वंचितांच्या शिक्षणासाठी लढणारा लढवय्या शिक्षक-अनिल शिणगारे.

   घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. याचाच आधार घेवून कोल्हापुर जिल्हातील जाखले वस्ती या शाळेत वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी झटणारे अनिल शिणगारे या ध्येयवेड्या शिक्षकांविषयी माहिती घेवूयात.
       कोल्हापुर जिल्हातील कोडगी वारणा या गावात शेतकरी कुंटुंबात जन्मलेल्या अनिल शिनगारे यांनी प्रतिकुल परिस्थितीत गावात व वारणा येथे प्राथमिक ते महाविद्यालयापर्यंतच शिक्षण पूर्ण केले.महाविद्यालयीन जीवनापासून समाजासाठी काहीतरी करत राहव हा त्यांचा मुळ पिंड.यातच डी.एड.ला नंबर लागल्यामुळे जीवंत असा देशाच्या भावी आधारस्तंभांना घडविण्याचे काम आपन करणार याचा मनोमन आनंद त्यांच्या मनात होताच.अशातच वयाच्या २२ व्या वर्षी  म्हणजेच १९९७ साली शाहुवाडी तालुक्यात सुपात्रे या गावी नौकरी मिळाली.पाचवीपर्यंतची शाळा उभी करतांना नानाविध उपक्रमांची अंमलबजावणी केली.गावाच्या बाहेरून शाळेत मुल आणण्यासाठी प्रयत्न केले.कोल्हापुरच्या अस्सल मातीचा गुणधर्म तो म्हणजे मैदानी खेळ.मैदानी खेळाद्वारे मुलांनी शाळेची गोडी व त्यांच्यात स्कॉलरशिप परिक्षेविषयी आवड निर्माण करुन करुन स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करण्याचे काम त्यांनी केले.२००१ साली पन्हाळा तालुक्यातील कन्या केखले या ठिकाणी काम करतांना खऱ्या अर्थाने मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केले.गावातल्या देवळात भरणारी मुलींची शाळा ही त्यांच्यासाठी मनाला न पटणारी बाब होती.ग्रामपंचायत सरपंचापासून ते गावातील प्रत्येक प्रतिष्ठित नागरिकांना वैयक्तिक भेटून मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवून दिले व अगदी थोड्याच दिवसात या मुलींना हक्काची शाळेची इमारत मिळवून देण्यापासून त्यांना शासनाच्या सर्व सोयीसुविधा मिळवून देवून गुणवत्तपूर्ण शिक्षण घेण्यास सक्षम बनविले.
   आज ज्या पन्हाळा तालुक्यातील नाईक वसाहत झाकले याठिकाणी ते कार्यरत आहेत.त्या शाळेसाठी आपल्या शिक्षकीपेशाच्या बाहेर जावून एक सामाजिक दातृत्व व ऋणाची परतफेड ते निश्चितच करतायेत.तालुक्याच्या ठिकाणापासून वीस किलोमीटर अंतरावर वसलेले झाकले हे पाच हजार लोकसंख्येच गाव.गावाच्या लोकसंख्येवरुन आपणास प्रश्न पडेल की,एव्हड्या मोठ्या गावात शिनगारे गुरुजींनी काय नवीन केले असेल?मात्र कायम ज्याठिकाणी नौकरीसाठी जाईल तेथील मुलांच्या शिक्षणासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवेल अशी गुणगाठ त्यांनी मनाशी बांधलेलीच होती.गावापासून दूर डोगंराच्या कडेला वसलेली नाईक वसाहत येथील वस्तीशाळेत ते २०१० साली रुजू झाले.
   सामाजिक उतरंडीत कायम गुन्हेगारी व इंग्रजांनी ज्यांना केवळ चोर,लुटारुचा शिक्का लावला अशा रामोशी,गोपाळ व धनगर समाजाची २५ ते ३० कुंटुंब या शाळेभोवती विखुरलेली होती.२०१० साली सर जेंव्हा शाळेत रुजू व्हायला गेले तेंव्हा बघितले तर काय?एका रामोशाच्या घरात ही शाळा भरायची.शाळा म्हणजे काय तर एक खोली आणि तिच्या आजुबाजुला उकिरडा.शेणाच्या व घाणीच्या साम्राजात गावातीलच एक स्वंयसेवक केवळ पोषण आहार देण्यापुरतीच शाळा भरवायचा व नंतर सोडून द्यायचा.कायम ऊसतोडणी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी पाठीवर आपले बिऱ्याड घेवून गावोगावी भटकंती करणारी रामोशांची लेकरं शाळेतच येत नसायची.
     याठिकाणी मनापासून काम केल्यास निश्चितच बदल घडवून आणता येईल अशी मनिषा बाळगून अनिल यांनी काम सुरु केले.सर्वात पहिले शाळेभोवतीचा उकीरडा साफ केला.त्याठिकाणी झाडे लावली,भिंतींना रंग दिला.आजपावेतो दरवाजा नसलेल्या या शाळेला हक्काचा दरवाजा,फळा व खडू आणून शिक्षणाची मूहुर्तमेढ त्यांनी रोवली.ज्या शाहू महाराजांनी एकशे दहा वर्षापूर्वी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते त्याच ठिकाणी या वंचित व उपेक्षित समाजातील मुलांना शिक्षणाची दार उघडून देण्याचे मोलाचे काम त्यांनी केले.रामोशांची मुल शाळेत येत नसायची.पालकासमवेत उसाच्या फडात किंवा लहानसहान चोरी चपाटी करुन दिवसभर उनाड फिरणाऱ्या या मुलांना शाळेच्या चार भिंतीत बसविणे तसे महाकठिण काम होते.मात्र खांद्यावर शिक्षणाच शिवधनुष्य उचललेल्या अनिल सकाळी उठून दररोज या मुलांच्या घरी जावून पालकांना मुलांना शाळेत पाठविण्यासाठी मार्गदर्शन करत असत.हळूहळू गुरुजी दररोज आपल्या घरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी येतात हे पालकांनाही बरोबर वाटेना.म्हणून त्यांनी आपली मुल शाळेत पाठवायला सुरुवात केली.गुरुजींना एकेरी भाषेत बोलणारी ही मुल शाळेच्या बाहेरुन एखादे ऊसाची गाडी किंवा वाहन जात असेल तर लगेचच त्यातून चोरून ऊस आणून खायची याचा पत्तादेखील लागत नसायचा.
  कसतरी रामोशांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यायली लागली.मात्र अद्यापही परिसरातील गोपाळांंची पोर मात्र या प्रवाहापासून कोसोदुरच आहेत.यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणने फार मेहनतीचे व जिकरीचे काम आहे.कारण ही मुल दररोज सकाळी उठली की माधुगिरी म्हणजेच रात्री उरलेल्या भाकरी गोळा करण्यासाठी गावभर फिरायची.अठराविश्र्व द्रारिद्र भोगत असलेल्या व समश्यात खितपत पडलेल्या या समाजातील मुलांना अस्वच्छतेनेही ग्रासलेले होते.मात्र या सर्व प्रश्नांना उत्तर मिळाले ते नंदिनी नावाच्या गोपाळाच्या मुलीने अनिल सरांना दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे.नंदिनी दररोज शाळेत यायला लागली मात्र तिच्या अंगाचा खुप वास येतोय म्हणून रामोशांची मुल तिला चिडवायची.अशावेळी अनिल यांनी तिला वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी समजावून सांगितल्या सोबतच तिच्यासोबत चर्चा करुन तिच्या कामाविषयी व अडचणींविषयी माहिती घेतली.यात प्रमुख कारण म्हणजे तिला भिक्षा मागायला जावे लागायचे तसेच दिवसभर दुसऱ्याच्या शेतात काम करायला जावे लागायचे.काहीजणांना आपली लहान भावंडे सांभाळण्याची जबाबदारी असल्यामुळे ही मुले शाळेत येत नव्हती.
   दररोज सर सकाळी गोपाळाच्या वस्तीवर जावून या मुलांना बोलवायचे मात्र पालकच मुलांना गुरुजी आले तुम्ही पळून जा असे सांगायचे का तर मुलांचा रोज बुडायचा.मात्र दररोजच्या प्रबोधनामुळे पालकांचे मत आणि मन परिवर्तन करण्यात अनिल यांना यश आले.या लोकांचा मुळप्रश्न आहे तो म्हणजे यांच्या मुलभूत समश्या अजुनही कायमच आहेत.घरात अन्नाचा दाना नसल्यामुळे वणवण भटकणारी ही मुलं.या लोकांची मुलभूत गरज म्हणजे यांना रेशनकार्ड उपलब्ध करुन देणे.१० कुंटुंबांना रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी अनिल यांनी ग्रामसेवक,सरपंच यांच्या दाराचे कितीतरी वेळेस उंबरे झिजविले मात्र ग्रामसेवक सांगायचे की ही माणसे मुळची या गावची नाहीत. या आणि अशा कितीतरी अडचणी पार करत या मुलांना शाळेत आणण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र,सातबारा व रेशनकार्ड मिळवून देवून.पोटाची आग भागविण्यासाठी  वणवण भटकणारी या मुलांची आग रेशन मिळवून देवून पूर्ण केला व या मुलांना शिकतं करण्याचा शाळेच्या व पाठ्यपुस्तकाच्यापल्याड जावून एक सामाजिक ऋणाची परतफेड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
   गोपाळाची ही दहा  मुल शाळेत यायला लागली.मात्र भाषा ही त्यांच्या शिकण्यातली मोठी अडचण बनू लागली अशावेळी नंदिनी सरांपुढे भाषिक दुवा म्हणून उभी राहिली.ती सर जे बोलतात ते गोपाळाच्या मुलांना समजावून सांगायची तर मुल काय बोलतात ते सरांना भाषातंर करुन सांगायची.मात्र नंदिनी चौथीत असतांनाच तिचा बालविवाह ठरला.त्या परिसरातील गोपाळ समाजात बालविवाहाची परंपरा असल्यामुळे तिचे लग्न आईवडीलांनी गुपचुप ठरविले मात्र अनिल जेंव्हा तिच्या घरी गेले तेंव्हा तिच्यासह घरातील कोणीच काहीही बोलायला तयार नव्हती.अशावेळी नंदिनीचा हात सरांनी  आपल्या  डोक्यावर ठेवायला सांगून शपथ घ्यायला सांगितले.ती थोडीसी घाबरली व तिने सरांना आपले लग्न ठरलेय असे खरे सांगितले.आईवडीलांना तंबी देवून तिचा विवाह थांबविला मात्र २०१६ साली पोलिस तक्रार आणि अनेक खेटा मारुनही सर नंदिनीचा बालविवाह रोखू शकले नाहीत हा या शाहूभूमीतील शोकांतिकाच म्हणावी लागेल.
   दररोज शाळेत खावू मिळतोय.यासाठी मुल दररोज शाळेत यायला लागली.मात्र त्यांना अजिबात अक्षरज्ञान नव्हते.प्रत्येकाच्या हाताला धरुन ग म भ न अनिल यांनी शिकविले.यासाठी शालेयपयोगी सर्व साहित्य स्वखर्चातून ते आणायचे.या भटक्या समाजातील मुलांमध्ये खेळांंचे कौशल्या ठासून भरलेले आहे हे अनिल यांनी हेरले.तद्वतच उंच उडी मारण्यातही ही मुल तरबेज आहेत.दरवर्षी होत असलेल्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत ही मूल तालुक्यात आपले नाव उंचावतायेत.
   दोन्ही समाजाची मुल शाळेत यायला लागली मात्र आता अडचण होती ती इमारतीची.सरपंच व ग्रामपंचायतचे खेटे मारुन गायरानाची दहा गुंठे जागा शाळेसाठी मिळवून दिली.शासनाने बांधकामासाठी निधीही उपलब्ध करुन दिला.बघता बघता शाळेचे काम सुरु झाले.मात्र तुमचा विश्वास बसणार एखाद्या माणसाच्या मागे समश्यांचे शुक्लकाष्ठ लागले की ते संपता संपत नाही.तब्बल तीन वर्षे या शाळाखोली बांधकामाचे काम चालले.गुत्तेदारांनी दोनदा काम अर्धवट सोडून दिले अशावेळी अनिल यांनी स्वतः च्या खिशातील अडीच लाख रुपये या बांधकामासाठी लावली तसेच दररोज रात्री बारा बारा वाजेपर्यंत बांधकामावर पाणी मारले.यामागचा केवळ उद्देश होता तो म्हणजे ही दिन दलित बहुजणांची मुल शिक्षणाच्या प्रवाहात टिकली पाहिजेत व उद्या त्यांनी कुणापुढे हात न  पसरता स्वाभिमानाने आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
-संतोष मुसळे,जालना.
मो.नं.9763521094
(आम्हाला लिहा writeto@marathibrain.com… वर… आणि updates साठी आम्हाला ट्विटर, फेसबुक, instagram वर नक्की फॉलो करा)

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: