भाविकांसाठी विशेष ‘श्री रामायण एक्सप्रेस’

श्री रामचंद्राच्या इतिहासाशी संबंधित ठिकाणांहून प्रवास करणार आहे  ‘श्री रामायण एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वे. या रेल्वेचा संपूर्ण प्रवास १६ दिवसांचा असणार आहे.

 

मराठीब्रेन वृत्त

नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर

श्रीरामचंद्रांच्या इतिहासाशी संबंधित विविध ठिकाणांना भेट देणाऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘श्री रामायण एक्सप्रेस’ला काल दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. दिल्लीच्या सफदरगंज रेल्वेस्थानकावरून सुरू झालेला या रेल्वेचा सोळा दिवसांचा प्रवास श्रीलंकेत संपणार आहे.

‘श्री रामायण एक्सप्रेस’ च्या प्रवासाची काल दिल्लीच्या सफदरगंज स्थानकावरून सुरुवात झाली

काल दिल्लीच्या सफदरगंज रेल्वेस्थानकावरून ‘श्री रामायण एक्सप्रेस’ या ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना या ट्रेनद्वारे भेट देता येणार आहे. हा संपूर्ण प्रवास १६ दिवसांचा असणार असून, श्रीलंकेत या प्रवासाची सांगता होणार आहे.

दिल्लीतून सुरु झालेल्या ह्या रामायण एक्स्प्रेसचा पहिला थांबा अयोध्या असणार आहे. त्यानंतर नंदीग्राम, सातामरी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रीगव्हरपूर, चित्रकुट, नाशिक, हंपी आणि रामेश्वरम या ठिकाणी ही रेल्वे थांबणार. पण सफदरगंज, गाझीयाबाद, मोरादाबाद, बरेली आणि लखनऊ या स्थानकांवरून पर्यटकांना या रेल्वेत बसता येणार आहे.

काल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या ट्रेनविषयी जाहीर माहिती दिली.

दरम्यान, या ट्रेनने प्रवास करणाऱ्या भाविकांनी त्यांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव विविध समाजमाध्यमांतून व्यक्त करायला सुरुवात केली आहे. काहींनी या ट्रेनमुळे घरच्या लोकांना पहिल्यांदाच घराबाहेर पडण्याची संधी मिळाली असल्याचे व्यक्त केले आहे.  बहुतांश भाविकांनामध्ये या प्रवासाबद्दल उत्सुकता असल्याचे जाणवते.

तर काहींनी ट्रेनमधील सुविधा आणि स्थितीबद्दल निराशा व्यक्त केल्याचे दिसते. एका प्रवाशाने ट्रेनला विविध पॅसेंजरचे जुने डबे जोडण्यात आल्याचे ट्विटले आहे. या ट्रेनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने एलएचबी कोच असायला हवे होते असे म्हटले आहे.

भारतीय रेल्वेला सुविधा पुरवणारी कंपनी ‘आयआरसीटीसी‘ने नियोजित केलेल्या या ‘रामायण यात्रा’ पॅकेजमध्ये ५ रात्री आणि ६ दिवसांचा समावेश केलेला आहे. या पॅकेजची एकूण किंमत ₹ ३६,९७० इतकी असून हा प्रवास १६ दिवसांत दिल्ली ते चेन्नई ट्रेनने व चेन्नई ते श्रीलंका विशेष विमानाने असा असणार आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: