पिंपरी-चिंचवडमध्ये शेतीमाल वाहतुकीसाठी एसटीची सोय !

प्रतिनिधी, पुणे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदी (लॉकडाउन) आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आणि जिल्ह्याबाहेर शेतीमाल पोहचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत, त्यामुळे याचा थेट फटका शेतकऱ्यांसह इतर व्यापाऱ्यांनाही बसला आहे. परंतु, पिंपरी चिंचवड परिसरातील वल्लभनगर एसटी बस डेपोच्या सहाय्यक वाहतूक अधीक्षक पल्लवी पाटील यांनी यावर तोडगा काढला आहे.

पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी असून, लघु उद्योजक, मोठे कारखानदार, शेतकरी आणि व्यापारी या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल राज्याच्या कानाकोपऱ्यात अगदी माफक दरात पोहचविणार आहे. यासाठी २८ रुपये प्रति किलोमीटर दर आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. त्याचबरोबर ‘एसटी’ची ही सेवा २४ तास उपलब्ध असणार आहे, अशी माहिती पल्लवी पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाल्या, “कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत खबरदारी म्हणून प्रत्येक बस ही निर्जंतुक केली जाईल. तसेच, एसटीचा प्रवास हा सुरक्षित मानला जातो. त्यामुळे सुरक्षित पद्धतीने माल पोहचवला जाणार आहे.” जिल्हाबंदी असल्याने वाहतुकीला पर्याय म्हणून एसटी बसने वाहतूक केली जात आहे. त्यानुसार  एसटी बसला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन पल्लवी पाटील यांनी केले आहे.

● शेतीमाल वाहतुकीसाठी आवश्यक बाबी

– किमान ४ टन माल असणे आवश्यक, तर जास्तीत जास्त ७ टन मालाची वाहतूक होणार

– शेतीमाल, आरोग्य संबंधी साहित्य किंवा वस्तू,  आंब्याच्या पेट्यासह इतर माल वाहतूक करता येणार.

– बसद्वारे ज्वलनशील आणि स्फोटक मालाची वाहतूक होणार नाही.

–  विशेष म्हणजे, एसटी बसचे भाडे हे केवळ माल घेऊन जातानाचेच घेणार.

–    रेडझोनमध्ये ही वाहतूक होणार, मात्र त्यासाठी तेथील व्यक्ती माल घेण्यास तयार हवा.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: