रांनी संपन्न आहेत, पण शस्त्राच्या बळावर कोणतेही युद्ध लढले जात नाही. शौर्य, त्याग, देशप्रेम आणि कर्तव्याच्या भावनेने युद्धे लढली जातात आणि आपल्या भारतात या शूर सैनिकांची कमतरता नाही. मातृभूमीवर सर्वस्व बलिदान करणारे हे अमर बालिदानी आता आपल्यामध्ये राहिले नाहीत, परंतु त्यांच्या आठवणी आपल्या अंत: करणात कायम जिवंत राहतील…

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: