नववी व अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांनाही मिळणार पुढील वर्गात प्रवेश ! 

प्रातिनिधिक छायाचित्र

शैक्षणिक वर्षातील विविध परीक्षांतील गुणांची सरासरी पाहता काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीतील प्रवेशाबाबत अडचण निर्माण झाली होती. यावर शिक्षण विभागाने तोंडी परीक्षेचा उपाय शोधला आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

“नववी आणि अकरावीचे जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना तोंडी परीक्षेची संधी देण्यात येईल. ही तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉल किंवा वर्गात थेट उपस्थितीत पार पडेल”, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे आता नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांनादेखील दहावी आणि बारावीत प्रवेश मिळू शकणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातील सर्व परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर आता राज्य शासनाने नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात झालेल्या विविध परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार त्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश  मिळणार आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

“मात्र शैक्षणिक वर्षातील विविध परीक्षांतील गुणांची सरासरी पाहता काही विद्यार्थी या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीतील प्रवेशाबाबत अडचण निर्माण झाली होती. यावरही शिक्षण विभागाने उपाय शोधला आहे. नववी आणि अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना पुढील वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे.  ही तोंडी परीस्खा व्हिडीओ कॉल किंवा शाळेत, महाविद्यालयात थेट उपस्थित राहून द्यावी लागणार आहे”, असे गायकवाड यांनी सांगितले.

वाचा | आजपासून ‘टिलीमिली’द्वारे दररोज भरणार पहिली ते आठवीचे वर्ग !

दरम्यान, या संकटकाळात दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. ऐन परीक्षेच्या काळातच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने दहावीच्या भूगोलाची लेखी परीक्षा रद्द  झाली. त्यानंतर तब्बल तीन महिने टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर आणि पोस्ट ऑफिसमध्येच अडकल्या होत्या. तरीही “सर्व अडचणींवर मात करत गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला. तर या महिन्याअखेरीस दहावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न  शिक्षण विभाग करत आहे”, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

वाचा | ४ ऑगस्टपासून चंद्रपूर व गडचिरोलीतील शाळा सुरू होणार !

मंत्री वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, ”१५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु केले असले, तरी शाळा बंदच राहणार आहेत. विद्यार्थ्यांचं आरोग्य हे आपल्या सर्वांसाठी प्राथमिक आहे. त्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईन, दूरचित्रवाणी, गूगल, यूट्यूब अशा विविध डिजिटल माध्यमातून शिक्षण सुरु आहे. पण प्रत्यक्षात शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.” दुसरीकडे, आता ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, शिक्षण समिती, ग्रामपंचायत आणि पालकांना विश्वासात घेऊन पुढील शिक्षणविषयक निर्णय घ्यावे लागणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here